५९६० (कथा)

थरथरत्या चेहऱ्याने आणि भेदरलेल्या डोळ्यांनी तो बेसिनकडे पाहत होता. ते लालेलाल पाण्याने काठोकाठ भरून गेलं होतं. नाही, पाणी नाही. ते रक्त होतं. लालजर्द. बेसिनच्या कडेवरून खालच्या पांढऱ्याशुभ्र टाईल्सवर ओघळत होतं. बाथरूमचं गुलाबपाकळ्यांनी आच्छादलेलं फ्लोअर या ओघळणाऱ्या रक्तामुळे आणखीनच लालभडक झालेलं होतं. एकंदरीत सगळंच असह्य होतं. त्याला तिथून निघायचं होतं. पण बेसिनवरील हात आणि त्या रक्ताच्या डबक्यावर खिळलेली नजर हटायला तयार नव्हती. हळूहळू त्या डबक्यातून दोन गुलाबी वक्ष बाहेर आले. मग पूर्ण छाती. मग एका सुंदर मुलीचा चेहरा. त्याचं शरीर बधीर पडू लागलं होतं. मग त्या मुलीचे हात डबक्यातून बाहेर आले. त्या हातांनी त्याचा चेहरा पकडला आणि त्याला झपकन डबक्यात ओढून घेतलं.

भयंकर घाबरून तो स्वप्नातून जागा झाला. खोलीतल्या अंधाराने त्याची भीती आणखीनच वाढली. सपकन उठून स्विचबोर्डपाशी जात त्याने लाईट लावला आणि भिंतीला टेकून उभा राहिला. त्याला एका गोष्टीचं बरं वाटत होतं की गेल्या काही स्वप्नांमध्ये सतत दिसणारा तो ड्रॅगनचे पंख आणि ऑक्टोपससारखा चेहरा असणारा ग्रीनिश ग्रे रंगाचा भीतीदायक प्राणी निदान ह्यावेळी तरी दिसला नव्हता. शेरवानीच्या खिशातून मोबाईल काढून त्याने टाईम पाहिला. दहा पस्तीस होत होते. स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात त्याला यूट्यूबची एक नोटिफिकेशन दिसली. खिशातून रुमाल काढून घामेजलेला चेहरा पुसत तो पलंगावर बसला. नोटिफिकेशनवर क्लिक केलं. चॅनलवरील त्याच्या नवीन व्हिडिओवर कुणीतरी कमेंट केलेली होती. त्यात शिव्या होत्या आणि यूट्यूब फ्री आहे म्हणून काहीही अपलोड करायचं का वगैरे सल्ले होते. सवयीने अशा कमेंट्सकडे दुर्लक्ष करायला तो आता शिकला होता. पण नाही म्हटलं तरी त्याचा भ्रमनिरास झालाच. नोटिफिकेशन पाहिली तेव्हा त्याला वाटलेलं की चॅनलला नवीन सबस्क्राइबर मिळाला असेल. पण जी गोष्ट गेल्या तीन आठवड्यांमध्ये घडली नाही ती आता अचानक कशी घडणार? सहा महिने झाले होते त्याला चॅनल सुरू करून. त्यावर आतापर्यंत ८३ सबस्क्राइबर्स आणि ३० व्हिडिओंचे मिळून ३७९० व्ह्यूज होते. आणि त्याच्या लेटेस्ट व्हिडिओवर तर गेल्या पाच दिवसात फक्त १२ व्ह्यूज होते. ही सगळी आकडेवारी त्याच्यासाठी फारच निराशादायक आणि खचवणारी होती. इतका चांगला कंटेंट बनवत असूनही जर इतका अल्प प्रतिसाद मिळत असेल तर चॅनल बंद केलेलं बरं, हा विचार गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मनात जोर धरू लागला होता. चॅनलला कितीही लो रिस्पॉन्स मिळाला तरी व्हिडिओ अपलोडिंग थांबवायचं नाही, हा आशावादी विचार आता त्याला बालिश वाटू लागला होता. पण त्याला आता ही चिंता करायची काही गरज नव्हती. आज रात्रीच्या प्रकारानंतर चॅनल बंद केलं काय की वाऱ्यावर सोडलं काय, कशानेही त्याला फरक पडणार नव्हता.

तो उठला आणि रायटिंग डेस्कपाशी गेला. मोबाईल स्विच ऑफ करून त्याने त्यातल्या एका ड्रॉवरमध्ये ठेवला. मग ड्रॉवरलाच टेकून तो उभा राहिला. त्याच्या मनात अनेक विचारांनी गर्दी केली होती. ते सारे विचार तिचेच होते. लग्न ठरल्यापासून तो तिच्याशी फार कमी वेळ बोलला होता. त्याला वाटलं आपण किती कमी बोललो आहोत हे शब्दात मोजू शकू. मुळात मोबाईलवर आणि तेही एक मुलीशी तासनतास काय बोलावं हेच त्याला कळायचं नाही. प्रत्यक्ष भेटीतच भरभरून बोलता येतं यावर त्याचा ठाम विश्वास होता. आज त्याच्या सांसारिक जीवनाला सुरुवात करणारी पहिली रात्र होती. नवदांपत्याच्या मिलनाच्या पहिल्या रात्री काय घडतं हे त्याने डेली सोप्स, चित्रपटांमधून पाहिलं होतं, कथा-कादंबऱ्यांमधून वाचलं होतं, मित्रांकडून ऐकलं होतं. पण हे सर्व कृत्रिम आणि आधी ठरवल्यासारखं घडतं हे त्याला माहीत होतं. उत्स्फूर्तपणे जे घडतं ते खरं अस्सल असतं. रहस्यमय असतं. आज रात्री नेमकं काय घडेल याविषयी तो अनभिज्ञ होता आणि जे काही घडेल ते आपल्याला जमेल की नाही अशी धाकधूक त्याच्या मनात होती. स्त्रियांची सेक्सची भूक पुरुषांपेक्षा जास्त असते हे तो ऐकून होता. त्याचं लिंग छोटं असलं तरी उत्तेजित झाल्यावर ते बरंच मोठं होत असल्याने त्याला चिंता नव्हती. तरी त्याने प्रिकॉशन म्हणून दोन महिन्यांपासून मास्टरबेट करणं बंद केलं होतं. आणि तेही एका मित्राच्या सल्ल्यावरून. मित्राने सल्ला दिला होता की, दोन महिने मूठ मारणं बंद करा. नाहीतर मोक्याच्या वेळी उठणार नाही. आणि उठलंच तर फक्त थेंबथेंब गळेल. नो फव्वारे. आणि हे तुझ्या बाईला आवडणार नाही. घोडा पॉवरफुल असेल तरच त्यावर बसून त्याला पळवण्यात मजा येते, वगैरे. तसं त्याच्या मित्रांनी लग्नापूर्वीच्या या दोन महिन्यात त्याला घाबरवून सोडण्यात अजिबात कसर केली नव्हती. एकजण म्हणायचा, साईझ महत्त्वाची असते स्टॅमिना नाही. तर दुसरा याच्या अगदी उलट सांगायचा. आणि तिसरा तर, हे दोघंही घटक महत्त्वाचे नसून इच्छाशक्ती कशी महत्त्वाची यावर भर द्यायचा. हे सगळे आपली गंमत करताहेत हे कळूनही तो गोंधळून जायचा. फर्स्ट नाईटला आपण तिला सॅटिस्फाय करू शकू का याची त्याला शंका यायची. मुळात आपण पॉर्न जास्त पाहायला नको होतं असं त्याला आता प्रकर्षाने वाटू लागलं होतं. त्यातल्या तगड्या पुरुषांनी आणि त्यांच्या अफाट स्टॅमिनाने आपल्या मनात सेक्सविषयी उगाचच चुकीच्या धारणा रुजवल्यात. हे सगळं आता डोक्यातून काढायला हवं. सेक्सचे विचार एखाद्या अस्सल फ्रेशरसारखे असायला हवेत. पण नेमकं तेच त्याला जमत नव्हतं. कुणीतरी आपलं शरीर दुमडून आपल्याला काचेच्या पेटीत बंद करून टाकलंय. ताकाशी मिकेच्या ‘द बॉक्स’ शॉर्टफिल्ममध्ये ती सर्कसमधील मुलगी स्वतःला बंद करून घेते तशी पेटी. तर तो या पेटीत होता. त्या पेटीत त्याला श्वास घेता येत नव्हता, हालचाल करता येत नव्हती. त्याचं अंगांग दुखत होतं. शरीरातले अवयव विरघळताहेत अशी भावना निर्माण होत होती. आपण जरा जास्तच गंभीर होतोय आणि त्या गंभीरपणाचं राक्षसात रूपांतर होऊन आपल्या आत्मविश्वासाला तो अधाशीपणे खातोय. त्याने दोन्ही हातांनी कपाळ दाबून डोळे गच्च मिटून घेतले. आपल्या मनात काही शंका आहेत ज्यांचं निरसन झालेलं नाही हे त्याच्या ध्यानात आलं. शिवाय आज रात्री तो जे काही करणार होता, त्याचा निकाल पॉझिटिव्हच लागायला हवा अशी त्याची अपेक्षा होती.

डोळे उघडून त्याने खोलीकडे पाहिलं. त्याच्या पाहण्याचा अंदाज निराळा होता. आत्महत्या करण्यापूर्वी एखाद्या माणसाने आपल्या प्रिय वस्तूंकडे शेवटचं पाहून घ्यावं तशी ती नजर होती. ज्या खोलीत आयुष्यातील सतरा वर्षं घालवली, तीच खोली आज त्याला अनोळखी वाटत होती. आपण या खोलीत पहिल्यांदाच आलोय असं त्याला वाटलं. पण ती त्याचीच खोली होती. आणि आजपासून तो या खोलीत एकटा राहणार नव्हता. आता एक नवी व्यक्ती या खोलीतील जागा त्याच्याबरोबर विभागून घेणार होती. तिचा या खोलीतील प्रत्येक वस्तूवर हक्क राहणार होता. आणि त्याच्यावरही. मग त्याचा हक्क कुणावर होता? लग्न झाल्याने साहजिकच त्याला तिच्यावर हक्क प्राप्त झाला होता. पण तरी, त्याचा कुणावर हक्क होता? स्वतःचं शरीर सोडलं तर माणसाचा कशावरही हक्क नसतो. ना आई-बापावर, ना राहत्या घरावर. आणि समाजाकडून मिळालेले हक्क तर काहीच कामाचे नसतात. कारण समाज ते कधीही काढून घेऊ शकतो. शिवाय ज्या शरीरावर हक्क असतो ते शरीरही मृत्यूकडे गहाण पडलेलं असतं. आपण एक गोड स्वप्न पाहत असतो की या जगातील काही गोष्टींवर, काही व्यक्तींवर आणि त्यांच्या आयुष्यावर आपला हक्क आहे. मृत्यूच्या प्रदेशात जागं झाल्यावर ते स्वप्न भंग पावतं.

