चढ़ती लहरे लांघ ना पाए, क्यूँ हांफती सी नाव हैं तेरी

मध्यरात्र झालेली. तो पलंगावर छताकडे एकटक पाहत पडलाय. त्याची नजर एकदम शून्यात आणि डोक्यात हजारो विचार घोळत आहेत. आपण आयुष्यात काय करतोय? का करतोय? हेच करण्यासाठी जन्म घेतलाय का आपण? हेच करण्यात आयुष्य जाणार का? आणि हे सगळं कशासाठी? एवढी लाचारी कशासाठी? आपल्यालाही आनंदी आयुष्य जगण्याचा हक्क आहे ना? या विचारांच्या डोहात बुडालेला असतानाच बाजूलाच झोपलेली बायको त्याचा खांदा जोरात हलवून त्याला भानावर आणते आणि पाळण्यात रडत असलेल्या त्याच्या बाळाकडे बोट करते. तो बाळाला पाळण्यातून काढून पलंगावर पती-पत्नीच्या मध्ये झोपवतो. बायको त्याला विचारते, “काय हो? परत तेच विचार का?” तो म्हणतो, “काही वेळापूर्वी होते, पण आता घराची, गाडीची ईएमआय, महिन्याचा खर्च, बाळ उद्या शाळेत जाईल त्याच्या फीज, उद्याची कामं, हे विचार डोक्यात घोळत आहेत.” ऐन उमेदीच्या वर्षांमध्ये एका ३०-३२ वर्षीय तरुणाच्या मनात एवढी निराशा का आहे? या वयात तर प्रत्येकाच्या मनात जग जिंकण्याचे, असाध्य साध्य करून दाखवण्याचे विचार असतात. मग काही लोक सतत दुःखी किंवा रागावलेले का असतात याचं उत्तर शोधण्यासाठी या गोष्टीच्या मुळाशी जावं लागेल. पण ही कथा इथे सुरू होत नाही. ती सुरू होते त्याच्या दहावी/बारावीच्या निकालानंतर.

भारतात पोरांना इंजिनियरिंग पूर्ण झाल्यावर वा चालू असताना हे समजतं की त्यांना आयुष्यात काय बनायचंय. दहावी-बारावीचे निकाल लागले की एकतर आई-बाप त्यांच्या मित्रांना, थोरल्याना विचारत सुटतात किंवा नातेवाईक तरी घरी विचारत बसतात की आता पुढे काय करणार? मग अजून काही ठरवलं नाहीये म्हटल्यावर इंजिनियरिंग किंवा मेडिकलला जाण्याचं सुचवलं जातं. मेडिकलचा खर्च मध्यमवर्गीय आई-बापाला झेपणारा नसल्याने मग स्वाभाविकपणे इंजिनियरिंगला ऍडमिशन दिलं जातं. मुलगा फक्त दहावी-बारावी पास असल्याने तो तसाही अजाण असतो. दुनियादारीची अक्कल त्याला नसते. ज्यूस सेंटरला गेल्यावर हजार ऑप्शन्स पाहून शेवटी नेहमीप्रमाणे मिक्स ज्यूस घेणारा नादान पोरगा, त्याला आयुष्यात काय व्हायचंय हे कसं ठरवू शकेल? मग तो आई-बाप बोट दाखवतील ती वाट चालू लागतो.

