गोईंग होम

दिग्दर्शक विकास बहल यांची ‘गोईंग होम’ ही शॉर्ट फिल्म जेव्हा पहिली होती तेव्हा आपण एक फँटसी फिल्म पाहत आहोत असं वाटून गेलं आणि इथेच आपण स्त्री म्हणून अजूनही किती इन्सिक्युअर आहोत ह्याची जाणीव झाली. वरवर पाहता साधीशी गोष्ट. ‘आलिया’, एक तरुण मुलगी रात्रीच्या वेळेस एकटी गाडीतून जात असताना तिची गाडी बंद पडते. रस्ता सुनसान… तिला एक गाडी दिसते रस्त्याच्या त्या बाजूला. त्यात पाच तरुण मुलगे असतात. त्यांच्या डोळ्यात एक प्रेक्षक म्हणून आणि एक स्त्री म्हणून मला वासना खच्चून भरलेली दिसते. ते त्यांची गाडी तिच्या गाडीच्या अगदी जवळ आणतात आणि थांबवतात . इथे माझं हृदय अतिप्रचंड वेगात धडधड करायला लागतं. आलियाने ह्या लांडग्यांना बघून पटकन गाडीत बसून जावं आणि दारं लॉक करून घ्यावीत असं मी मनोमन म्हणत असताना ही त्यांना हात करून थांबवते आणि गाडीला चालू करता येईल का ह्यासाठी मदत मागते. सगळी पोरं एकेक करून बाहेर पडतात. 

हिला खुपसून आता सटकावं असा विचार त्यांच्या डोक्यात आहे हे मला स्पष्ट दिसतं. गाडीचं बॉनेट उघडून काही करता येतंय का हे बघितल्यावर ती ह्यांना म्हणते की मला घरी सोडाल का? ह्या क्षणाला त्या पोरांच्या मनात आलेल्या आनंदाच्या उकळ्या आणि सापडलं सावज ही भावना मला स्पष्ट दिसत असते. ह्या पोरीच्या डोक्यात प्रकाश पडु दे असं मनोमन मला वाटत असताना ही बया चक्क त्यांच्या गाडीत जाऊन बसते. पुढच्या सीटवर दोन पोरांच्या मध्ये बसलेली आलिया, मागच्या सीट वर बसलेले तीन पोरं जे गाडी चालवणाऱ्या मित्राला खुणेने काहीबाही सांगत आहेत. रात्रीची वेळ, गाडीतल्या पाचही पोरांच्या तोंडातून टपकणारी लाळ आणि हे जणू काही अस्तित्वात नाहीचे इतक्या निरागस हास्यासमवेत बसलेली आलिया. या क्षणाला मी अतिप्रचंड अस्वस्थ होऊन ‘अगं मुली, निघ बाहेर त्या गाडीतून… वेडी आहेस की काय?’ असं आवेशात ओरडते आहे. हातात तलवार वगैरे असती तर लढायला सिद्ध हा फेमिनिस्ट पवित्रा घेऊन मी तय्यार! 

गाडी चालायला लागते. ही पठ्ठी हसत खेळत अगदी निवांत होऊन आपल्या घराला जाण्याची दिशा सांगत असते . पोरांच्या चेहेऱ्यावर ‘कब इसको दबोचे’ टाईप्स भाव! कोणत्याही क्षणी हे लोक गाडी चुकीच्या दिशेने वळवतील आणि पोरीची इज्जत (हा एक अतिशय मनोरंजक शब्द) का काय असते ती जाणार हे मी गृहीत धरून, अगदी कंठाशी आलेल्या प्राणांसकट, नख कुरतडून हिंमत मिळवत बघते आहे. पण… गाडी चालवणारा मुलगा ती म्हणेल तसं गाडी वळवतो आणि तिला भर रात्री तिच्या घराच्या समोर ते पोहचवतात… ही उतरते आणि त्याच निरागस हास्याने त्यांचे आभार मानून घरी जायला वळते. आणि गोष्ट संपली? पहिला प्रश्न पडला की हे कसं शक्य आहे? हे अगदीच अतर्क्य आणि इल्लॉजिकल आहे. मग स्क्रीनवर एक ओळ आली.