तो पुन्हा पलंगावर येऊन बसला. पलंगावरील पांढऱ्याशुभ्र गादीवर गुलाबपाकळ्या पसरलेल्या होत्या. खोलीतील चारही भिंतींवर गुलाबाची फुलं सेलोटेपनं चिकटवली होती. बाहेर दरवाज्यावर थर्मोकोलचा ‘जस्ट मॅरिड’चा बोर्ड लावलेला होता. त्याने गाडीखालून त्याच्या बहिणीने दिलेला, तांब्याची तार असलेला, गुलाबी रंगाचा अंडाकृती ‘डू नॉट डिस्टर्ब’चा टॅग काढला. त्याच्या बहिणीने त्याला तिची वहिनी खोलीत आल्यावर हा टॅग आठवणीने दरवाज्याच्या मूठीवर टांगायला सांगितला होता. तसं न केल्यास आम्ही अधूनमधून येऊन दरवाजा वाजवू असं ती खट्याळपणे म्हणाली होती. टॅगकडे एकदा पाहून त्याने तो खिशात टाकला.

दरवाजा उघडण्याचा आवाज आला. त्याने गर्रकन मान वळवली आणि सावरून बसला. ती आत आली. त्याची बायको. तिने लाल गुलाबी शेड्सची साडी घातलेली होती. डोक्यावरून पदर घेतलेला होता. ती थोडीशी बेचैन दिसत होती. चेहरा उजळलेला होता. आणि जरासा खाली झुकलेला होता. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात छोटा गुलाबी रुमाल असूनही साडीच्या पदराच्या टोकाशी चाळा करणं तिला जमत होतं. तिचे हात बोटांच्या अग्रापासून अर्ध्या मनगटांपर्यंत मेहेंदीच्या गडद लाल रंगाने रंगलेले होते. शरीरावरील हळदीचा पिवळसरपणा अजूनही गेलेला नव्हता. हळदीचा तो पिवळसरपणा तिच्या नैसर्गिक सौंदर्यात अधिकच भर घालत होता. इतकं सौंदर्य आणि तेही आपल्या मालकीचं ही कल्पना त्याला पचायला जड जात होती. त्याला तेवढ्यात एक गोष्ट आठवली. ते दोघे एकाच कॉलेजात शिकायला होते. तो आर्ट्सला आणि ती सायन्सला. तिचा रोल नंबर ५९ होता तर त्याचा ६०. कॉलेजमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सातत्याने भाग घेतल्याने ती बरीच फेमस होती. आणि तरीही त्या दोघांची साधी ओळखही नव्हती. पाच वर्षं एकाच कॉलेजात असूनही जिच्या अस्तित्वाचा आपल्याला पत्ता लागला नाही, नेमक्या त्याच मुलीशी आपलं लग्न व्हावं हे त्याच्यासाठी जगातलं आठवं आश्चर्य होतं.

त्याच्या पोटात गोळा आणि घशात आवंढा आला होता. पण त्याने हिंमत गोळा केली. आता सगळं त्यालाच करायचं होतं. माणसासारखं वागायचं होतं. तो उठला आणि सर्वात आधी त्याने दरवाजा बंद केला. मग थरथरत्या हाताने तिचे खांदे पकडून हळुवारपणे तिला आपल्याकडे वळवलं. हनुवटी पकडून चेहरा वर केला आणि मोठ्या धैर्याने थेट तिच्या डोळ्यात पाहिलं.

“इथंच रात्रभर उभं राहायचा विचार आहे का?”, काहीतरी बोलायचं म्हणून तो बोलला. काय बोलावं तेच त्याला सुचत नव्हतं.

तिने काहीच उत्तर दिलं नाही.

तो पुन्हा म्हणाला, “फार उशीर झाला.”

ती नाजूक आणि मधुर आवाजात म्हणाली, “तुमच्या बहिणी म्हणजे माझ्या नणंदा सोडतच नव्हत्या.”

“त्यांना चेष्टा करायची फार सवय आहे.” तो म्हणाला.

मग कुणीच काही बोलेना. त्याला शांत राहणंही अवघड जात होतं. मख्ख राहून भागणार नव्हतं. मर्द व्हायचं. पुढाकार घ्यायचा.

त्याने तिचा हात हातात घेतला. आई आणि बहिणी सोडून पहिल्यांदाच इतर कुठल्या स्त्रीच्या हाताला त्याचा स्पर्श होत होता. हा स्पर्श उबदार आणि स्वर्गीय होता. त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो तिचा हात कुरवाळत हलक्या आवाजात म्हणाला, “बसू आपण.”

ते दोघे पलंगावर येऊन बसले. तिने मान परत खाली घातली होती. तो तिच्याकडे पाहत विचार करत होता. त्याची आई एकदा म्हणाली होती की ‘विवाहजोड्या स्वर्गातून ठरून येतात’. तो त्याला त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा विनोद वाटला होता. तो विचार करायचा की, ज्या मुलीसोबत माझी जोडी स्वर्गातून ठरून आलीये, तिची आणि माझी पृथ्वीवर येऊन ताटातूट झालीये. या जगात लाखो-करोडो मुली आहेत. त्यात माझी लाईफ पार्टनर कोण असेल? ती मला कधी भेटणार? योग्य वेळ आल्यावर ती चालत माझ्याजवळ येईल की मला तिला शोधायला जावं लागेल? तिच्या आणि माझ्या वयात किती अंतर असेल? ती दिसायला कशी असेल? तिचा स्वभाव कसा असेल? असे अनेक प्रश्न त्याला पडायचे. त्याला ‘दिल तो पागल हैं’च्या इंट्रोमधील शाहरुख आणि माधुरीचा संवाद आठवायचा. हे विचार नेमके तसेच होते. पण जर त्याच्या आईचं म्हणणं खरं असेल तर त्याला पडणाऱ्या अनेक प्रश्नांचं उत्तर आता त्याच्यासमोर बसलं होतं. ही कोण कुठली अनोळखी मुलगी जिने माझ्या आयुष्यात पत्नी या नात्याने प्रवेश केलाय. हिचं आणि माझं लग्न झालं नसतं तर उद्या कुठे जगाच्या गर्दीत चालत असताना आमचा एकमेकांना धक्का लागता तर आम्ही एकमेकांकडे पाहायचीही तसदी न घेता पुढे निघून गेलो असतो. नियतीचे खेळ असेच गूढ आणि चमत्कारिक असतात. आणि काय गंमत असते पहा. नात्यांच्या रिंगणात आल्याशिवाय दोन माणसं एकमेकांशी काहीही अर्थपूर्ण बोलू शकत नाही.

तो तिच्याकडे डोळे भरून पाहत होता. तिच्या भांगेतलं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र, हातातील सोन्याच्या आणि लाल बांगड्या सारं काही त्याला सुंदर वाटत होतं. त्याची तिच्यावर मालकी होती. आणि तो तिच्यासोबत काहीही करू शकत होता. पण काय करावं हेच त्याला कळत नव्हतं. आपल्या आसपासचं जग बधीर झालंय आणि आपला त्यावर काहीच अंमल चालत नाहीये असं त्याला वाटलं.

“तुमचं उघडं आहे.” ती अचानक बोलली.

“काय?” तो दचकला. तिच्या म्हणण्याचा रोखच त्याला कळेना.

“बटन. तुमच्या कुर्त्याचं बटन उघडं आहे.”

त्याला तिच्या मिस्कीलपणाचं कौतुक वाटलं. त्याने पटकन कुर्त्याचं बटन लावलं.

“तुम्हाला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू?” तिने विचारलं.

त्याला म्हणावंसं वाटलं, तुझ्यावर राग करणाऱ्या माणसाला महामूर्खच म्हटलं पाहिजे. त्याला गर्लफ्रेंडची रिंग गटारात पडलेल्या मुलाचं मीम आठवलं आणि तो स्वतःशीच हसला. म्हणाला, “तू अशी मान खाली घालून काही सांगणार असशील तर मला नक्कीच राग येईल. आता लाजणं सोड. लग्नामध्ये त्याचं खूप प्रदर्शन झालंय.”

मान वर करून अपराधी नजरेने त्याच्याकडे पाहत ती म्हणाली, “मी व्हर्जिन नाहीये.”

तो एकदम गोठून गेला. इतकी नाजूक गोष्ट ती अचानक आणि इतक्या सहजपणे सांगून जाईल याची त्याला अपेक्षा नव्हती. यावर आपण काय रिअॅक्शन द्यावी याचा तो विचार करू लागला. आपण एखाद्या अहंकारी नवऱ्यासारखं वागावं की समजूतदार नवऱ्यासारखं? आपण पराकोटीचे फसवले गेलो आहोत म्हणून थयथयाट करावा की हा अपराधगंड कायम तिच्या मनात रुतून राहील म्हणून आतापासून प्रयत्न करावेत? ती व्हर्जिन नाहीये म्हणजे पूर येऊन सगळं काही उद्ध्वस्त व्हावी अशी परिस्थिती नव्हती. सेक्स ही खूपच नैसर्गिक गोष्ट आहे. ती नैसर्गिकरित्या केव्हाही होऊ नये म्हणून तिला नैतिकतेचे नियम लावणं, नात्यांच्या मर्यादेत अडकवणं त्याला कधीच मान्य नव्हतं. त्याने विचार केला, सेक्स एक्स्पिरिअन्स असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला तो नाही. आज रात्री करायचंय याविषयी आपल्याला गोंधळायचं कारण नाही.

ती भडभडून पुढे बोलू लागली, “मला माफ करा. मला कळतंय मी काय गाढवपणा केलाय. मी ते पर्पजली केलं नव्हतं. ते सगळं फार अचानक झालं होतं. तो माझ्या अनेक मित्रांपैकी एक होता. आमच्या क्लासची ट्रिप गेली होती. आम्ही जंगलात तंबू ठोकले होते. त्या रात्री एक मोठी शेकोटी पेटवून आमचा रंगारंग कार्यक्रम चालू होता. तेव्हा तो मला म्हणाला, चल, तुला जीवनातला खरा आनंद दाखवतो. मी मजेतच हो म्हणाले. मग तो मला एका रिकाम्या तंबूत घेऊन गेला. नंतर जे काय झालं त्यावर माझा कंट्रोल नव्हता. कारण ते तेव्हा हवंहवंसं वाटत होतं. मला इतकंच कळत होतं की तो मला उत्तेजित करतोय आणि मला प्रतिसाद घ्यायचाय. बास. त्याने बोलल्याप्रमाणे करून दाखवलं. त्याने मला जीवनातला खरा आनंद दाखवला. त्या आनंदाच्या टोकाशी स्वर्गाचं दार होतं. नंतर आम्ही पद्धतशीरपणे ते प्रकरण विसरून गेलो. पण मनात सल राहिलीच. आपण फोनवर बोलायचो तेव्हाच मी तुम्हाला हे सांगून टाकणार होते. पण घाबरायचे की तुम्हाला काय वाटेल. त्या गोष्टीचा आज मनावर खूपच ताण आला होता. शेवटी ठरवलं की परिणाम काहीही असू दे. आज हिंमत करून तुम्हाला हे सांगायचंच. आपलं लग्न झालंय आणि मला नाही वाटत आपण एकमेकांपासून काही लपवून ठेवावं.”