काही मुलांना काहीशी चाहूल लागलेली असते की त्यांना काय आवडतंय जशी आकाशला लागली होती. त्याला मिमिक्री करायला आवडायचं. ‘आकाश की आवाजे’ नावाचं स्वतःचं यूट्यूब चॅनल उघडून त्यावर निरनिराळ्या नटांची मिमिक्री करण्यात त्याला जगातला आनंद मिळायचा. पण इंजिनियरिंगची आग एकेदिवशी त्याच्या घरापर्यंत सुद्धा पोचली बापाने त्याला उचलून सरळ आयआयटी कोचिंग क्लासमध्ये आपटलं. वेद आणि रोहनचं सुद्धा हेच, त्यांची तर टक्केवारी सुद्धा नव्हती तरी त्यांना त्यांच्या वडिलांनी बळजबरीने इंजिनियरींगला घुसडलं. या तिघांचा प्रवास बहुतांशी सारखाच आहे. माणसाच्या मेंदूचे दोन भाग असतात. एक डावा आणि एक उजवा. मेंदूच्या उजव्या बाजूने विचार करणारे जास्त अनॅलिटीकल असतात. तर डाव्या बाजूने विचार करणारे जास्त क्रिएटिव्ह असतात यामुळे उजव्या मेंदूवाले लोक अभ्यासात चांगले असतात, तर डाव्या मेंदूवाल्यांचा कलेकडे जास्त ओढा असतो. या लेखाच्या अनुषंगाने ‘लाखों में एक’ वेबसिरीजमधील आकाश, ‘तमाशा’ सिनेमातील वेद आणि ‘उडान’ सिनेमातील रोहन या मुख्य व्यक्तिरेखांचा एक केस स्टडी करून आजची तरुणाई, त्यांची स्वप्नं, त्यांची सतत होणारी घुसमट व मुलांच्या करियर आणि एकूणच त्यांच्या आयुष्यावर पालकांचा असलेला प्रभाव या सर्व गोष्टींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करण्याचा मानस आहे.

आकाश, वेद आणि रोहन हे तिघेही डाव्या मेंदूवाले होते पण त्यांच्या भैरव सिंहसारख्या बापांना याच्याशी काहीच घेणंदेणं नव्हतं. त्यांना स्वतःचा मुलगा इंजिनियर झालेला हवा होता जेणेकरून “तुमचा मुलगा काय करतो?” असे विचारल्यास ते समाजात कॉलर टाईट करून सांगू शकतील “माझा मुलगा इंजिनियर आहे.” जगभरात जिद्दीच्या कथा मोठ्या अभिमानाने सांगितल्या जातात, ज्यात नायक/नायिका प्रचंड अडचणींना सामोरे जाऊन शेवटी अशक्य लक्ष्य साध्य करून दाखवतात. या कथा साहजिकपणे तरुणांना प्रेरित करण्यासाठी सांगितलेल्या असतात वा तसं करण्यात यशस्वी होतात. मेहनत केली, जिद्द ठेवली की काहीही करता येतं हे तत्त्व अनेक शतकं आपल्याला सांगण्यात आलंय आणि हे तत्त्व बहुदा फायदेशीरच सिद्ध होतं. पण या तत्त्वाचे काही साईड इफेक्ट्स सुद्धा आहेत. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या बिस्वा कल्याण रथ कृत ‘लाखों मे एक’ नावाच्या वेबसिरीजमध्ये आकाशला त्याची बुद्धीची अभ्यासात किती झेप आहे हे जाणून न घेताच, त्याची टक्केवारी एकदम विरुद्ध चित्र दाखवत असतानाही बळजबरीने आयआयटी कोचिंगसाठी पाठवून दिलं जातं. कारण त्याच्या वडिलांना हा विश्वास असतो की कोचिंगचं योग्य मार्गदर्शन, हॉस्टेलचं अभ्यासू वातावरण आणि जिद्द ठेवून अभ्यास केल्याने एक दिवस त्यांचा मुलगा आयआयटीमध्ये प्रवेश मिळवेल. इथे जिद्द मुलाची कमी आणि बापाची जास्त असते की मुलाने इंजिनियर बनावं. अनुक्रमे ‘उडान’ आणि ‘तमाशा’मध्येही असंच होतं. त्यांच्यामध्ये आपसूक असलेलं टॅलेंट न पाहता रोहन आणि वेदला इंजिनियरिंगला पाठवलं जातं. आपला मुलगा मठ्ठ आहे, मुद्दामहून आपण जे करायला सांगतोय ते तो करत नाहीये असा अनेकदा पालकांचा गैरसमज होतो. पण नेहमीच असं नसतं. आकाश त्याच्या आई-वडिलांच्या नजरेत चांगलं बनण्यासाठी जमेल ते करतो. तो रेग्युलरली क्लास अटेंड करतो, अगदी सगळे विद्यार्थी झोपल्यानंतरही टॉयलेटमध्ये बसून रात्र-रात्र अभ्यास करतो. वेदही अभ्यासात लक्ष लागत नसतानाही स्वतःला अभ्यासाच्या आगीत झोकून देतो. प्रयत्न दोघांचेही प्रामाणिक आहेत. हे आपण करूच शकत नाही किंवा करायचंच नाहीये असा दोघांचाही अट्टहास नाही. मात्र अनेक दिवस, आठवडे, पंधरवडे, महिने जातात तरीही डोक्यात अभ्यास काही केल्या घुसत नाही. आकाश पुढच्या थराला जाऊन टेस्टचे पेपर लीक करतो आणि चिटींग करून क्लासमध्ये चांगली रँक मिळवायला लागतो. ही गोष्ट जेव्हा क्लासवाल्यांना कळते तेव्हा त्यात त्यांना हा मुलगा अप्रामाणिक आहे, चोर आहे असंच वाटतं. त्याने हे सगळं का केलं असावं याचा विचार मात्र केला जात नाही. आकाशने ही सगळी उठाठेव आपल्या आई-वडिलांना खूष करण्यासाठी, त्यांच्या नजरेत लायक बनण्यासाठी केलेली असते. काही काळ चिटींगचा हा सिलसिला चांगला चालतो, उच्च मार्क्सचा परिणाम म्हणून आकाशला प्रोमोट करून हुशार मुलांच्या वर्गात बसवलं जातं. आता त्याला चांगली संगत, पोषक वातावरण, चांगले शिक्षक लाभतात. आता तरी जिद्दीने अभ्यास करून त्याने हुशार बनायला हवं ना? म्हणजे तसं होणं आता जास्त सोपं असणार, पण तसं होत नाही.

