तारुण्यातला हॉलिवुडचा न पुसला जाणारा ‘डीऽऽऽप इम्पॅक्ट’

केंद्र सरकारच्या ‘मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन’च्या २०१७ च्या अहवालानुसार १५ ते ३४ हे भारतीय युवक/युवतींचं तरुणपणाचं ठरवलेलं वय आहे. याचा विचार केला तर माझं तरुण असण्याचं वय कधीच सरलंय. मी तरुण राहिलो नाही असं केंद्र सरकारला वाटतंय म्हटल्यावर ते बरोबरच असणार. तारुण्य हे आकड्यांवर नसतं, असं आपण नेहमी म्हणतो. ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण असा सुविचार शाळेच्या भिंतीवर वाचलेला आठवतो तेव्हा वाटतं हेही खरंय. तसं पाहिलं तर दोन्हीतही तथ्य आहे. सुविचार मनात बिंबवला तर वयाचा अडसर कधीच येणार नाही. सरकारी आकडे खरे मानले तर आपण नेमकं त्या काळात काय करत होतो याचं सिंहावलोकन करायची ही वेळ आहे असं वाटतं. मी हे आकडेच गृहीतक मानून बोलणार आहे.

१५ ते ३४ म्हणजे १९९६ ते २०१५ हे माझं तरुण असण्याचं वय. या वयाचा विचार केला तर सर्वसाधारण तरुण हे दहावी, बारावी, पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर होणे या टप्प्यातून जातात. मग नोकरी/व्यवसायाच्या मागे लागतात. त्यात जम बसतोय असं वाटायला लागलं की लग्न करतात. संसार चालू होतो. काही फॅमिली प्लॅनिंग वगैरे केलं नसेल तर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला पहिलं लेकरू होतं. तेच लेकरू तीन-चार वर्षांचं होऊन लवकरच शाळेला जायच्या तयारीला लागलं की दुसरं लेकरू होतं. सामाजिक धारणेनुसार मळलेल्या वाटेवरून मार्गक्रमण करत असल्यामुळे घरचे, नातेवाईक व इतर मंडळी त्यांचं कौतुक करायला लागतात. मग खर्‍या अर्थाने आपण सेटल झालो आहोत असं त्यांना वाटायला लागतं. ही सर्वसाधारण चौकट मानली तर मी यात कुठेच बसत नाही. कोणत्याच अर्थाने बसत नाही. ना वयाच्या, ना सामाजिक धारणेच्या.

यहीं हमारी फिल्म ऑफबीट हो जाती है असं ‘बावर्ची’मधलं असरानीचं पात्र म्हणतं तसं ‘हमरी लाईफ भी ऑफबीट हो गयी.’ सर्वसाधारण पदवीधर होण्याचा काळ हा बारावी नंतर तीन ते चार वर्षांचा असतो. डॉक्टर होण्यासाठी गेला असेल तर साडेचार वर्षं लागतात. वयाच्या हिशोबाने २२-२३ पर्यंत. माझ्यासाठी हे १९९८ ते २००८ असं दहा वर्षांचं झालं. खर्‍या अर्थाने कहानी में ट्विस्ट ठरला तो वयाच्या १७ ते २७ व्या वर्षादरम्यानचा काळ. सर्वसामान्यपणे तेविसाव्या वर्षानंतर सर्वजण नोकरी/व्यवसायाच्या मागे लागतात. मी त्यावेळी औपचारिक शिक्षण घेत होतो. एका नोकरदार, मध्यमवर्गीय, पांढरपेशा ब्राह्मण कुटुंबात ही गोष्ट लाजिरवाणी होती. या काळात एका बाजूला शिक्षण घेण्याव्यतिरिक्त आयुष्यात नेमकं काय करावं हे माहिती नव्हतं. तर दुसरीकडे आजूबाजूला सतत असणारा सिनेमा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दिसून यायचाच. लातूरात अशोक हॉटेलजवळ गोरक्षणाच्या तिथे जी घरं होती त्यांची एक सलग बाजू रस्त्याकडे पाठ करून आहे. तिथे सिनेमांची पोस्टर्स लागायची. कॉलेजला आल्यापासून शहरात हिंडायची सवय लागली होती. त्यामुळे सतत त्या भिंतीसमोरून जावं लागायचं. त्यामुळे थिएटरमध्ये कोणते सिनेमे लागलेत हे कळायचं. तर ऑटो रिक्षा, पानटपरी, बस, गणेशोत्सव, वगैरे ठिकाणी कधी डायलॉग्ज किंवा गाण्यांच्या स्वरुपात तो असायचाच. रामचंद्र गुहा म्हणतात तसं तुम्ही भारतात सिनेमाला सोडून राहूच शकत नाहीत. तो कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्हाला ग्रासून असतो. एकवेळ तुम्ही बघितला नसेल पण त्याचे अस्तित्व आजूबाजूस असतेच.