त्याची हिंमत बरीच वाढली होती. तसेच भीडही चेपली होती. त्याने आपले दोन्ही हात तिच्या गालांवर ठेवले.

“मी काय तुला बायकोने काही वाईट केल्यावर काहीही ऐकून न घेता मारझोड करणारा नवरा वाटलो का? तसं काही मनात असेल तर जस्ट फर्गेट इट. भूतकाळच्या भूतांना वर्तमान झपाटू द्यायचा नाही. ती तिथंच गाडून टाकायची. झालं गेलं ते ‘गधडीच्या गांडीत गेलं’ असं म्हणण्यापूर्वीच त्याने जीभ चावली. “म्हणजे ते पूर्वीचं सगळं विसरून जा. उलट माझं तर म्हणणं आहे की लग्नाआधी मुलामुलींना सेक्स एक्स्पिरिअन्स असणं महत्त्वाचं असतं. म्हणजे लग्न झाल्यावर पहिल्या रात्री काय करावं यावर त्यांचा गोंधळ उडत नाही. आणि त्यामुळेच त्यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात फारच आत्मविश्वासाने होते. तुला सेक्स एक्स्पिरिअन्स आहे, तो मला नाही. आपण ते करू तेव्हा तू मला शिकवू शकशील की कसं करायचं ते. शिकवशील ना?”

ती भारावून त्याचं बोलणं ऐकत होती. आधी तिचा चेहरा विलक्षण गंभीर झाला. मग ओठांवर स्मित आलं, आणि पुढच्याच क्षणी ती जोरजोरात हसू लागली. एखादा रेकिंग बॉल अचानक अंगावर येऊन दूर फेकले जावं तसं त्याला वाटलं. आपण जे बोललो ते गंभीरपणे. त्यात हसण्यासारखं काहीच नव्हतं. मग जोक कुठे आणि कसा झाला? त्याला अंदाज बांधता येईना. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत राहिला.

मग काही वेळाने मोठ्या मुश्किलीने आपल्या हसण्यावर कंट्रोल करत ती म्हणाली, “काय माणूस आहात हो तुम्ही. मी बोलले ते सगळं तुम्हाला खरं वाटलं? माय गॉड. अहो मी तुमची गंमत करत होते. मी प्युअर व्हर्जिन आहे. टोटल अनटच्ड. कसंय ना तुमचा स्वभाव आहे साधासरळ आणि मन आहे हळवं. तुम्ही कसलीही शहानिशा न करता ऐकलेल्या गोष्टींवर पटकन विश्वास ठेवतात. म्हटलं आपण या गोष्टीचा फायदा उठवला पाहिजे. आणि म्हणून मी ही छोटीशी प्रँक केली.”

“काय विचित्र आहेस तू.” छातीवर हात ठेवत तो म्हणाला. “माय गॉड. किती घाबरलो होतो मी.”

“पण तुम्ही तर फारच टू मच केलं. चक्क विचारायला लागलात, तुला सेक्स एक्स्पिरिअन्स आहे, मला शिकवशील का? तुमचं पण काहीतरीच. कुणी आपल्या बायकोला असं विचारतं का? तरी बरं तुम्ही विचारलं नाही की मी आजपर्यंत कुणा कुणाबरोबर झोपले आहे. विचारलं असतं तर मी काय उत्तर दिलं असतं असं तुम्हाला वाटतं?”

“काय?”

“मी होच म्हणाले असते. अहो लहान असताना मी माझ्या आई-वडिलांबरोबर झोपायचेच ना?” आणि ती पुन्हा खळखळून हसू लागली. त्याला तिचं मनमोकळं हसणं आवडलं. मग ते त्याची खिल्ली उडवणारं असलं तरी.

“अॅक्टिंग बाकी छान करतेस तू.”

“कॉलेजमध्ये ह्या गोष्टीमध्ये मी सर्वात जास्त फेमस होते. मी भल्याभल्यांना सहज ट्रिक करायचे, कुणाचीही फिरकी घ्यायचे. खूप मजा यायची.”

“लोकांना ट्रिक करण्यासाठी अॅक्टिंग करायची काय गरज? तुझं कातिल हसणंच त्यासाठी पुरेसं आहे.”

तिने जवळ येऊन त्याच्या गालावर ओठ टेकले.

“माझी तारीफ केल्याबद्दल हे गिफ्ट. आवडलं?”

“आवडलं आणि मी ते जपूनही ठेवणार. मी तुला एक रिक्वेस्ट करू शकतो का?”

“रिक्वेस्ट कशाला, तुम्ही मला ऑर्डर द्या. आफ्टर ऑल, आय अॅम युअर वाईफ.”

“तर वाईफजी, तुम्ही मला अहोजाहो म्हणणं बंद करा. मी काय घरातला ज्येष्ठ व्यक्ती नाही की समाजातला मोठा सेलिब्रिटी नाही ज्याला तुम्ही मान देऊन बोलायला हवं.”

“असं कसं?” ती लटक्या रागाने म्हणाली. “तुम्ही माझे पती आहात. आणि माझ्यासाठी घरातले ज्येष्ठ आहात. आणि सेलिब्रिटीही. शिवाय मी तुमच्याहून एका वर्षाने लहान आहे. तुम्ही कितीही आधुनिक विचारांचे आणि उदारमतवादी असलात आणि मीही तशी असले तरी मी तुमचा फायदा उठवणार नाही. मी भारतीय संस्कृतीत वाढले आहे. पतीला परमेश्वर मानण्याचे संस्कार माझ्यावर झालेत. खरी गोष्ट म्हणजे, तुम्हाला अरे तुरे करणं मलाच आवडणार नाही. तुम्ही मला तशी परवानगी दिली तरी.”

“तू तुझ्या पती परमेश्वरचं ऐकणार नाहीस म्हणजे?’ तो खोचकपणे बोलला.

“मी तुमचं सगळं ऐकेल हो, पण हे सोडून. प्लिज.”

“ठिके.”

“बरं ऐका ना.”

“काय?”

“आपण दोन चार फोटो काढायचे का?”

“मग काढ ना. विचारतेस कशाला?”

“तुम्ही माझे पती-कम-परमेश्वर आहात. सगळं तुम्हालाच विचारून करेल ना.” आणि डोळा मारून ती हसली.

कॅमेरा ऑन करून वेगवेगळ्या पोजमधून तिने दोघांच्या तीन सेल्फी घेतल्या. मग इन्स्टाग्राम ओपन केलं. छानपैकी फिल्टर देऊन तीनही फोटो अपलोड केले.

“तुमच्या अकाऊंटचं नाव काय?” तिने विचारलं.

“मी अजून कुठं उघडलंय?”

“कमाल आहे बाबा तुमची. त्यादिवशी तर मला प्रॉमिस केलं होतं.”

“हो गं, प्रॉब्लेम असाय की मला इन्स्टाग्राम हँडल करता येत नाही.”

“त्यात काय कठीणे? काढा तुमचा मोबाईल. मी शिकवते.”

“आत्ता?”

“ओह सॉरी. नॉट धिस नाईट. वी हॅव अवर व्होल लाईफ टू लर्न धिज लिटल थिंग्ज्.’

हातात पैसे आले की ते कसे खर्च करावे म्हणून कोणाकडून सल्ला घेतला जात नाही. अगदी अडाणी माणूसही पैसे पाहिल्यावर ते खर्च करायचे हजारो रस्ते शोधून काढतो. तसंच त्याला आपल्या जवळ बसलेल्या सुंदर मुलीचा उपयोग कसा करावा याच्या विविध आयडिया सुचू लागल्या. त्याने तिचा हात हातात घेतला, पण त्यासरशीच त्याला भावना झाली की त्याच्या शरीरातील रक्त झपाट्याने कमी होतंय आणि खोली त्याच्याभोवती गरगर फिरतेय. त्याने हात सोडून दिला आणि अधाशी डोळ्यांनी तिला पाहू लागला.

“असं का पाहताय माझ्याकडे?’ ती म्हणाली. तिच्या स्वरात आव्हान होतं. “पहिल्यांदाच पाहताय का? लग्नात माझा वेध घेणारी तुमची चोरटी नजर माझ्या लक्षात आली नव्हती असं नाही.”

“मी माझा हक्क बजावत होतो.” तो म्हणाला.

“आला बरं ध्यानात तुमचा हक्क. मला पहिल्यांदा पाहायला आलात तेव्हा तुमचा काय खतरनाक गोंधळ उडाला होता मला अजूनही आठवतो. आपल्या दोघांना जेव्हा एकट्याने बोलण्यासाठी सोडण्यात आलं तेव्हा माझ्या रूममध्ये, तुम्हाला आठवतंय पहिला प्रश्न तुम्ही काय विचारला होता?”

“काय विचारलं होतं मी?” तिच्यापासून नजर चोरत, आठवण्याचा खोटा प्रयत्न तो करू लागला.

“तुम्ही विचारलं होतं, ‘फार गरम होतंय, पंखा लावतेस का?’ मला खूपच हसू येत होतं; पण मी हसले नाही. म्हटलं थंडीचे दिवस आणि तुम्हाला गरम होतंय. काय खरं नाही. नंतर मी अंदाज केला की माझ्याशी एकांतात बोलायच्या विचारानेच तुम्हाला कापरं भरलंय. नंतरही बराच वेळ मीच बोलत होते, प्रश्न विचारत होते, हसत होते, आणि तुम्ही मात्र मान खाली घालून हो-नाही करत माझ्या पायांकडे पाहत होतात. तुम्हाला झालं तरी काय होतं?”

तो चाचरत म्हणाला, “ते काये, तुला भेटेपर्यंत एखाद्या तरुण मुलीशी एकांतात बोलायचा माझा अनुभव नव्हता. कॉलेजात तर माझी एकही मैत्रीण नव्हती.”

“सिरियसली? एकही मैत्रीण नव्हती? आय कान्ट बिलिव्ह इट. मला तर बरेच मित्र होते. आणि ते फक्त मित्रच होते बरं का.” ती हसली.

मग काहीतरी सुचल्यागत तो म्हणाला, “तुला आठवतोय, लग्नात आपल्या जेवणाची वेळ आली तो क्षण. टेबलावर गुलाब, झेंडूच्या पाकळ्यांची सजावट होती. हृदयाचे आकार करून तुझ्या माझ्या नावाची आद्याक्षरे बनवण्यात आली होती. आपल्याला वाढण्यात आलं. मी भराभर जेवत होतो. एकतर आपण पावणेतीनला जेवायला बसलो होतो. त्यात कालपासून उपाशी. त्यामुळे भयंकर भूक लागणं साहजिकच आहे. आणि तू तिथेही मान खाली घालून लाजण्याचे सर्व प्रकार शोकेस करत बोटातल्या एंगेजमेंट रिंगला कुरवाळत होतीस. लाडूचा एक घास आणि थोडीशी शेव इतकंच खाल्लं -”

“एक गुलाबजामही खाल्लं होतं मी.” तिने आठवण करून दिली.