दुसरीकडे वेदची चिडचिड सुरूच राहते. तासनतास पुस्तकं घेऊन बसल्यावरही नेमकं काय सांगितलं जातंय? कोणत्या फॉर्म्युल्याने उत्तर काढायचंय हे माहीत असतानाही गणित मात्र सोडवता येत नाहीये. आपण नेमके कुठे कमी पडतोय हेच वेदला कळत नाही. रोहनचे वडील त्याला स्वतःच्या पोलाद कंपनीत कामाला पाठवतात. ते काम आटोपून तो दुपारी कॉलेजला जातो. बोर्डावर शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींकडे नीरसपणे पाहत राहतो. पण त्याचं मन भलतीकडेच कुठेतरी, पक्ष्यांच्या, जनावरांच्या, एखाद्या तलावाच्या जवळ असतं. डोक्यात वेगवेगळ्या कविता तयार होत असतात. छान छान विचार, ओळी सुचत असतात ज्या त्याला कागदावर उतरवायच्या आहेत. त्या कवितांचं पुस्तक छापून मग प्रसिद्ध करायचंय. मग अचानक त्याला त्याचा बाप भैरवसिंह आठवतो. त्याचा भयानक रागीट चेहरा, त्याचा मार आठवतो. एका सेकंदात स्वप्नाच्या जगातून रोहन खाडकन जागा होऊन खऱ्या जगात परत येतो. बोर्डवर काय चालूय, शिक्षक काय शिकवतोय, वगैरे काहीच कळत नाहीये. तरीही लक्ष द्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा, जिद्द बाळगा, मेहनत करा.

