आश्वासक तरुणाईचा आशयघन सिनेमा

२१ फेब्रुवारी २००६ मध्ये भारतीय मीडियाने पुरावलेला पिच्छा आणि केस तडीला नेण्याचा दृढ निश्चय यामुळे तब्बल सात वर्षांनी जेसिका लाल हत्याकांडाची केस कोर्टामध्ये पुन्हा सुरू झाली.

राकेश ओमप्रकाश मेहरा-आमिर खान यांचा नुकताच २६ जानेवारी २००६ ला प्रदर्शित झालेला ‘रंग दे बसंती’ अजूनही थिएटरमध्ये होता. ‘अन्याय होत असेल तर तो सहन करण्यापेक्षा आपापल्या परीने उठाव केला पाहिजे’ ही भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि आझाद यांची शिकवण आदर्श मानून दिल्लीमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या कॉलेजवयीन मुलांची कथा ‘रंग दे बसंती’ सांगतो.

या चित्रपटात असणाऱ्या ‘कँडल मार्च’च्या प्रसंगाचे पडसाद एवढे काही खोल उमटले की जेसिका हत्याकांडाच्या केसमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला संपूर्ण भारतीय तरुण वर्ग हातात मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरला. परिणामी सब्रीना (जेसिकाची बहीण) आणि मीडियाच्या प्रयत्नांना हजारो बाहूंचे बळ मिळाले. या साऱ्याचा कोर्टामधील खटल्यावर साहजिकच परिणाम झाला आणि सब्रीनाला न्याय मिळाला. त्यावेळी बिना रामाणी (सामाजिक कार्यकर्त्या) यांनी या केसच्या यशामागे ‘रंग दे बसंती’ आणि त्यातून प्रेरित होऊन तरुण वर्गाने केलेला कँडल मार्च यांचा सिंहाचा वाटा आहे असं नमूद केलं होतं.

२१ व्या शतकातील हिंदी चित्रपटाने प्रेरित होऊन, उद्युक्त होऊन तरुण वर्गाने घडवून आणलेल्या बदलांमधील ठळक असा हा दुसरा प्रसंग. यापूर्वी २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या आशुतोष गोवारिकर-शाहरुख खान यांच्या ‘स्वदेस’मध्ये नासामध्ये शास्त्रज्ञ असलेला मोहन भार्गव जेव्हा भारतात काही दिवसांसाठी परततो तेव्हा शिक्षण, तंत्रज्ञान, मूलभूत सुविधा यांचा अभाव आणि त्यातून निर्माण झालेली गरिबी यात अडकलेल्या ‘आपल्या देशाला’ आपली खरी गरज आहे याची जाणीव त्याला होते. आणि ‘स्वदेस’ मार्फत हजारो परदेश-स्थित भारतीयांना हीच जाणीव झाल्यामुळे ते भारतात परतले होते.

चित्रपट हे माध्यम मनोरंजनासाठी आहे, प्रेक्षकाला घटकाभर रोजच्या त्रासदायक जगण्यातून विश्रांती देण्यासाठी आहे, ललित कलांच्या निर्मितीचं तेच मूळ ध्येय होतं हे सगळे विचार कितीही योग्य असले तरी चित्रपटामार्फत आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं वास्तव चित्रण, सामाजिक प्रश्न, समस्या, त्या संदर्भात एक नागरिक म्हणून असणारी आपली भूमिका या सर्व गोष्टी दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणं हे सुद्धा चित्रपटांचं कर्तव्यच आहे. आणि विशेष म्हणजे असं केल्यावर त्याला प्रतिसाद देणारा तरुण वर्ग, पर्यायाने समाज आपल्याकडे आहे.

सामाजिक प्रश्न, समस्या आणि नागरिक म्हणून आपली भूमिका हे मुद्दे कथानकात गुंफून पटकथा लिहिणं, प्रेक्षकांची चित्रपटाकडून असणारी प्राथमिक अपेक्षा म्हणजे मनोरंजन सुद्धा पूर्ण करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षागृहातून बाहेर पडताना चित्रपटाने (उपदेश दिला यापेक्षा) एक विचार दिला ही भावना निर्माण करणं हे सगळं अवघड असलं तरी शक्य आहे आणि याची गरज सुद्धा आहे. गरज आहे कारण आपण जेव्हा अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर ही दोन सर्व जाती, धर्म, भाषा या कल्पना ओलांडून लोकांना जोडणारी सामायिक नावं आहेत असं म्हणतो, तेव्हा त्यातील एक नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील आहे! आपल्याकडे अभिनेत्यांना प्रेक्षकांकडून ‘लार्जर दॅन लाईफ इमेज’ प्राप्त झाली आहे. त्यांनी केलेल्या गोष्टींना आदर्श मानून चालणारा तरुण वर्ग आपल्याकडे आहे. शिवाय चित्रपट हे अत्यंत प्रभावी, समाजामधील सर्व स्तरांमध्ये सहज पोहोचणारं अत्यंत ताकदीचं माध्यम आहे.