“असं का? माझ्या लक्षात नसेल मग. ऐक ना. बाजूच्या टेबलावर सुप्रिया बसली होती. ती जवळ येऊन कानात म्हणाली, दादा, एक टँकर भरून मठ्ठा मागवलाय. तू आणि वहिनी दोघे पोहत बसा मग.’

“सतीश माझी काय कमी थट्टा करत होता.” ती प्रतिवादाच्या आवेशात म्हणाली. “तो खुर्ची घेऊन माझ्यामागेच बसला होता. म्हणत होता, ‘हे काय वहिनी, तू काहीच खाल्लेलं नाहीस? जरा पटापट हात चालव. आमचा दादा तुला खाऊ घालेल याची वाट पाहू नकोस. त्याला स्वतःला खायला वेळ कमी पडतोय. तू लवकर जेवायला लाग. नाहीतर तो तुझंही ताट घेईल.’ मी पुरे पुरे म्हणत असतानाही, त्याची गाडी काय थांबत नव्हती.”

“तुलाच काय त्याने मलाही सोडलं नाही. तदेव लग्नम झाल्यावर माझ्या गळ्यात हार टाकण्यासाठी पुढे आलीस, तेव्हा त्याने मला पोटाला पकडून वर उचललं होतं, आणि तुझा चेहरा पाहून हसत राहिला होता.”

“मी तर उडी मारून तुमच्या गळ्यात हार टाकायचा विचार करत होते. आणि चवड्यांवर उभीही राहिले होते. पण तसं करणं बरं दिसणार नाही म्हणून थांबले.”

“तुला अजून आठवतंय, अंतरपाट काढल्यावर पंडितजींनी तुला माझी आरती करायला सांगितलं होतं. तेव्हा धांदलीत कुंकवाचा टिळा तू चुकून माझ्या नाकाखाली लावला होतास. काय भयानक शिंकलो होतो मी.”

“हो ना. स्टेज किती जोरात थरथरलं होतं. आरतीचं ताट माझ्या हातातून जवळजवळ खालीच पडणार होतं.”

“बरं ते पडलं नाही. नाहीतर स्टेजवर आग लागून आपल्या वैवाहिक आयुष्याचा फारच साहसी श्रीगणेशा केला असतास तू.” तो तिला चिडवत म्हणाला.

ती पुढे सरकली आणि त्याच्या गळ्यात हात टाकून चेहरा त्याच्या चेहऱ्याजवळ नेला. त्याला वाटलं ती कुठल्याही क्षणी त्याचं कचकचित चुंबन घेईल.

“एक श्वास सोडा बघू.” ती मधाळ आवाजात म्हणाली.

त्याने का, कशाला, कशासाठी वगैरे न विचारता तिच्या चेहऱ्यावर दीर्घ श्वास सोडला. तिच्या कपाळावरील केसांच्या बटा उडाल्या.

“उफ !’ ती उद्गारली. “फारच उष्ण आहे हो तुमचा श्वास. माझ्या शरीरात तर आगच लावली तुम्ही. एक सिरीयस प्रश्न विचारते. उत्तर द्याल?”

त्याने मान डोलावली.

“खूप ताजा आहे तुमचा श्वास. कुठली टूथपेस्ट वापरता तुम्ही?” तिने मोहक ढंगात भुवया उडवल्या आणि पुन्हा हास्याच्या लाटांवर स्वार झाली. तो आश्चर्यमिश्रित प्रश्नांकित चेहऱ्याने तिच्याकडे पाहत राहिला.

ती हसत हसतच म्हणाली, “सॉरी सॉरी सॉरी. काय करू? तुम्हाला पाहिल्यापासून सारखी गंमत करावीशी वाटतेये.” आणि मग त्याचा गालगुच्चा घेत पुढे म्हणाली, “कारण तुम्ही आहातच एखाद्या लहान मुलासारखे निष्पाप आणि गोंडस.”

यावर तो पटकन म्हणाला, “आणि तू आहेत पिटुकल्या डोळ्यांची वात्रट आणि खोडकर मुलगी.”

“हो का?” तिने हसून टाळीसाठी हात पुढे केला, तशी त्याने टाळी दिली.

“बरं जोक्स पुरे. आता सिरीयसली एक सिरीयस प्रश्न विचारते. खरं खरं सांगा, तुम्ही गादीखाली काय लपवलंय?”

“गादीखाली?’ तो घाबरला. कुणीतरी छातीवर हातोड्याने दाणकन मारल्यासारखं त्याला वाटलं. हिने आपलं बिंग फोडलं की काय? “काहीच नाहीये गादीखाली. खरंच.”

“झूठ मत बोलिये प्राणनाथ.” ती भरगच्च नाटकी आवाजात म्हणाली. “आपने गद्दे के नीचे वो चीज छुपाके रखी है जिसका आज रातके खेलमें इस्तेमाल होनेवाला है.”

हे ऐकून त्याच्या जीवात जीव आला. “नाही. तू इंडिकेट करतेयेस ती वस्तूसुद्धा गादीखाली नाहीये.”

“असं कसं? थांबा मीच बघते.” म्हणत तिने गादी उचकवण्यासाठी गादीच्या कडेला हात लावला, तसा त्याने तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढलं. ती त्याच्या अंगावर रेलली. तिच्या हृदयाची धडधड त्याला जाणवली.

“चला ना ते करूया जे करण्यासाठी आपण एकत्र आलोय.” ती म्हणाली. “जे करण्याची आपल्या दोघांनाही उत्सुकता आहे. जे आपण आपल्या आयुष्यात फर्स्ट टाईम करणार आहोत. जो खेळ आपल्याला नवीन आहे, तो एकमेकांच्या साथीने खेळूया. तुम्ही मला शिकवा नि मी तुम्हाला शिकवते.”

तिला आपल्या अंगावरून दूर करत तो म्हणाला, “नको. ते उद्या करू. आजची रात्र आपण छान गप्पा मारुया.”

“गप्पा?” ती आ वासत म्हणाली. “गेला एक आठवडा मी तुमच्याशिवाय आणि तुम्ही माझ्याशिवाय काढला. कशासाठी? तर आजच्या सुंदर रात्रीचे सुंदर क्षण उपभोगण्यासाठी. आणि तुम्ही म्हणता आपण रात्रभर गप्पा मारू. मला तसा प्रॉब्लेम नाही. मी एके जागी ताठ बसून सात आठ तास गप्पा मारू शकते. पण आज नको हो. आजचा दिवस खास आहे. एकमेव आहे.”

“सेक्स आजच करायला हवा का? उद्या केला तर चालणार नाही का?”

“काय झालं? घाबरला आहात का?” त्याच्या गळ्याला आणि कपाळाला हात लावत ती म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर चिंतेची झाक होती.

“घाबरण्याचा प्रश्न नाही गं. फक्त ते आपण थोडं उद्यावर ढकललं तर?”

ती हसली. “अहो ते काय संसदेचं अधिवेशन आहे का आज तहकूब करून उद्यावर ढकलायला? बरं. तुमची इच्छा नाहीये तर नको. पण निदान फोरप्ले करायला तरी हरकत काय?”

“गरम होतंय. मी खिडकी उघडतो.”

तो सटकन उठला आणि रायटिंग डेस्क ओलांडून खिडकीजवळ गेला. पडदे बाजूला केले. इतकावेळ न जाणवलेली डिसेंबरची दगडफोडू थंडी भसकन आत शिरली. त्याच्या शरीरात हुडहुडी भरली. त्याने काचेची सरकती तावदाने ओढून घेतली आणि बाहेर पाहू लागला. गल्लीतल्या खांब्यांवरील नारंगी दिव्यांमुळे चंद्रप्रकाश फिकट दिसत होता. आकाश उजळलेलं होतं. ढग तुरळक होते आणि ते ही चंद्राला झाकू पाहत होते. त्याची खोली घरात मागच्या बाजूला होती. तिथून त्याला संपूर्ण परसबाग दिसायची. त्याचं लक्ष एका रांगेत लावलेल्या दहा सिताफळांच्या झाडांकडे गेलं. त्या झाडांना समांतर डाव्या बाजूला आवळ्याची झाडे लावण्यासाठी दहा खड्डे खोदलेले होते. त्या खड्डयांच्या बाजूला मातीचे ढीग होते. त्याला वाटलं, या खड्डयांमध्ये अख्ख्या दहा माणसांना पुरून, मग सिमेंटचा पक्का थर लावून मग मातीने लिंपून टाकून बंद केलं तर हजार वर्षांपर्यंत कुणालाच पत्ता लागणार नाही.

त्याची नजर वर पडदे अडकवलेल्या बारकडे गेली. त्याच्यात आणि भिंतीत कोळ्याचं जाळं होतं. त्या जाळ्यात नुकताच एक डास अडकला होता आणि सुटायची धडपड करत होता. पण कोळी त्याच्या अवतीभवती जाळं गुंफत त्याची धडपड व्यर्थ ठरवत होता.