आकाशचा प्रयत्न रोज सुरू आहे. क्लासमध्ये टॉप करायचा, आई-बापाला खूष करायचा, लायक बनायचा. त्यासाठी पडेल ते कष्ट तो घेतोय. मित्रांशी डोकं लावून आपल्या क्युरीज क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय, टॉयलेटमध्ये बसून वाचन करतोय. मग हे सगळं केल्यावरही निकालात सुधारणा का दिसत नाहीयेत? मार्क वाढायच्या जागी कमी का होत चाललेत? कुठे कमी पडतोय आपण? नोट्स काढत बसलेल्या वेदचा पारा सुटतो. त्याच्या डोळ्यातून भळाभळा अश्रू निघायला लागतात. तो टेबलावर ठेवलेल्या सगळ्या नोट्स घेतो आणि रागाच्या भरात फाडून त्यांच्या चिंध्या करून टाकतो. तो जोरजोरात किंकाळतो, विव्हळतो, स्वतःला विचारतो, ‘का तू इतका मूर्ख आहेस? का इतका मठ्ठ म्हणून जन्माला आलास? जे वर्गातल्या इतर साठ विद्यार्थ्यांना जमतंय, समजतंय ते तुला का कळत नाहीये? अरे मेंदूत भुसा भरलाय का तुझ्या! ’ हा सगळा विचार करत असताना रोहन रात्री उठतो आणि शहरातल्या एका बारमध्ये जाऊन बसतो. एक व्हिस्की ऑर्डर करून ती रिचवत असताना त्याला त्याच्याच कॉलेजमधली काही सिनियर मंडळी दिसते जी तिथे हुल्लडबाजी करत असते. त्या लोकांची टुकारी बघताना त्याला या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतं की हे लोकं मिडिऑकर आहेत पण हे त्यांना माहीत आहे. त्यांनी प्रयत्न करणं सोडून दिलंय आणि ते आपल्याच जगात मस्त आहेत. कदाचित त्यांच्या आई-वडिलांनीही त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणं सोडून दिलंय. त्यांनाही कळून चुकलं असेल की आपलं पोरगं काही करू शकत नाही, काही बनू शकत नाही. पालक काही सिनेमातले व्हिलन नसतात की मुद्दामहून त्यांच्या पाल्यांना छळतील. आपलं करियर जिथून संपतंय, तिथून मुलाचं सुरू व्हावं, आपण जे कष्ट गरिबी सोसलीय ती मुलांच्या नशिबी येऊ नये हीच त्यांची अपेक्षा असते. कोवळ्या वयात पोर भटकून वाया जाण्याच्या आधीच त्याला योग्य त्या मार्गाला लावून त्याचं भविष्य घडविण्याच्या हेतूने त्यांचे प्रयत्न चालू असतात. त्यासाठी ते अनेकदा कठोरही होतात. कारण त्यांना माहीत असतं की आज मनात शिव्याशाप देणारा, नाक मुरडत अभ्यास करणाऱ्या मुलाला भविष्यात जेव्हा तो काहीतरी बनेल तेव्हा आई-बाप कधीकाळी निर्दयीपणे का वागत होते याची जाणीव होईल आणि ते सगळं आपल्या भल्यासाठीच होतं याची जाणीव होईल. पण या सुरक्षित भविष्याच्या हव्यासापोटी कधी कधी मुलांचं वर्तमान नरक बनून जातं.

रोहन अनेकदा त्याच्या वडिलांना बोलून दाखवतो की अभ्यासात त्याचं लक्ष लागत नाही. त्याला कविता करायला आवडते, लिहायला आवडतं. वेदला कथा सांगायला आवडतात. आपल्या आजूबाजूच्या लोकांना तासनतास आपल्या कथांमध्ये खिळवून ठेवण्याचं कसब त्यात जन्मजातच आहे. त्यासाठी त्याला कधी प्रयत्न करावे लागले नाही. पण ही गोष्ट भैरवसिंगच्या डोक्यात घुसतच नाही. त्याला हा सगळा फालतूपणा वाटतो. तो म्हणतो, “मोठा कुर्ता आणि गळ्यात झोळी घालून कवी बनणं म्हणजे भिकेची लक्षणं आहेत. हे करशील तर दोन वेळेला जेवायलाही मिळणार नाही. म्हणून हे विचार लगेच बंद कर आणि अभ्यासाला बस.” आपल्या कडक स्वभावाच्या भीतीने तरी मुलगा अभ्यास करेल असं भैरवसिंगला वाटतं. परिणामी रोज धावणाऱ्या आणि सातत्याने रेसमध्ये हरणाऱ्या मुलाच्या मनात मात्र न्यूनगंड तयार होतो. आपण मठ्ठ, कुचकामी, बिनडोक आहोत असा मनोमन आकाश आणि वेदचा समज होतो. वेद रट्टा मारून, परीक्षा पास होऊन कसाबसा इंजिनियर बनतो. कारण आपली एज्युकेशन सिस्टीमच अशी आहे की डिग्री मिळवण्यासाठी संबंधित कोर्सचं ज्ञान असणं गरजेचं नाही. फक्त पेपर जरी पास करता आले तरी डिग्री मिळते. वेदही फक्त डिग्री पास करण्याच्या जिद्दीवर इंजिनियर बनतो आणि कॉलेजच्या बाहेर पडतो पण त्याचा न्यूनगंड मात्र त्याचा पिच्छा सोडत नाही. पुढे नोकरीला लागल्यावरही त्याचा त्रास सुरूच राहतो कारण त्याने इंजिनीयरींगची फक्त परीक्षा पास केलेली असते, त्यातलं ज्ञान त्याला नसतं. शिवाय त्याला इंजिनियरिंगचं काहीच ज्ञान नाही याचं त्याला नोकरीवर ठेवलेल्या लोकांनाही याची जाण आणि मुळातच घेणंदेणं नसतं, कारण वेदकडे इंजिनियरिंगची डिग्री असते. त्यामुळे ते एका इंजिनियरला जमायला हवीत अशी कामं वेदला सांगत राहतात आणि वेदला आता ही कामं कशी करावी हा गहन प्रश्न पडतो.