सध्याच्या चित्रपटांमधून हाताळले गेलेले विषय, निर्माता-दिग्दर्शक-लेखक यांना त्यासाठी मिळालेले स्वातंत्र्य, त्यांनी स्वतःचा निवडलेला नायक, त्याने अवलंबलेला मार्ग हे सगळं अचानक निर्माण झालेलं नाही. तर त्याची उत्तरं ८० च्या दशकापासून सुरू झालेल्या आणि ९० च्या दशकात प्रकर्षाने जाणवणाऱ्या बदलांमध्ये आहेत. ८० च्या दशकाचा विचार केला तर चित्रपटांमधून हाताळले गेलेले विषय, समाज आणि सरकार यांच्याकडून येणारा दबाव, त्यामुळे विषय निवडण्यावर असलेल्या मर्यादा, जुन्या पिढीने केलेले चित्रपटातील प्रयोग फसल्याने घेतलेला धसका, त्यांना मिळालेले अमिताभ बच्चन आणि अमोल पालेकर हे दोन अतिभिन्न पद्धत अवलंबणारे पण सामायिक हेतू असणारे नायक या साऱ्या क्लिष्ट समीकरणातून ९० च्या दशकापासून सुटका व्हायला सुरुवात झाली.

जागतिकीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे निर्माण झालेली मल्टिप्लेक्सची संकल्पना, त्यात झालेली कमालीची वाढ, प्राथमिक गरजांच्या पलीकडे जाऊन पैसे खर्च करण्याकडे कलणारी सामान्य तरुण वर्गाची मानसिकता, पिढ्यांच्या मानसिकतेतील कमी होत जाणारी दरी, लोकांकडून होणारी आणि वाढत जाणारी चांगल्या करमणुकीची अपेक्षा या सर्वच गोष्टी उत्तम चित्रपट निर्मितीला चालना देणाऱ्या आहेत.

आणि याचीच दुसरी बाजू म्हणजे चित्रपटसृष्टीमध्ये येणारे नव्या दमाचे तरुण लेखक-दिग्दर्शक. ही चित्रपटसृष्टीतील तरुण फळी स्वाभाविकपणे देशातल्या कोट्यवधी तरुण पिढीचं नेतृत्व करत आहे. त्यांना आपल्या माध्यमावर आणि विषयावर जेवढा विश्वास आहे तेवढाच चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांवर आहे. आपण मांडलेला विचार आपला प्रेक्षक जाताना घरी घेऊन जाईल, त्यावर विचार करेल, विचारांचं कृतीत रूपांतर होईल आणि थोड्याफार प्रमाणात का होईना बदल घडून येईल अशी अपेक्षा केली जाऊ शकते.

या साऱ्या विचार प्रक्रियेचं अपत्य म्हणून २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सामाजिक प्रश्न, समस्या मांडणाऱ्या, त्यावर समाजाला विचार करायला भाग पाडणाऱ्या, सोबत मनोरंजन करत असतानाच विषय-मांडणीमध्ये कमालीची विविधता बाळगणाऱ्या तब्बल आठ ते दहा चित्रपटांकडे पाहता येतं. ही दरवर्षी वाढत जाणारी संख्या आश्वासक तर आहेच, पण सोबतच तरुण पिढीला संबोधित करणारी आणि तिचं प्रतिनिधित्व करणारीही आहे.