आणि अचानक काहीही संबंध नसताना त्याला ती गोष्ट आठवली. त्याचा मित्र सुब्या उर्फ सुभद्रच्या वडिलांनी सांगितलेली. हे त्याचे वडील मराठीचे प्राध्यापक होते आणि पार्ट टाईम कविता लिहायचे. म्हणजे साप्ताहिक-मासिकांसाठी नव्हे, तर फेसबुकवर. आणि ते बऱ्यापैकी लोकप्रियही होते. ते भयकविता लिहायचे. त्यांची एकच कविता वाचून त्याला इतकी धडकी भरली की त्याने फेसबुकवर त्यांना अनफॉलो केलं होतं. कुणालाही सांगणार नाही या अटीवर त्यांनी त्याला ही गोष्ट सांगितली होती. आजपासून करोडो वर्षांपूर्वी युनिव्हर्स ६६६८ म्हणजे डार्क युनिव्हर्समध्ये डार्क गॉड्स राहायचे. एक्स १, एक्स २ (ही नावे सुभद्रच्या वडिलांनी मुद्दाम बदलली होती आणि त्याने का म्हणून विचारल्यावर त्यांनी ही नावं उच्चारायची नसतात आणि कुणाला सांगायचीही नसतात असं कारण दिलं होतं), नंताक, गार्डोस, वर्लन, वगैरे वगैरे. पैकी एक्स १ हे त्यांच्यात सर्वात शक्तिशाली. अगदी एल्डर गॉड्सइतके शक्तिशाली. या एक्स १ ना अस्तित्त्वात असलेल्या सगळ्या विश्वांवर आपली सत्ता प्रस्थापित करायची होती. त्यासाठी कितीही मोठं युद्ध करायची त्यांची तयारी होती. एक्स १ नी इतर डार्क गॉड्स ना सोबत घेऊन एल्डर गॉड्सचं निवासस्थान असलेल्या गॉरियन प्लेटवर हल्ला केला. दुर्दैवाने हे युद्ध एल्डर गॉड्स ना गॉरियनपुरतं मर्यादित ठेवता आलं नाही. ब्रम्हांडात ते बऱ्याच ठिकाणी पसरलं. प्रचंड नरसंहार होऊ लागला. डार्क गॉड्सनी एल्डर गॉड्सना चांगलंच नाकीनऊ आणलं. पण दोन्ही बाजू तुल्यबळ असल्याने युद्ध संपायची चिन्हं दिसेनात. युद्ध असंच चालू राहिलं तर कित्येक समांतर विश्वं नष्ट होऊन ब्रह्मांडाचा तोल ढासळण्याची शक्यता होती. शेवटी अगदीच निरुपाय झाल्यावर एल्डर गॉड्स मदतीसाठी ऑलमाईटी वन उर्फ फर्स्ट गॉड अॅल्गरकडे गेले. करोडो वर्षांपासून शांत आणि निष्क्रिय असलेला अॅल्गर सात्विक संतापाने पेटून उठला. तो लढाईत उतरला. पण त्याने डार्क गॉड्स आणि इतरांना सर्वस्वी अनपेक्षित असलेली गोष्ट केली. त्याने कॉस्मिक वेपन ड्रलचा वापर केला. ड्रलची स्फोटकक्षमता इतकी जबरदस्त होती की त्यात डार्क युनिव्हर्स आणि डार्क गॉड्सच्या आधिपत्त्याखाली असलेली अनेक विश्वे हा हा म्हणता कापरासारखी उडून गेली. या प्रचंड विनाशात जीव वाचवून पळ काढण्यात फक्त एक्स १ आणि एक्स २ यशस्वी झाले. हे दोघं युनिव्हर्स 5960 मधील पृथ्वीवर म्हणजे आपल्या पृथ्वीवर येऊन लपले. हे दोघे शक्तीहीन आणि पराभवाने अपमानित होऊन संतापलेले होते. त्यांना बदला घ्यायचा होता. पण आपल्या शक्ती परत मिळवायला त्यांना बराच अवधी जावा लागणार होता. म्हणून दीर्घ निद्रावस्थेत जायचं त्यांनी ठरवलं. तर असे हे एक्स १ आणि एक्स २ पृथ्वीवर कुठेतरी दीर्घनिद्रेत लपून बसलेत. निद्रेत असले तरी आसपास काय चालू आहे याचं त्यांना चांगलंच भान असतं. तसेच या अवस्थेत इतर सजीवांच्या कमजोर आणि अननुभवी मनांवर ते कब्जाही करू शकतात. त्यांच्यालेखी आपण किड्यामुंग्यांहूनही खालच्या दर्जाचे आहोत. त्यामुळे ते जागृत झाले तर मानवजातीला खूप मोठा धोका आहे. मी एका गूढ पंथाचा भागधारी (त्यांनी जाणीवपूर्वक सभासद किंवा सदस्य हे शब्द वापरले नव्हते) आहे. आमचा पंथ जगभर विखुरलेला आहे. आमचं काम म्हणजे एक्स १ आणि एक्स २ चा शोध घेणे आणि ते जागृत होण्यापूर्वी त्यांचा बीमोड करण्यासाठी एल्डर गॉड्स ना संपर्क करायचे उपाय शोधणे. त्याने त्यांची ही गोष्ट कितीही गंभीर चेहरा करून ऐकली असली तरी त्यातील एकाही शब्दावर त्याचा विश्वास बसलेला नव्हता. ते भयसाहित्य फारच आवडीने वाचतात आणि तशीच एखादी कथाकल्पना घेऊन कादंबरी वगैरे लिहायचा त्यांचा विचार असावा असा त्याचा समज झाला. किंवा सुभद्रचे वडील कॉन्स्पिरसी थियरिस्ट असावेत. जगाचा अंत हा या लोकांचा फारच आवडता विषय. अक्षरशः काहीही इल्लॉजिकल फॅक्ट्स एकमेकांना जोडून थिअरी प्रुव्ह करायची आणि इतरांवर ती लादायची या लोकांना हौस असते. म्हणून ही गोष्ट मधल्या पाच वर्षांत तो पार विसरून गेला होता. मग ती नेमकी आता अशा अवघड वेळी का आठवतेय हेच त्याला कळत नव्हतं. कदाचित जी गोष्ट आपल्याला आज रात्री करायचीय तिचा ताण मनाला असह्य होऊन ह्या गोष्टीची आठवण ट्रिगर झाली असावी. पण एका गोष्टीचं त्याला आजही नवल वाटायचं. त्या दोन अज्ञात देवांची खरी नावं जाणून घ्यायची त्याला खूप इच्छा होती. त्याने बराच पाठपुरावा केल्यावरही सुभद्रच्या वडिलांनी त्याला ती नावं सांगितली नव्हती. लिहूनही दिली नव्हती. ते सारखं म्हणायचे, ही नावं अशुभसूचक आहेत. ती एकदा उच्चारली की पुन्हा पुन्हा उच्चारावीशी वाटतात. मग त्यांचा जप सुरू होतो. आपण नकळतच आपल्या मनाचं नियंत्रण त्यांच्या हवाली करतो. हळूहळू त्यांच्या कह्याखाली जातो आणि त्यांचे हस्तक बनतो. हे मग तेवढ्यावरच थांबलं. पण आजही ती नावं जाणून घ्यायच्या त्याच्या इच्छेत तसूभरही फरक पडला नव्हता. किंबहुना ह्याक्षणी ती नावं जाणून घेणं म्हणजे आताच्या तणावपूर्वक परिस्थितीवरचा एकमेव उपाय आहे असं त्याला वाटलं.

त्याने मान जराशी वळवून तिरप्या डोळ्यांनी मागे पाहिलं. त्याची बायको साडीच्या पदराशी चाळा करत हसत त्याच्याकडेच पाहत होती. पाहू नकोस माझ्याकडे असं, त्याला ओरडावंसं वाटलं. पण त्याला पुन्हा स्वतःवरील नियंत्रण गमावलेलं वाटलं. तो करत असलेली स्वतःची अडवणूक त्याला असह्य होत होती. जे आपल्याला करायचंच आहे ते आपण लांबणीवर का टाकतोय तेच त्याला कळत नव्हतं.

त्याला खिडकी आवडायची. खिडकीपाशी कितीही वेळ उभं राहिलं किंवा बसलं तरी त्याला कंटाळा येत नसे. आताही त्याला असंच उभं राहून संपूर्ण रात्र काढावी असं वाटत होतं. चेहरा काचेला चिपकवून दूरवर पाहत तो दूरवरचे विचार करत होता. मुलींना आकर्षून घेण्याच्या विद्येत तो पारंगत नसला, तरी कॉलेजात असताना त्याला एक मुलगी आवडली होती. त्याचं तिच्यावर प्रेम जडलं होतं. ते प्रेम तिच्याजवळ व्यक्त केल्यावर तिने त्याचा स्वीकारही केला होता. ती मुलगी इतर मुलींसारखी टाईमपास म्हणून एखाद्या मुलाला महिना दोन महिन्यांसाठी बॉयफ्रेंड बनवणाऱ्यांमधली नव्हती. ती या नात्याचा गंभीरपणे विचार करत होती. पण हे रिलेशन जास्तकाळ टिकलं नाही. ती मुलगी एकाएकी गायब झाली. कॉलेजमधील जे पाच विद्यार्थी रातोरात गायब झाले होते त्यांच्यातली ती एक होती. पाच वर्षांपूर्वीचं फार भयानक मॅटर होतं ते. अगदी महाराष्ट्रभर त्याचा गवगवा झाला होता. पण ती मुलगी गायब झाली नसती तरी यथावकाश त्याने ब्रेकअप केलाच असता. कारण त्याला कायमच हे नातं कंटिन्यू करण्यात भीती वाटली होती. लहानपणापासून त्याची स्त्रियांप्रती असलेली उदासीनता इथेही उफाळून आली होती. लहानपणी आपल्या या दोषाकडे त्याचं लक्ष गेलं नव्हतं. ते वयच मुळात असल्या कॉम्प्लेक्स गोष्टी एक्सप्लोअर करायचं नव्हतं. पण कॉलेजमधील या प्रकारानंतर आपण गायनोफोबिक आहोत हा तीव्र साक्षात्कार त्याला झाला. हळूहळू सर्व गोष्टी त्याच्या लक्षात येत गेल्या. स्त्रियांना पाहून आपल्या मनात कुठलीच भावना येत नाही. आणि आलीच तर ती क्षणिक आणि क्षीण असते. स्त्रियांच्या सहवासात आपल्याला असुरक्षित वाटतं. स्त्रिया पाहिल्या की दूर पळून जावंसं वाटतं. ह्याच कारणांमुळे की काय, त्याने आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आईला आपल्याला सांभाळण्यासाठी नेमलेली पगारी दाई यापलीकडे महत्त्व दिलं नव्हतं. त्याचं निरीक्षण होतं की, जितका तो स्त्रियांपासून दूर पळायचा प्रयत्न करतो, तितका त्याच्याभोवती त्यांचा गराडा पडत जातो. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे त्याचं नुकतंच झालेलं लग्न आणि त्याची बायको. ती त्याच्यावर प्रेम काय दाखवत होती, त्याला मान काय देत होती, टिपीकल बायकोसारखा चुतियापा काय करत होती, सगळा कहरच. तिचं हे सगळं करणं त्याला अजिबात आवडत नव्हतं. मग भले तिचं हे वागणं त्याची कीव करण्यासाठी असेल किंवा त्याला प्रसन्न करण्यासाठी असेल किंवा त्याच्यावर हुकूमत प्रस्थापित करण्यासाठी असेल. त्याने स्वतःला कधीच ग्रेट समजलेलं नव्हतं. आपली कुणी काळजी घ्यावी, कौतुक करावं, आपल्याला मान द्यावा असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. कारण भरपूरदा अनुभव घेऊनही त्याला या प्रकारांची सवय झाली नव्हती. असे प्रकार त्याच्यासोबत घडायला लागले, तेही सातत्याने आणि तीव्रतेने, तर त्याला गुदमरल्यासारखं व्हायचं, शरीर आतून आगीवर धरल्यासारखं वाटायचं. मघापासून तो त्याच जीवघेण्या जाणिवेत वावरत होता.