नोकरीपेक्षा कॉलेजचा प्रवास परवडण्यालायक असतो कारण तो कधीतरी ४-५, ६-७ वर्षांनी तरी संपणार असतो. त्याला एक ठराविक टाईमफ्रेम असते. नोकरी मात्र कमीतकमी वयाच्या ५८ व्या वर्षापर्यंत करावी लागते. म्हणजे जवळपास सगळं आयुष्यच त्यात जाणार असतं. आवडतं काम आयुष्यभर करता आलं तर ते करताना कंटाळा येत नाही. मात्र न आवडणारी गोष्ट दररोज करायची म्हटली की आयुष्यच नरक होऊन बसतं. या नरकातून वेदसारखे लाखो तरुण रोज जातात जिथे ते अक्षरशः हमाली केल्यागत काम करतात. त्यांचे एमपीआर (मंथली प्रोग्रेस रिपोर्ट) नेहमी खाली जात राहतात, त्यांना दिलेलं टार्गेट्स अचिव्ह करता येत नाहीत, त्यांचे वार्षिक सीआर नेहमी खराब असतात आणि परिणामी त्यांच्या न्यूनगंडात अधिकच भर पडत जाते. मग हे लोक नाउमेदीने उगाच एक-एक दिवस काढत आयुष्य जगायला लागतात. नेहमी तणावग्रस्त राहतात, सतत चिडचिड करतात, कायम कुठल्या ना कुठल्या कारणाने नाखूष राहतात. त्यांची नाराजी इतर कुणावर नसून स्वतःवरच असते.