यावर्षीच्या सुरुवातीलाच अनुराग कश्यपचा ‘मुक्काबाज’ हा ‘स्पोर्ट्स ड्रामा’ या जान्रमध्ये मोडणारा चित्रपट आला. विनीत कुमार सिंग जेंव्हा अनुरागकडे ही कथा घेऊन आला होता तेंव्हा अनुरागने त्याला “रॉकीपेक्षा तुझा श्रवण वेगळी कथा सांगतोय का?” असा प्रश्न विचारला. अनुरागला कथा वाचल्यानंतर त्याचं उत्तर मिळालं आणि ही कथा आपल्याच मातीतील आहे असं जाणवलं. याची प्रमुख दोन कारणं होती. पहिलं म्हणजे यामधील जातीभेद, आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे श्रवण सिंग हा नायक एका मोठ्या तरुण समाजाचं प्रतिनिधित्व करत होता, असा समाज जो या जातीव्यवस्थेचा बळी ठरला आहे आणि स्वतःमध्ये क्षमता असूनही परिस्थितीच्या दुष्टचक्रात पिचून गेला आहे. ज्यातून श्रवण सिंगचा बॉक्सिंगच्या रिंगमधील आणि रिंगबाहेरील अफाट संघर्ष इथं दाखवला जातो.

राजू हिरानी आणि रणबीर कपूरचा ‘संजू’ हा ‘बायोपिक’ जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा तो संजय दत्तचं चारित्र्य स्वच्छ कसा करतो याच चर्चांना उधाण आलं. पण या सगळ्यात चित्रपटात हाताळलेले ड्रग्ज आणि मीडिया हे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यामध्ये अनुक्रमे येणारे विषय मागे पडले. संजू पूर्वार्धात ‘ड्रग्ज’ हा मुद्दा अतिशय तीव्रतेने मांडतो. संजय दत्तचं अँटी ड्रग चळवळीचा ब्रँड अँबसिडर होणं आणि त्यामध्ये हजारो-लाखो तरुणांनी सहभाग घेणं याचाच भाग. तर आर. बाल्की आणि अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या ‘बायोपिक’मधून समाजामध्ये बदल घडवून आणण्याची प्रबळ इच्छा असलेल्या तरुणाची सत्यकथा सांगितली जाते. सॅनिटरी पॅड्स हा विषय मांडताना लक्ष्मीचा स्वतःच्या घरापासून सुरू झालेला संघर्ष त्याला जिद्दीच्या बळावर इंग्लंडपर्यंत घेऊन जातो. र. धों. कर्वे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जेंव्हा कुटुंब नियोजनाच्या प्रश्नांना हात घातला होता त्यावेळी त्यांच्यावर समाजाने केलेली टीका आणि यावर्षी पॅडमॅनने केलेली १०० कोटींची कमाई, सरकारने चित्रपटाला दिलेलं पाठबळ आणि सॅनिटरी पॅड संदर्भात राबवलेली मोहीम हे उदाहरणच स्वतःमध्ये सर्व काही सामावून घेणारं आहे.

राज आणि डी के यांचा प्रदर्शित झालेला ‘हॉरर कॉमेडी’ या प्रकारात मोडणारा ‘स्त्री’सुद्धा हसत खेळत स्त्रियांचं समाजातील महत्वाचं स्थान अधोरेखित करतो. तर ‘लव्ह सोनिया’ हा सेक्स ट्रॅफिकिंगचा चिंताजनक मुद्दा समोर मांडतो. ज्यात त्यातून बाहेर पडण्यासाठी एका तरुण मुलीचा समाज, कुटुंब आणि व्यवस्था यांच्या विरोधात केलेला संघर्ष दाखवतो. नेटफलिक्सकडून रिलीज झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या ‘अँथॉलॉजी’मध्ये चार लघुकथा आहेत आणि चारही कथानकांच्या केंद्रस्थानी स्त्रिया आहेत. सेक्स, पजेसिव्हनेस, विवाहबाह्य संबंध आणि पॅशन असे वेगवेगळे कंगोरे दाखवत, सोज्वळतेच्या कचाट्यातून बाहेर पडलेल्या, वेगवेगळ्या स्तरातील बोल्ड आणि फ्लॉड स्त्री पात्रांच्या साहाय्याने सांगितलेल्या कथा आणि स्त्रियांची स्वतःची बाजू असते हे समाजाला दाखवणं हे अगदीच महत्त्वाचं काम इथं केलं जातं.