गेल्या सात दिवसात ज्या प्रश्नाने त्याला सतत बेचैन केलं होतं तो प्रश्न त्याला पुन्हा सतावू लागला. मी लग्न का केलं मग? या प्रश्नाचं स्वच्छ आणि लख्ख उत्तर त्याला माहीत होतं. स्त्री शरीर एकदातरी हाताळता यावं म्हणून. सेक्स ही चीज माणसाला स्वर्गीय सुख कसं प्राप्त करवून देते याचा अनुभव घेता यावा म्हणून. लग्नाआधी पॉर्न पाहत मुक्तपणे केलेले हे विचार आता लग्नानंतर मनात आणायला तो घाबरत होता. स्त्रियांचा सहवासच जर आपल्याला असह्य होतो, तर त्यांच्याशी संग करणं म्हणजे ज्याचा स्वप्नातही विचार करता येणार नाही अशी अशक्यप्राय गोष्ट होती. लग्न लागत असताना आपल्याला आनंद का होतोय याचं त्याला राहून राहून भयानक आश्चर्य वाटत होतं. हे लग्न आपल्या मर्जीविरुद्ध होतंय आणि तरी ते आपण होऊ देतोय कारण जी अदृश्य शक्ती आपल्यावर हुकूमत गाजवत आहे तिच्याविरुद्ध आपण बंडाचं निशाण उभारू शकत नाही. अदृश्य शक्ती? म्हणजे? तो चमकला. दिव्य अनुरेणूंचा अडथळा पार करत दोन शब्द त्याच्यापर्यंत येण्याची धडपड करत होते. आणि ते आले. त्याच्या मनात सर्वशक्तीनिशी झंकारले. ही अशुभाची सुरुवात आहे अशी पुसटशी जाणीव त्याला झाली. पण त्याकडे दुर्लक्ष करून त्याने ते शब्द मनाच्या अतिशय आतल्या भागात जिथे मानवाच्या उत्पत्तीपासून फक्त आदिम प्रेरणा शुद्ध स्वरूपात वावरत होत्या, तिथे सामावून घेतले. डोक्याला विजेचा झटका बसल्यासारखा तो शहारला. ही राक्षसीण आहे. मानवी रूप घेतलेली. अनेक क्रूर लोकांनी मिळून आपल्याला एका नरमांसभक्षक राक्षसीणच्या स्वाधीन केलंय. जी दरदिवशी थोडं थोडं मांस खाऊन आपल्याला संपवणार आहे. फरक फक्त इतकाच की ही राक्षसीण तरुण आणि सुंदर आहे. आणि त्याला त्याच्या तिच्या स्वाधीन करणारे लोक त्याचे नातेवाईक आहेत. गेल्या सात दिवसात त्याने बराच प्रयत्न केला होता हे लग्न आपल्याला आवडावं, आपण त्याचा स्वीकार करावा, त्यानुषंगानं आपल्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी सज्ज व्हावं. पण तो साफ अपयशी ठरला होता. नाही. ती राक्षसीण नाही. जर काही वाईट असेल, अशुभ असेल तर ते आपल्यात आहे. आपल्या गायनोफोबिकनेसमुळे एक नवरा म्हणून आपल्या बायकोच्या शारीरिक आणि मानसिक अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण नालायक आणि कुचकामी आहोत हा गेल्या सात दिवसात त्याने काढलेला निष्कर्ष. त्यामुळे जन्मभर तिच्यासाठी नवरेपणाचं कृत्रिम नाटक करत संसार रेटणं त्याला शक्य नव्हतं. आणि फक्त गायनोफोबिकनेस नव्हे तर आणखी एक कारण होतं. एक अनामिक भीती जी त्याला विचारांमध्येही पकडता येत नव्हती. एक अशी भीती ज्याने त्याला स्वप्नांमधून झपाटून टाकलं होतं आणि त्याच्या अंतर्मनात ठाण मांडलं होतं. ते काहीही असो त्याला या लग्नबंधनातून सुटका करून घ्यायची होती. त्यासाठी एक नेहमीचा मार्ग होता. घटस्फोट. लग्न झालंच होतं. चार-पाच महिने कसेतरी काढायचे आणि घटस्फोटासाठी प्रयत्न करायचा. पण घटस्फोट कल्पनेला कसलाच आधार नव्हता. तो काय कारण सांगून तिला घटस्फोट देणार? तिच्यात लिटरली नाव ठेवायला जागा नव्हती. ती सर्वगुणसंपन्न होती. त्याने घटस्फोट द्यायचं ठरवलं तर सगळे तिचीच बाजू घेणार. कारण त्या चार-पाच महिन्यात आपल्या मनमिळावू वागण्याने ती सर्वांची मनं जिंकून घेणार. दोष तर सगळ्यांनी त्यालाच दिला असता. त्याला दोष देण्याइतक्या काही ठळक गोष्टी सगळ्यांना माहीत होत्या. तिच्याशी मुद्दामहून वाईट वागून हे लग्न बिघडवता आलं असतं. पण नाटकं करणं त्याला उभ्या आयुष्यात कधी जमलं नाही म्हणून तो रस्ताही बंद. त्याला तिचं आयुष्य बरबाद करायचं नव्हतं. पण या लग्नबेडीतून सुटका मिळवायचा एकही मार्ग त्याला दिसत नव्हता. सरतेशेवटी त्याने ठरवलं की स्वतःला संपवून टाकायचं. सुसाईड. इट इज द लास्ट अँड इफेक्टिव्ह सोल्युशन ऑन धिस प्रॉब्लेम. भावी संसाराचा डोळ्यांसमोर उडणारा फज्जा पाहण्याचं टाळण्याचा हाच एक सोपा उपाय होता. पण इथेही एक अडचण होती. ही अडचण नसती तर लग्नापूर्वीच तो या घुसमटीतून सुटला असता. स्वतःला मारण्याइतपत त्याच्यात धैर्य नव्हतं. त्याने आत्महत्या करण्यात मदत करणाऱ्या सुसाईड गँगशी संपर्क साधायचाही प्रयत्न केला होता; पण ती संस्था कुठलाही माग मागे न ठेवता एकाएकी कुठेतरी गायब झाली होती. शेवटी त्यानेच मार्ग काढला. त्याच्याकडे एक आयडिया होती. पण ती अंमलात आणता येईल यावर त्याचा स्वतःचा विश्वास नव्हता. या प्रकारात थोडीफार जबरदस्ती करावी लागणार होती. आजपर्यंत त्याने कुणावरही जबरदस्ती केलेली नव्हती. त्याला फक्त स्वतःवर जबरदस्ती करवून घ्यायचा अनुभव होता. पण जर स्वतःचं आणि तिचं भलं करायचं असेल, तर त्याला जबरदस्तीचाच मार्ग अवलंबवावा लागणार होता. निदान प्रयत्न करायला काय हरकत आहे असा त्याचा विचार झाला आणि त्याने मनाची तयारी केली.

खिडकीची पार्श्वभूमी सोडून तो पलंगावर येऊन बसला. ती कसलंतरी गाणं गुणगुणत होती. त्याला तिच्या चेहऱ्याकडे पाहवत नव्हतं. शिवाय त्याला त्याचा चेहरा जबरदस्ती करण्यासाठी कठोरही करता येत नव्हता.

“तू माझी बायको आहेस ना?” त्याने मोठ्याने विचारलं.

गाणं गुणगुणता ती अचानक दचकून थांबली. त्याच्याकडे गमतीने पाहत म्हणाली, “गुड. आता तुम्ही गमतीच्या मूडमध्ये आलेले दिसतात.”

“तसं काही नाही. थोड्या वेळापूर्वी तू म्हणाली होतीस की पती परमेश्वर असतो, पतीची सेवा करणं, त्याची प्रत्येक आज्ञा पाळणं पत्नीचा धर्म असतो वगैरे वगैरे. हे सगळं तू स्टाईल मारण्यासाठी म्हणाली होतीस की खरंच तुझे विचार तितके परंपरावादी आहेत?”

तिच्या चेहऱ्यावर अविश्वास झळकला. “काय झालंय तुम्हाला? असे विचित्र प्रश्न का विचारत आहात? काही झालंय का?”

“हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.” तो धारदारपणे म्हणाला.

त्याच्या आवाजातला थंडपणा तिला अशुभसूचक वाटला. ओठ चावत म्हणाली, “सॉरी. हो. मला खरंच तसं वाटतं. तुम्ही माझ्या आयुष्यातील सुप्रीम अथॉरिटी आहात. मी आता पूर्णपणे तुमची आहे.”

तो हसला. त्या हसण्यात वैषम्य आणि वेदना होती. इतक्या वर्षांनी अखेर एकदा वर येत असलेली.

“आजच्या काळात पत्नींची पतींविषयी अशी नम्र आणि आदर्श मतं ऐकणं म्हणजे बियाँड विअर्ड वाटतं. पण अपवाद सगळीकडेच असतात. इन शॉर्ट द समरी इज, मी तुझं सर्वस्व आहे आणि तू ते सर्व करशील जे मी तुला सांगेन.”

“राईट.”

“वेल, आता मी तुला दाखवू शकतो की मी गादीखाली लपवलंय.”

“म्हणजे माझा अंदाज बरोबर होता.” ती अजूनही भीती आणि जराशा उत्सुकतेने म्हणाली. त्याने लक्ष दिलं नाही. गादी सरकवून खालची वस्तू घेतली आणि तिच्यासमोर धरली.

“हा काय प्रकार आहे?” ती अशा पद्धतीने म्हणाली जणू काही तिने अपेक्षा केली ते हे सरप्राईज नव्हतं.

“धिस थिंग इज कॉल्ड किचन नाईफ.” तो मघाच्याच थंड आवाजात म्हणाला. “हातात घे.”

ती आधी घुटमळली. मग त्याचा निग्रही चेहरा पाहून सुरा घेण्यातच शहाणपण आहे हे तिला कळलं. थरथरत्या हाताने तिने सुरा घेतला.

“गुड. तुला हे वेडगळपणाचं वाटेल, माझा बालिशपणा वाटेल किंवा रात्रीच्या या रोमँटिक वेळी मी प्रँक करतोय असंही वाटेल. बट बिलीव्ह मी, हे सगळं खरोखर पुरेशा गांभीर्याने घडतंय. मला प्रॉमिस कर, मी सांगितलेली गोष्ट तू करशीलच.”

ओठ शिवून घेतल्यासारखी ती त्याच्याकडे टकामका पाहत होती. साधं अक्षर जरी उच्चारलं तर ते एखाद्या भयंकर घटनेला चालना देतील असं तिला वाटत होतं.

“बहिरी झालीयेस का?” त्याचा आवाज चाबकासारखा कडाडला. “मी काहीतरी विचारतोय. उत्तर कोण देईल?”

तिने होकारार्थी मान हलवली. आता तिला घाम फुटला होता.

“ओके. आता नीट ऐक.” तो थांबला. त्याने ओठांवरून जीभ फिरवली. “तुला हा सुरा थेट माझ्या छातीतून आरपार करायचाय. कम ऑन.” आणि हात पसरत त्याने डोळे मिटून घेतले.

काही सेकंदांसाठी आसपासचं सगळंकाही स्तब्ध झालं.

“तुम्ही गंमत करत आहात ना?” शांतता भेदत तिने विचारलं खरं. पण त्यातला फोलपणा तिला स्पष्ट कळत होता.

त्याने डोळे उघडले. तिच्याकडे त्रासून पाहिलं.

“मला वाटलंच तुझी हीच रिअॅक्शन असेल. पण ही गंमत नाहीये. मी जे सांगतोय ते तू करायलाच हवंसं. तू प्रॉमिस केलंयंस.”

तिने सुरा टाकून दिला आणि त्याच्यापाशी येत त्याचा गाल थोपटत म्हणाली, “तुम्हाला बरं वाटत नाहीये. झोपा आता. आपण सकाळी बोलू.”

तो चिडला. त्याने तिला दूर ढकललं.