वीकेंड अगदी हवाहवासा वाटतो. सुट्टीचे ते दोन दिवस अगदी स्वर्गासमान भासतात. दोन दिवसांच्या सुट्टीसाठी हे लोक पाच दिवस काम ढकलून काढतात. जगतात पूर्ण सात दिवस, पण जगत असतात फक्त त्या दोन दिवसांसाठीच. ऑफिसला जायचं म्हटलं की भीतीने त्यांची घाबरगुंडी उडते. सुट्टी असूनही रविवारचा दिवस उद्या कामावर जावं लागणार या विचाराने उदासीत जातो. सकाळी अनिच्छेने उठावं लागतं, बळजबरीने तयार व्हावं लागतं. उसनं अवसान घेऊन घराच्या बाहेर पडल्यावर जसजसं ऑफिस जवळ यायला लागतं तसतशी छातीत धडकी भरायला लागते, नकोनकोसं वाटायला लागतं कारण त्या ऑफिसात वेदला काहीच किंमत नसते. तो एक टाकाऊ कर्मचारी असतो जो फार कामचलाऊ दर्जाचं काम करतो. त्याच्या असण्या-नसण्याने कोणाला काही फरक पडत नाही. पण याचा वेदच्या सायकीवर प्रचंड फरक पडतो. समाजाप्रमाणे त्यानेही स्वतःला टाकाऊ घोषित करून टाकलेलं असतं. तो अनेकदा त्याला हे काम करणं कसं जमत नाहीये हे घरी आई-वडिलांना बोलून दाखवतो पण ‘हे सगळ्यांना करावंच लागतं. बाकी लोकं नाही का जॉब करत? नोकरी सोडशील तर खाशील काय? बरं नोकरी सोडून काय करशील?’ असे प्रतिप्रश्न येतात यामुळे त्याने आता हे घरी सांगणं सुद्धा बंद करून टाकलं. मुलाची बेचैनी लग्न झाल्यास दूर होईल. तो संसारात रममाण होऊन या निरर्थक गोष्टींचा नाद सोडून देईल असं पालकांना वाटतं. आणि मग एक चांगलीशी मुलगी पाहून त्याचं लग्न करून दिलं जातं. जीवनसाथी मिळाल्याने काही काळ मुलाचं खरंच या एक्झिस्टेन्शियल क्रायसिसकडे दुर्लक्ष होतं पण कालांतराने डिप्रेशन परत मुंडकं वर काढतंच. कारण आयुष्यात सोबती आलेला असला तरी काम मात्र तेच असतं. कल्पनाशक्तीची उडान उडत असताना, कविता, कथा लिहिताना त्याला अनंत शक्यता दिसतात. मनातल्या मनात कथा रचताना तो तासनतास रममाण होतो पण ऑफिसमध्ये आकडेमोड करायची म्हटलं की त्याला एकदम बंदिस्त झाल्यासारखं वाटतं. तिथे त्याच्या कल्पनाशक्तीचा काहीच वापर नसतो. निव्वळ एखाद्या मशीनसारखं काम करायचं असतं जे त्याला जमतच नाही. संवेदनशील भावना मारून, भावनाशून्य होऊन जगणं त्याला जमत नाही आणि चांगल्या नोकरीला असलेला मुलगा पाहून लग्न केलेल्या बायकोला नवऱ्याचा प्रॉब्लेम काय आहे हे कळत नाही. सगळ्या सुखसुविधा उपलब्ध असताना नवरा नेहमी नाखूष का असतो? याचं उत्तर पत्नीला सापडत नाही. सांसारिक जीवनाचा पुढचा टप्पा असतो संतती. आणि संतती आयुष्यात आल्यावर मुलाच्या साहसाचं कंबरडं कायमचं मोडतं. कारण आता बायको, मुलाची जबाबदारी आल्यामुळे नोकरी सोडून स्वप्नांचा पाठलाग करण्याची त्याची हिंमतच होत नाही. तो कायमचा पगार, ईएमआय, मासिक खर्च या दुष्टचक्रात अडकून जातो. सगळी ऐहिक सुखं प्राप्त करत असताना त्याला जॉब सॅटिस्फॅक्शन नाही, मानसिक सुख नाही. आपल्या अंगी असलेल्या कलेला एक मूर्त स्वरूप देऊन जगासमोर आणता येत नाही आणि जी नोकरी करतोय त्यात मन रमत नाही. शिवाय ही गोष्ट त्याला कोणालाच सांगताही येत नाही कारण या भावना फक्त त्याच व्यक्तीला कळतात जो यातून जात असतो. परिणामी तो त्याच्या भावना बोलून दाखवणं बंद करून टाकतो. चेहऱ्यावर खोटं हास्य रंगवून आनंदी असल्याचा मुखवटा चढवतो. आपण असेच नाखूष मरणार असं म्हणत तो नियतीसमोर गुडघे टेकतो. दिवसभर मूग गिळून बसतो आणि रात्री छताकडे पाहत त्याच्या आयुष्यात निर्माण झालेल्या शून्यात हरवून जातो.

त्याचा नरक तो एकटाच भोगतो. स्वतःला तो जगातला सगळ्यात नालायक, कुचकामी, फालतू माणूस समजतो. कारण तो त्याच्या कामात चांगला नाहीये. तो रोज धावतो आणि रोज शेवटचा येतो पण शोकांतिका ही आहे की आज हरलेले आहोत आणि उद्याही हरणार आहोत हे माहीत असूनही त्याला उद्या परत धावायचंय. ‘मेरा बेटा लाखों में एक हैं’ म्हणत आकाशच्या वडिलांनी त्याला अशा ठिकाणी जुंपलंय जिथे तो लाखात उठून दिसणारा एक नाही तर लाखोंच्या गर्दीतला एक बनून गेलाय. आपण आपल्या पाल्यासाठी पाहिलेल्या स्वप्नापायी भैरवसिंग इतका असंवदेनशील होऊन गेलाय की त्याच्या मुलाचं स्वतःचही काही स्वप्न असू शकतं या शक्यतेचाही त्याला विसर पडलाय.