अनुभव सिन्हाचा ‘मुल्क’ हा ‘कोर्ट-रूम ड्रामा’ या वर्षातील सर्वात महत्वाचा चित्रपट असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुराद अली मोहम्मद यांचा पुतण्या दिल्लीमध्ये एक बॉम्ब स्फोट घडवून आणतो. त्याच्या कुटुंबियांना या सर्व प्रकाराची  कल्पनाही नसते पण केवळ ते मुस्लिम असल्याने समाजाकडून त्यांच्या चारित्र्यावर आणि देशप्रेमावर शंका उपस्थित केली जाते. यामध्ये त्यांची सून आरती त्यांच्या बाजूने कोर्टात केस लढते, ही चित्रपटाची कथा. मणी रत्नमची टेररिजम ट्रिलजी, माचीस, ब्लॅक फ्रायडे यांच्याही पलीकडे जाऊन मुळात दहशतवाद म्हणजे काय या व्यापक प्रश्नाला नेमका हात इथं घातला जातो. दहशतवादाचं समाजासमोर असलेलं धार्मिक चित्र, जिहाद या संकल्पनेच्या चुकीच्या अर्थाच्या उपकरणाकडे वळालेली तरुण पिढी, त्यातून निर्माण होणारा विध्वंस, पालक म्हणून एका पिढीचं आणि तरुण पिढीचं या साऱ्यामध्ये कर्तव्य नेमकं काय आहे, हे सगळंच ‘मुल्क’मध्ये चपखलपणे येतं.

एखाद्या सिस्टीमचा कंटाळा आला तर असंतोष निर्माण होतो आणि त्याच्या विरोधात उठाव करावा अशी इच्छा होते. ही अतिशय मूलभूत मनुष्य भावना विक्रमादित्य मोटवानेच्या ‘भावेश जोशी: द सुपरहिरो’मधून पुन्हा समोर येते. हा चित्रपट आण्णा हजारेंच्या आंदोलनापासून प्रेरणा घेतलेल्या तीन भिन्न स्वभावाच्या मित्रांची कथा सांगतो. मुंबई शहरात सुरू असलेल्या छोट्या मोठ्या गुन्ह्यांचा सामना करताना पाणी तस्करीच्या मोठ्या घबाडात हे तीन मित्र अपघाताने ओढले जातात. आणि त्यामध्ये समाविष्ट असलेले पोलीस, नेते, मंत्री या सर्वांच्याच विरोधात उभे राहतात. या संघर्षातून समोर येणाऱ्या बहुतेक सगळ्याच मुद्द्यांना चित्रपट या मित्रांच्या दृष्टीकोनातून हात घालतो. जर या मोडकळीस आलेल्या समाजाला पुन्हा सावरायचं असेल तर एका सुपरहिरोची गरज आहे, आणि हा सुपरहिरो म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून देशातील तरुण पिढीच आहे हा विचार हा चित्रपट देतो.

ही चित्रपटांची वाढत चाललेली संख्या, तरुण पिढीचे लेखक-दिग्दर्शक, त्यांना हे विषय समोर आणण्याची वाटत असलेली गरज, त्यांना मिळणारं स्वातंत्र्य (?), या चित्रपटांना फक्त मनोरंजन न समजता त्याला कृतीतून प्रतिसाद देणारा तरुण प्रेक्षक वर्ग हे सगळंच एक प्रकारे विकासाचं द्योतक आहे. चित्रपट माध्यमाचा मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजकार्यासाठी केलेला वापर हा नक्कीच प्रशंसनीय आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन एखादं माध्यम सांगतंय आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण विचार करत आहोत, कृती करत आहोत यापेक्षा स्वतःलाच आतून काहीतरी वाटण्याची गरज आहे. कारण स्वतःला जे वाटतं ते करण्यासाठीची जिद्द कमालीची वेगळी असते आणि काळानुसार वृद्धिंगत होणारी असते. चित्रपट माध्यम आपलं काम करत राहीलच. पण जर खरोखरच बदल घडवून आणायचा असेल तर आपल्यातील प्रत्येकाला आपल्यात दडलेल्या श्रवण सिंग, लक्ष्मी, भावेश, आरती, डीजे, सोनिया, मोहन भार्गव या सर्वाना खेचून बाहेर काढलं पाहिजे!

 — आशुतोष जरंडीकर

लेखक एमबीबीएस करत असून चित्रपटप्रेमी आहेत. लेखकाशी संपर्क साधण्याचे माध्यम: Facebook.

सदर लेखाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी किंवा फेसबुक चर्चेत भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.