“मला काही झालेलं नाहीये. आय अॅम परफेक्टली ऑलराईट. आणि हे लहान बाळासारखं थोपटणं बंद कर. मला ते आवडत नाही. माझ्यात आत्महत्या करायची हिंमत नाही म्हणून मी तुझ्याकडून मदत मागतोय. मी तुझा नवरा आहे ना? तुझं सर्वस्व? माझी एवढीशी इच्छाही तू पूर्ण करणार नाहीस?”

“काहीही वेडंवाकडं बोलू नका. मी स्वतःच्या हाताने स्वतःला विधवा करू असं तुम्ही म्हणूच कसं शकता?”

“फिल्मी बायकोसारखे डायलॉग मारू नकोस. तुझ्यासारख्या मॉड मुलीने विधवा संकल्पनेवर विश्वास ठेवायचं काही कारण नाही. मी एक दगड आहे. आणि तू या दगडावर जन्मभर डोकं आपटत राहावं अशी माझी इच्छा नाही.”

“काय बोलताय काहीच कळत नाहीये. माझं काही चुकलंय का? तसं असेल तर स्पष्ट बोला. पण प्लीज, अशा मरण्यामारण्याच्या गोष्टी करू नका.”

“नाही. तुझी काहीच चूक नाहीये. चूक माझीही नाहीये. एका नको असलेल्या अनैसर्गिक गोष्टीचे परिणाम भोगतोय मी. पण ते मला यापुढे भोगायचे नाहीत. तू प्लीज मला मारून टाक. दॅट इज ऑल आय वॉन्ट.”

तिच्या चेहऱ्यावर कणखर भाव आले. ती ठामपणे म्हणाली, “मला हे तुमचे सॅडिस्टिक गेम खेळण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये, कळलं? आणि तुम्हीही हा वेडेपणा डोक्यातून काढून टाका. नाहीतर -”

“नाहीतर काय?”

“मला नाईलाजाने बाहेर जाऊन सगळ्यांना इथं बोलावून आणावं लागेल.” ती दरवाज्याकडे पाहत म्हणाली.

“शटाप.” इच्छा नसूनही तो तिच्यावर ओरडला. “डोकं फिरलंय तुझं? अख्ख्या घरासमोर माझा तमाशा करशील?”

“हो. तेव्हाच तुम्ही असल्या मूर्ख गोष्टी बडबडणं बंद कराल.”

त्याने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. बोटांना मोठमोठी अणकुचीदार नखं फुटून ती चेहऱ्यात घालून चेहरा फाडून टाकता आला तर किती बरं होईल असं त्याला वाटलं. आता हिला कुठल्या पद्धतीने समजवावं ते त्याला कळेना. त्याला तिने जवळपास निरुत्तर करत आणलं होतं. आणि म्हणे जबरदस्ती करणार. एकतर जबरदस्ती करणं त्याला जमत नव्हतं किंवा जबरदस्ती करूनही हवा तो परिणाम साध्य करता येत नव्हता.

चेहऱ्यावरील हात काढून त्याने सुरा उचलला. पुन्हा तिच्या हातात दिला.

“माझी तुला शपथ आहे. प्लीज एवढं काम कर माझं.”

“का? का तुम्ही मला असं करायला सांगताय?” एव्हाना अगतिक झालेली ती म्हणाली. “मघाशी तुम्ही किती चांगले गप्पा मारत होतात. मग अचानक असं काय झालं? का मी तुम्हाला मारून टाकावं असं तुम्हाला वाटतंय?”

“ते महत्त्वाचं नाही. माझ्याकडे कारण आहे. पण मी ते तुलाच काय कुणालाही सांगू शकत नाही. इतरांना माझ्यामुळे त्रास व्हावा अशी माझी इच्छा नाही.”

“नाही हो. मी तुम्हाला नाही मारू शकत. ज्या मुलीचं नवीन नवीन लग्न झालंय, जिने आपल्या मॅरेज लाईफविषयी कलरफुल स्वप्नं पाहिलीयेत, ती आपल्या नवऱ्याला का म्हणून मारेल?”

“फक यू.” त्याची प्रतिक्रिया तीव्र होती. आता त्याला खराखुरा संताप आलेला होता. तो उठला आणि पाठमोरा उभा आहे. ही गंभीर गोष्ट आता डेली सोपमधल्या सीनसारखी अॅब्सर्ड आणि कॉमिक होत चालली होती. चिमटीने कपाळ आणि नाकातला भाग पकडून, डोळे घट्ट मिटून त्याने संताप कमी करायचा प्रयत्न केला. मग वळून तिच्याकडे बोट केलं.

“यू नो व्हॉट, यू आर सो डंब दॅट यू आर नॉट गेटिंग द सिरीयसनेस ऑफ द सिच्युएशन. तुला वाटतंय हा एखादा डेली सोपमधला सीन चालूये. आणि आपल्या खतरनाक अॅक्टिंगने हा सीन आणखी ताणत ऑडियन्सचा इंटरेस्ट खेचता येईल.” तो बोलला आणि तिच्या अगदी जवळ येऊन बसला. “फाईन. तुला कारण ऐकायचंय ना? ऐक मग. मी तुझ्यासोबत संसार करू शकत नाही. का? तर एक नवरा म्हणून मी अतिशय नालायक आणि बेजबाबदार आहे. शिवाय मला स्त्रियांची अॅलर्जीही आहे. इतकी कारणं पुरेशी आहेत? की आणखी दोन तीन अॅड करू?”

“तुम्ही ही नाटकं का करत आहात?’ ती म्हणाली. ‘लग्नात तर तुम्ही किती आनंदी दिसत होतात.”

“मी लग्नात खरंच आनंदी होतो. मला खूप आशा होती की आनंद पुढेही टिकावा. इव्हन, थोड्या वेळापूर्वीही मी तसा प्रामाणिक प्रयत्न करत होतो. पण – जाऊ दे. आपल्या दोघांच्याही नशिबात संसारसुख नाही. त्यामुळे ह्या रिलेशनशिपलाही काहीच अर्थ नाही. ते संपलेलंच बरं.”

“खरंच इतका त्रास होतोय तुम्हाला ह्या लग्नाने?’ ती कडवट पण खिन्न स्वरात म्हणाली. ‘मग ते तुम्ही केलं तरी कशाला?”

हा प्रश्न कधीना कधी या संभाषणात येणार याची त्याला खात्रीच होती. त्याच्याकडे उत्तर होतं; पण ते त्याचा बचाव करणारं होतं, त्याला सहानुभूती मिळवून देणारं होतं. त्याला सेफ झोनमध्ये जायचं नव्हतं. त्याला फक्त मरायचं होतं. मरायची नशा त्याच्यावर वेगात चढत होती.

“आता काही फायदा आहे का हा प्रश्न विचारून?”

“हे बघा, मला कळतंय तुमचा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे. पण तो आता फक्त तुमचा प्रॉब्लेम नाहीये. माझाही आहे. प्लीज तो माझ्यासोबत शेअर करा, आपण मिळून त्यावर उपाय शोधू. मी तुमची बायको आहे. माझ्यावर इतका तरी विश्वास ठेवा.”

“ज्या नात्याला कसलं भविष्यच नाहीये त्यावर विश्वास ठेवून मी काय करू?” त्याचा आवाज चढला. “आता कशावरही विश्वास ठेवावासा वाटत नाही. स्वतःवरही नाही. सगळं संपल्यात जमा आहे. आणि जर सगळं संपलंच असेल तर मी तरी कशाला मागे राहावं?” तो थांबला आणि काहीतरी सुचल्यागत म्हणाला, “आता मला कळलं तू केव्हाची नाही का म्हणतेयस. मला मारल्यावर तुला जेल होईल, हेच ना? डोन्ट वरी. मी गादीखाली सुसाईड नोट ठेवलीये. तू घरच्यांना आणि पोलीसांना फक्त इतकंच सांगायचं, की तू खोलीत आलीस, आपण पलंगावर बसून बोलू लागलो. अचानक मी पिसाळलो. वेड्यासारखी बडबड करू लागलो. गादीखालून सुसाईड नोट काढून तुझ्या हातात ठेवली. मग सुरा काढून छातीत खुपसून घेतला. बास. सगळं आत्महत्येसारखंच होईल. मानसिक संतुलन ढळल्याने नवविवाहित युवकाने लग्नाच्या पहिल्या रात्री केली आत्महत्या असं उद्याच्या पेपरात छापूनही येईल. इतकं सिम्पल अँड साऊंड आहे हे. येतोय का कुठे तुझ्यावर खुनाचा आरोप?”

“आधी तर मला फक्त शंका होती.” ती जराशी मागे सरकत म्हणाली. तिचं तोंड कोरडं पडलं होतं. “पण तुमच्या डोळ्यातील वेडेपणा आता उघड उघड दिसतोय.”

“तू मला वेडा म्हणतेयस?”

“नाही हो. माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. हे बघा, प्रॉब्लेम्स सगळ्यांना असतात. पण ते सॉल्व्ह करण्याऐवजी आपण त्यांचे लाड करू लागलो, त्यांना पाठीशी घालू लागलो, तर ते आपल्याला दाबू पाहतीलच ना. यू मस्ट नॉट डिफेन्ड देम. त्यांना बाहेर काढा. काही ना काही उपाय असेलच.”

एखाद्या पाणघोड्याला नाचताना पाहून आ वासावा तसा तो तिच्याकडे पाहत राहिला.

“अरे काय पांचटपणा चालूये केव्हाचा. तुला खरंच कळत नाहीये का माझी सिच्युएशन? की मी गंमतच करतोय असं तुला वाटतंय?”

“मला कळतंय हो. सगळं कळतंय. मी इतकंच म्हणतेय की सगळं काही ठीक होऊ शकतं.”

“सगळं काही फक्त पिक्चरांमध्ये ठीक होतं. खऱ्या आयुष्यात फक्त गांड मारली जाते. आणि ती ही पूर्ण फाडून. तुला फक्त घटनेचं गांभीर्य कळतंय, त्याची रेंज नाही कळते. अनैसर्गिक प्रॉब्लेम्स कधीच सॉल्व्ह होत नाहीत. त्यांना फक्त पसरणं माहीतीये. व्हायरससारखं. मला तर कधी कधी वाटतं हा व्हायरसच आहे माझ्या शरीरात.”

“पण जर तुम्ही सांगणारच नाहीत तर प्रॉब्लेमचं स्वरूप तरी कसं कळेल? कदाचित ज्या गोष्टीला तुम्ही इतक्या बिग लेव्हलवर इमॅजिन करत आहात ती प्रत्यक्षात फारच क्षुद्र असेल. म्हणून म्हणते, प्लीज हा तुमचा हट्टीपणा सोडा. मला तुमची मदत करू द्या.”

“तेच. तुला खरंच कळत नाहीये या प्रॉब्लेमची रेंज. हे सगळं प्रकरण कुणाची मदत घेण्यापलीकडे गेलंय. हा नुसता फोबिया नाहीये. मला आता नव्यानेच ज्ञान होतंय. हा राक्षस आहे. किंवा एखादा एलियन. त्याला ड्रॅगनसारखे पंख आहेत. ऑक्टोपससारखा चेहरा आहे. त्याचा रंग ग्रीनिश ग्रे आहे. अगदी पायरेट्स ऑफ द कॅरिबियनमधल्या भुताळी जहाजाच्या कॅप्टनसारखा दिसतो तो. मला त्याच्यापासून सुटका हवीये. नाहीतर तो मला त्याचा गुलाम करून टाकेल.” आणि त्याने सुऱ्याकडे इशारा केला.