घोड्यांच्या रेसमध्ये वेद, आकाश आणि रोहन हे तिघेही गाढवं आहेत कारण ते मुळातच चुकीच्या रेसमध्ये धावत आहेत. आपापल्या रेसमध्ये त्यांना धावू दिलं तर ते अव्वल येऊ शकणारे लंबी रेसके घोडे आहेत. पण त्यांना मात्र घाण्याच्या बैलासारखं जुंपलं गेलंय, तयार केलं गेलंय, बदललं गेलंय ते नऊ ते पाचच्या नोकरीसाठी. त्या कामासाठी जे त्यांना फारसं चांगलं करता येत नाही, ज्या कामासाठी मिळणाऱ्या पगाराच्या ते लायक नाहीत, जे करताना ते आयुष्यभर दुःखी होऊन अर्धवट जीवन जगतील. पण त्यांना हे सगळं करावं लागतंय कारण त्यांच्यासाठी हा मार्ग त्यांच्या पालकांनी निवडलाय. त्यांनी हे नक्की केलंय की मुलगा उपाशी मरणार नाही, त्याला महिन्याच्या महिन्याला चांगल्या रकमेचा भरघोस पगार मिळत राहील. पण हे करत असताना मुलाचा ओढा कुठे आहे, त्याला नेमकं काय करायला आवडतं, कुठल्या फील्डमध्ये तो चांगलं करियर करू शकतो, त्याच्यात कोणते गुण आहेत या गोष्टींकडे पालकांचं दुर्लक्ष होतं आणि कधीकधी तर आपल्या पाल्यातील सुप्तगुण माहीत असूनही या गुणांनी त्याचं घर चालू शकणार नाही या विचाराने पालक त्या गुणांकडे दुर्लक्ष करून त्याला इंजिनियरिंगच्या रणांगणात ढकलतात जिथे त्यांची मुलं सतत अपयशी ठरून पुढे व्यावसायिक आयुष्यातही मनात कायम न्यूनगंड बाळगून, दुय्यम आयुष्य जगत राहतात. या मुलांना जर त्यांना जे आवडतं ते करू दिलं तर ते उमेदीने, हिरीरीने काम करू शकतील. रोज उत्साही, आनंदी राहू शकतील आणि आपलं आयुष्य समाधानाने व्यतीत करू शकतील. पण जॉब सिक्युरिटी नामक कीड जी मध्यमवर्गीय विचारसरणीला लागलेली असते, त्यामुळे पालक हतबल झालेले असतात आणि बऱ्याचदा पाल्याच्या स्वप्नांचा जाणीवपूर्वक चुराडा करून एक भलामोठा प्राणी होण्याचा टॅलेंट असणाऱ्या मुलाला मारून-मुटकून एका छोटयाशा क्युबिकलमध्ये बसवलं जातं.

‘उडान’मध्ये रोहन शेवटी बापाला रेसमध्ये पछाडत त्याच्या कचाट्यातून बाहेर पडतो, ‘तमाशा’मधला वेद त्याच्या वडिलांना त्याला जे आवडतं ते करू द्यावं हे समजावून सांगतो आणि शेवटी एक प्रसिद्ध स्टोरीटेलर बनतो पण ‘लाखों में एक’मधील आकाशची कथा काहीशी ओपन एंडेड आहे. त्याचा प्रवास नेमका कुठे जाणार हे सांगता येणं सध्या तरी शक्य नाही. असे लाखो आकाश आज नऊ ते पाचच्या चक्रात अडकून आहेत ज्यांना एकतर त्यांच्या पालकांनी समजून घ्यायला हवं नाहीतर त्यांनी स्वतःच आयुष्यातली मिडिऑक्रिटी धुडकावून जे मनापासून आवडतं तेच करायला हवं. पण पंखांवर जबाबदारीचं ओझं असल्यावर असे निर्णय खूप अवघड होऊन बसतात आणि मग लाचारी पत्करत अनेक आकाश जमिनीलाच खिळून बसतात. जर पंख कोवळ्या वयात छाटली गेली नसती, त्यांना ‘उडान’ मिळाली असती तर कित्येक वेदनी आकाशाला गवसणी घातली असती.

— पवन गंगावणे

लेखक सिनेअभ्यासक आहेत. लेखकाशी संपर्क साधण्याचे माध्यम: Facebook.

सदर लेखाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी किंवा फेसबुक चर्चेत भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.