सिनेमाचं अस्तित्त्व आजूबाजूस असलं तरी कोणत्या सिनेमांचा आपल्यावर प्रभाव पडला याचा विचार केला, तर हॉलिवुडच्या साय-फाय, अॅक्शन जॉन्रसोबत हाँगकाँगच्या मार्शल आर्ट्स मुव्हीजचा प्रभाव कायमस्वरूपी राहणार असं दिसतं. सर्वसामान्य प्रेक्षकांप्रमाणे सिनेमाच्या निर्मितीची कसलीही तोंडओळख नसणे ही प्राथमिक गोष्ट होती. (आजही खूप माहिती आहे असं नाही.) त्यामुळे पडद्यावर दिसणार्‍या प्रतिमा एन्जॉय करणं व बाहेर आल्यावर तोंड फाटेपर्यंत त्यावर बोलणं ही पायाभरणी आपोआप होत गेली. त्या काळात हॉलिवुडचे किती सिनेमे बघितले याचा हिशेब ठेवला नाही. याचं पहिलं कारण घरात सिनेमाला असलेला विरोध. फक्त दूरदर्शनवर दिसणारे सिनेमे तेवढे बघणे, एवढंच काय ते शाळेपासून हातात होतं. अकरावीला आल्यावर कॉलेजच्या निमित्ताने बाहेरख्यालीपणा आलेला. घराबाहेर काय करतो हे घरी सांगायची गरज नसायची. कारण बारावी म्हणजे महत्वाचं, मेरीट यायचं वर्ष. त्यात ते लातूर पॅटर्न वगैरेचे दिवस. शाळेत असताना गुलबर्ग्याला ‘ज्युरासिक पार्क’ बघितला. निमशहरी भागात हॉलिवुडची नशा वाढायला हा चित्रपट कारणीभूत ठरलेला. नशिबाने अकरावीला हॉलिवुडचा जबरदस्त चाहता असणारा एक मित्र भेटला. मग पुढे तो मुंबईला नोकरीसाठी स्थलांतर करेपर्यंत येणारा प्रत्येक सिनेमा बघायचा हे नित्यकर्म होतं. तेव्हा फक्त ब्लॉकबस्टर सिनेमेच यायचे.

‘यशोदा थिएटर’ या सिनेमांचा मक्का होतं. थिएटर मोठं अन् बाल्कनी तर खासच होती. आतली रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. बाजूच्या भिंती त्रिकोणी आकाराच्या बनवलेल्या व त्यात वरून रंगीबिरंगी लाईट्स सोडलेले. बाल्कनीत असल्यामुळे आपण पडद्याला समांतर बसलोय असं वाटायचं. यशोदा लातूरातलं पहिलं थिएटर होतं जिथे डॉल्बी-डीटीएस यंत्रणा ‘हिंदुस्थानी’च्यावेळी बसवलेली. त्यामुळे हॉलिवुडला मनात घट्ट रुजवायला त्याचा ‘डीऽऽऽप इम्पॅक्ट’ झाला. तेव्हा हे सिनेमे खूप गर्दी खेचणारे नसायचे. जो प्रेक्षक यायचा तो एकतर हिंदी/मराठीचे सिनेमे ‘दुनियेचे बोर हुतेत’ असं म्हणणारा, अंशतः/अर्ध नग्न हिरोईन आणि चुंबन दृश्य बघायला येणारा असायचा, किंवा दुसरं म्हणजे हॉलिवुड अॅक्शनचा कट्टर भोक्ता असायचा. त्यामुळे बाल्कनीत प्रेक्षकसंख्या तशी कमीच असायची. बाल्कनीतच डोक्यावर छोट्याश्या खिडकीतून प्रकाश पडद्यावर पाडणारी प्रोजेक्टर रूम होती. अंधारात पड्यावरच्या प्रतिमा बघतानाच मध्येच त्या प्रकाश किरणांकडे बघितलं की गंमत वाटायची. त्यात धूलिकण नाचताहेत असं वाटायचं. पडद्याची साईज किती होती ते माहिती नाही. पण ‘शोले’ पण इथेच बघितला होता. त्यामुळे जे बघतोय ते भव्यच असतं ही धारणा पक्की होत गेली. यातच ‘९८ साली ‘डीप इम्पॅक्ट’ रिलीज झाला.

दोन घटका बाहेरचं वास्तव विसरायला लावणारे व एका वेगळ्याच जगाची सफर घडवणारे ते सिनेमे त्यावेळच्या कंटाळवाण्या आयुष्यात तुषार शिडकावण्याचं काम करायचे. त्यांचं अत्याकर्षण होतं. माझी बारावीची परीक्षा संपली होती, रिझल्ट लागलेला नव्हता, मेडिकलला जायचं की बीएस्सीला की अजून काही हे ठरायचं होतं. तसेच पुढील दहा वर्षात काय होणार होतं याचीही सूतराम कल्पना नव्हती. समर ब्लॉकबस्टर हा प्रकार आपल्याकडे नाही. पण तेव्हा तो ८ मे किंवा त्या नंतरच्या आठवड्यात रिलीज झालेला. मी माझ्या हॉलिवुड समविचारी मित्राबरोबर बहुतेक रविवारी बघितला. मॉर्निंग शो होता. ट्रेलर वगैरे बघायची सोय दोघांकडेही नव्हती. तसेच घरी केबल कनेक्शनही नव्हतं. त्यामुळे कोर्‍या, खुल्या मनाने ते जे दाखवतील त्यावर विश्वास ठेवून सिनेमा बघणे एवढंच हातात होतं.