ती त्याच्या विनवण्या करू लागली. “नाही हो. मी नाही असं करू शकत. मी तुमची सिच्युएशन समजून घेतलीये. आता माझी सिच्युएशन समजून घ्या. मी प्रेम करते तुमच्यावर. माझ्या प्रेमाची थोडीतरी कदर करा.”

“मला तुझं प्रेम नको, तू नको आणि हे लग्न तर नकोच नको.” तो दातओठ खात म्हणाला. “तुझ्याबरोबर आत्ताचे हे काही क्षण काढणं जर मला अवघड जातंय तर तुझ्याबरोबर संसार करणं माझ्यासाठी केवढी मोठी सत्वपरीक्षा असेल?” तो थांबला नि मग पडक्या चेहऱ्याने पुढे बोलू लागला, “तुला बिल्कुल म्हणजे बिल्कुलच कळत नाहीये. मी तुझ्याबरोबर नाही राहू शकत. मी या जगातही नाही राहू शकत. मला इथून मुक्त व्हायचंय. म्हणून मी तुझी मदत मागतोय तर तुला विधवा व्हायची भीती वाटतेये. तू पण स्वार्थीच निघालीस. माझ्या दुःखाचं तुला काहीच नाही. माझ्यात हिंमत असती तर तुला इतक्या विनवण्या केल्याच नसत्या. तू माझ्या इनकॅपॅबिलिटीचा फायदा घेतेयस. स्वतःच्या सुखासाठी मला जगवू पाहतेयेस. माझी मरण्याची गरज तुला कळूनच घ्यायची नाहीये.”

मग एक भयाण शांतता पसरली. त्याची वाद प्रतिवाद करण्याची शक्ती आता संपली होती. आणि तसंही बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. तिचा चेहरा रडवेला झाला होता आणि ती मूक हुंदके देत होती. त्याचा संयम केव्हाच संपला होता. तिच्याशेजारी बसून तिला रडताना पाहणं त्याला विचित्र वाटत होतं. आपण तिचं भलं करू पाहतोय तर ती हटवादीपणा करून आपल्याला आपल्या निर्णयापासून परावृत्त करू पाहतेय हे त्याला आवडत नव्हतं. आयुष्याची २५ वर्षं फुकट घालवली, त्याने विचार केला. निव्वळ एक टक्का हिंमतही आपल्याला गोळा करता आली नाही.

थोड्यावेळाने शांततेचा भंग करत कापऱ्या आवाजात ती म्हणाली, “हे बघा, कुठली गोष्ट तुमच्या अस्तित्वाला आतून खातेय मला माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की की, त्या गोष्टीपासून सुटका करून घ्यायची तुमची इच्छा नाही. ती गोष्ट तुम्हाला प्रिय झालीये. ती आपल्यासाठी हानिकारक आहे हे माहीत असूनही तुम्ही तिचे लाड करत आहात. त्या गोष्टीचं अस्तित्त्व शाबूत राहावं म्हणून स्वतःचा जीव घ्यायला तयार आहात. आय अॅम सॉरी. तुम्ही मला स्वार्थी म्हणा, आपमतलबी म्हणा, पण तुम्हाला मारण्यात मी त्या गोष्टीची मदत करणार नाही. स्वतःच्या नवऱ्याला मारायचं नीच काम मी करणार नाही.”

त्याने तिच्याकडे पाहून निराशेने मान हलवली. या जगात कुणी आपला खून करावा इतकीही आपली लायकी नाही हे त्याला भयानक वाटलं.

“रिपीटेशन नावाची एक फिगर ऑफ स्पीच आहे.” तो आता खऱ्याखुऱ्या उपहासाने बोलू लागला. “म्हणजे तेच ते तेच, तेच ते उगाळत राहणे. अँड दॅट इज व्हॉट यू आर डुइंग फॉर द लास्ट फकिंग अवर. तुला वाटतं तू सारखा विरोध करत राहशील आणि तुझ्याच सतीसावित्रीच्या आख्यानावर अडून राहशील तर मला झक मारून माझा निर्णय बदलावा लागेल. देन आय हॅव टू से दॅट, यू आर अ फकिंग क्लेव्हर बिच. अँड यू हॅव टोटली आऊटडन मी.” आणि अस्सल वेड्यासारखं हसत तो टाळ्या वाजवू लागला.

तिच्या मनात धोक्याची घंटा वाजली. हे तर मघाच्या प्रकाराहून जास्त भयानक होतं. अत्यंत निराश असलेला म्हणून अचानक वेड्यासारखा हसू लागतो तेव्हा एकतर त्याने आहे ती परिस्थिती स्वीकारलेली असते किंवा ती परिस्थिती टाळण्यासाठी टोकाचं पाऊल उचलायचं ठरवलेलं असतं.

“आता मी तुला अजिबात विचारणार नाही की तू माझा खून कर.” वेड्यासारखं हसणं थांबवून नॉर्मल आवाजात तो म्हणाला. “फक्त एकच छोटीशी गोष्ट कर.”

“काय?”

“चेहरा नीट कर. रडताना चांगली दिसत नाहीस तू.”

हे वाक्य तिला सर्वस्वी अनपेक्षित होतं. ती त्याच्याकडे नवलाने पाहू लागली. त्याच्या नजरेतील बुभुक्षितता तिला जाणवली. आपल्या शरीरात आग भडकतेय असं त्याला वाटलं. तिचं शरीर. कोवळं आणि अनाघ्रात शरीर. ते त्याला खुणावत होतं. झेप घेतल्यासारखं पुढे येऊन त्याने तिला झोपवलं. डोक्यावरचा पदर काढला. केस मोकळे करून त्यातून बोटं फिरवली. मग वाकून तो तिची चुंबनं घेऊ लागला. कपाळ, नाक, गाल, मान. शेवटी ओठ. ओठांचं दीर्घ चुंबन घेतलं. दोघांच्या जीभा एकमेकांत अडकल्या. शरीरातून सुखाच्या लाटा वाहू लागल्या. शरीर रसरसत्या ऊर्जेने भरतंय असं त्याला वाटलं. चुंबन घेतल्यावर तो सरळ झाला. तिचा ब्लाऊज काढला. मग ब्रा. गोल गुलाबी भरदार छाती. त्यावरून हात फिरवताना त्याला आनंददायक विजेचे झटके बसले. मग त्याने पूर्ण साडी आणि अंडरगारमेंट्स काढून तिला नग्न केलं. गळ्यातले अलंकार काढले. कानातल्या इयरिंग्ज. मग हातातल्या बांगड्या. मग पायातल्या पैंजण. काहीच राहू दिलं नाही त्याने तिच्या शरीरावर. अचानक कुठली किल्ली फिरवल्याने आपल्या नवऱ्यात इतका बदल झाला तिला कळेना. पण जे होत होतं त्याने तिला आनंद झाला. आता ते निराश नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि सेक्ससाठीची आतुरता होती. शेवटी ती जिंकली होती. मघाशी घडलेलं सगळं एखाद्या वाईट स्वप्नासारखं विरत होतं.

तिच्या शरीरावर पुन्हा ओणावत प्रेमळ आणि मृदु आवाजात तो बोलू लागला, “आजपर्यंत मला अनेक वाईट लोक भेटले. त्यांनी कायम माझा कायम तिरस्कार केला, माझा अपमान केला, मला अंडरइस्टिमेट केलं, पण मी सगळं दुःख मनातल्या मनात दाबून टाकलं. कारण मला वाटायचं की हे लोक जे काही करताहेत ते चूक आहे हे त्यांना एके दिवशी कळेल आणि त्यांना पश्चात्ताप मला करावा लागला. माझी चूक नसतानाही.

पण काही चांगले लोकही भेटले ज्यांनी खरोखरच माझ्यावर प्रेम केलं आणि माझं चांगलं व्हावं असं त्यांना वाटलं. पण माझ्या निरर्थक आयुष्यात त्यांचा चांगुलपणा काही उपयोगाचा नव्हता. उलट माझ्या दुःखाची लागण त्यांना होईल अशी मला भीती वाटायची. तेव्हा मी त्यांच्यापासून दूर दूर जायचो. त्याच चांगल्या लोकांपैकी तू एक आहेस. माझ्यामुळे तुझं आयुष्य बरबाद व्हावं असं मला वाटत नाही. म्हणून मी तुला मला मारायला सांगत होतो.” सुरा उचलून त्याने स्वतःच्या छातीला लावला. “तू अगदी टोकाची भूमिका घेऊन माझ्या इच्छेला नकार दिलास. पण माझ्या दुःखात तुला माझ्यासोबत फरफटत नेण्याचा निर्णय मी घेऊ शकत नाही. त्यामुळे आता शेवटी मलाच हिंमत करावी लागणार आहे. आय अॅम सॉरी. मी तुझ्याशी चांगलं वागत नाहीये; पण मला तुझ्या सुखाची काळजी आहे. माझ्यामुळे तुझ्यावर येऊ घातलेल्या दुःखातून मी तुझी मुक्तता करतोय. आय होप, तू मला समजून घेशील.”

त्याच्या चेहऱ्यावर हिंस्र जनावरासारखे भाव उमटले. ती नखशिखांत घाबरली. तिने ओरडण्यासाठी तोंड उघडलं; पण त्याने डाव्या हाताने तिचा गळा दाबला आणि उजव्या हातात धरलेला सुरा खाली करून तिच्या शरीरावर बेफामपणे घाव घालायला सुरुवात केली. रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या. पहिल्या दोन घावातच तिचा खेळ संपला होता. पण त्याला याची शुद्धच नव्हती. त्याने सुरा तिच्या कपाळातून आरपार घातला आणि चाकूने टरबूज उभं चिरावं तसा खाली नेत हनुवटीपर्यंत तिचा चेहरा चिरून काढला. इथं तो थांबला. त्याने सुरा टाकून दिला आणि थरथरत मान खाली घालून बसला. त्याचे कपडे रक्ताने माखले होते. चेहऱ्यावरही काही थेंब चमकत होते. गादीही रक्ताने फुलत होती. त्याच्या डोक्यात एकच विचार होता. बायकोचा इतका निर्घृणपणे खून केल्याबद्दल फाशीची शिक्षा नक्कीच होत असेल. मेल्यानंतर त्याची बायको त्याला मुक्त करण्यात मदत करणार होती.

मान वर करून त्याने तिच्या प्रेताकडे पाहिलं. मृत्यू इतका सुंदर दिसू शकतो हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कुणालाच खरं पटणार नाही.

— इमॅन्युएल व्हिन्सेंट सँडर 

लेखक चित्रपटप्रेमी आहेत. लेखकाशी संपर्क साधण्याचे माध्यम: Facebook

सदर लेखाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी किंवा फेसबुक चर्चेत भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.