“Impossible in real world … can we give her the world that she believes exists?”;

“वास्तविक आयुष्यात हे अशक्य आहे… आपण तिला ते जग देऊ शकतो का, जे तिला वाटतंय अस्तित्वात आहे?”

हे वाचल्यावर दोन गोष्टी जाणवल्या. एक म्हणजे असं जग अस्तित्वात आहे हा तिचा विश्वास आहे. तिला हा विश्वास कसा काय वाटू शकतो हा मला प्रश्न पडला. तिच्या ह्या विश्वासामुळे ती अतिशय भोळी आणि म्हणून वेडी मुलगी आहे असं मला वाटलं आणि खरं सांगू, मला स्वतःची खूप लाज वाटली. कारण हे असं वाटणं नैसर्गिक आहे. सतत स्वतःवर कंट्रोल ठेवून, स्वतःला सांभाळत, घड्याळ्याच्या काट्यानुसार काय घालायचं, कुठे जायचं, कसं वागायचं हे ठरवणं, रात्रीच्या काळोखाचा बागुलबुवा घेऊन जगत राहायचं, रिक्षात बसताना सगळं नीट तपासून घ्यायचं, ओला- उबरचं ट्रॅक माय राईड वापरायचं, इमर्जन्सी एप आपल्या मोबाईलवर आहेत ह्यात समाधान मानायचं, गळा जास्त डीप तर नाहीयेना, ब्रेसीयरच्या पट्ट्या दिसत तर नाहीयेत ना, अमुक एक टॉप जास्त टाईट आहे का? तमुक एक ड्रेस जास्त शॉर्ट आहे का? सतराशे साठ प्रश्न… सतत लक्ष ठेवायचं.

तसं पाहता एक समाज म्हणून एका स्त्रीला रात्रीच्या वेळेस गाडी बंद पडली तर असहाय वा भीती न वाटता मदत मागून आपण घरी वन पीसमध्ये पोहचू शकतो ही गोष्ट अशक्य वाटणं म्हणजे लाजिरवाणी गोष्ट! ह्या जागी जर एक पुरुष असता तर त्याला इतकं इन्सिक्युअर वाटलं असतं का? मग स्त्रीला का बरं स्वतःचा बचाव करावा असं वाटत राहतं? शरीरातले उंचवटे आणि एक भोक हे इतकं हतबल का करत असावं बाईला? पण ही भीती, असुरक्षितता हा बाई असण्याचा एक भाग बनून गेलंय असं जाणवलं. कदाचित प्रत्येक स्त्री मध्ये कमी अधिक प्रमाणात असेल पण आहे हे मात्र खरं. समोरच्या पुरुषावर लगेच विश्वास नाही ठेवायचा हे कसं आणि कुठून माझ्यामध्ये आलं ह्याचा विचार केला. प्रत्येक व्यक्ती अनुभवातून शिकत असते. स्त्रीला जर समाजाकडून, पुरुषांकडून ती एक वापरायची वा उपभोगाची वस्तू नसून तिला तिच्या शरीराच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून पाहिलं जातंय असं जाणवलं तर कदाचित ती सुद्धा निर्धास्त होऊन जगू शकेल. ह्या शॉर्टफिल्ममधल्या आलियासारखी अनोळखी पुरुषांवर विश्वास ठेऊ शकेल. मग कदाचित ही फिल्म फँटसी वाटणार नाही. एक समाज म्हणून ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की स्त्रीला एक माणूस म्हणून जगता यायला हवंय. आज विचार केला तर अशक्य वाटणारी ही गोष्ट निदान माझ्या पुढच्या पिढीतल्या मुलींना, बायकांना शक्य वाटायला हवी असं एक आई म्हणून, स्त्री म्हणून आणि व्यक्ती म्हणून मला वाटतं. सकाळी, दुपारी अथवा रात्री अगदी कोणत्याही वेळेस आपल्या घराकडे परतीचा प्रवास करणाऱ्या ‘ती’ला, ती केवळ स्त्री आहे म्हणून असुरक्षित वाटू नये अशी आशा मी मात्र बाळगून आहे… आजही!

— सानिया भालेराव

लेखिका चित्रपटप्रेमी असून वृत्तपत्रांकरिता स्तंभलेखन करतात. लेखिकेशी संपर्क साधण्याचे माध्यम: Facebook.

सदर लेखाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी किंवा फेसबुक चर्चेत भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.