सिनेमाने कुठेही निराशा केली नाही. कारण साय-फाय, डिझास्टर, स्पेस अडव्हेंचर असं त्याचं स्वरूप होतं. त्यामुळे नासा, अॅस्ट्रॉनट्स, अमेरिका, न्यू यॉर्क सिटी, लघुग्रह, स्पेशल इफेक्ट्सची रेलचेल, शहरांना गिळंकृत करणारी त्सुनामीची लाट, आघाती संगीत, जबरा कॅमेरावर्क व अभिनय, हिंदी डबिंग यांसारख्या मला कळणार्‍या गोष्टींनी तो परिपूर्ण होता. लातूरसारख्या छोट्या शहरात राहणार्‍या सतरा वर्षाच्या टीनेजरकडून सिनेमाच्या अपेक्षा त्या किती असणार म्हणा! त्यामुळे जे दिसलं ते मनात कोरलं गेलं. ते भव्यदिव्यच होतं. चित्तचक्षूचमत्कारिक. आज शांतपणे विचार केला तर त्याच्या कथानकाचा तीन पातळ्यांवर होणारा प्रवास (ज्यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही, पण घटनेच्या परिणामांशी आहे), कथेचा चढता आलेख, घटना खरंच घडली तर काय होईल याचा वास्तववादी पातळीवर केला गेलेला विचार, इत्यादी गोष्टी लक्षात येतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लघुग्रहाचा शोध लागल्याचं सत्य जनतेपासून वर्षभर लपवून ठेवतात आणि त्याचा खात्मा करण्यासाठी रशियासोबत भागीदारी करून टीम बनवायला सांगतात. त्यामुळे यात जितकं महत्त्व लघुग्रहात अणुबॉम्ब पेरून ते उडवून लावणार्‍या टीमला आहे, तितकंच महत्त्व पृथ्वीवर जीव वाचवणार्‍या लोकांना आहे. तसंच कथेचं हे वेगळेपण लगेचच जूनमध्ये रिलीज झालेल्या ‘आर्मागेडन’समोर उठून दिसतं. दोन्हींची कथा सारखीच आहे. फरक इतकाच की ‘आर्मागेडन’ खास ‘मायकेल बे’ शैलीत स्टायलिश अॅक्शनवर भर देतो, जो सकृतदर्शनी खूपच प्रभावी वाटतो. मात्र ‘डीप इम्पॅक्ट’ वास्तवात घडणाऱ्या शक्यतांचा आणि त्यांच्या संभाव्य परिणामांचा खोलवर जाऊन विचार करतो. कारण शेवटी ही नैसर्गिक आपत्ती असते. ज्यात मानवाचे प्रयत्न अपुरे पडू शकतात. तसे ते पडतातच पण त्यावर त्यांनी शोधलेला उपाय मानवजातीला मोठ्या हानीतून वाचवतो.

या बाबी आज परत एकदा टीव्हीवर बघताना लक्षात येतात. तेव्हा फक्त लातूरच्या भाषेत ‘भाँ’ म्हणजे ‘लय भारी’ सिनेमा यापलीकडे काहीही जाणवलं नव्हतं. तरीही त्याचं वेगळेपण होतं ते आमच्या नेहमीच्या आयुष्यापेक्षा नवीनच, आकर्षण निर्माण करणार्‍या, हव्याहव्याशा वाटणार्‍या जगाची ओळख करून देण्यात. आपण सायन्सचे विद्यार्थी आहोत म्हणजे आपलं त्याच्याशी काहीतरी नातं आहे असं वाटायचं. खरंतर हे प्रत्येक सिनेमाला लागू पडायचं. अरनॉल्ड श्वार्झनेगर किंवा जॅकी चॅनचा सिनेमा बघितला की त्याच्याशी ही आपलं नात आहे असं वाटायचं. जणू आपण त्याच्या विश्वातलेच आहोत अशी आपलेपणाची भावना निर्माण व्हायची. निव्वळ पडद्यावर दिसत असला तरी आपण त्याच्या सोबतच आहोत असं वाटायचं. त्यातल्या प्रतिमा थिएटरबाहेर आल्यावरही मनात घट्ट रूतलेल्या असायच्या. न्यू यॉर्क शहरावर त्सुनामी येते तेव्हा आपल्या इथे आली तर कुठल्या बाजूने येणार यावर आम्ही चर्चा केलेली. लातूरला समुद्र नाही ही गोष्टच खिजगणतीत नव्हती. वास्तव जग व पडद्यावरचं जग यात फरक असतो व तो ठेवायचा असतो हे कुठं माहिती होतं! जे समोर दिसेल ते आत्मसात करायचं एवढंच डोक्यात होतं.

हे जग वेगळं वाटायचं व त्याचं आकर्षण वाढलं त्याला हिंदी/मराठीचा तोचतोचपणा ही कारणीभूत होता असं वाटतं. मला हिंदी/मराठी सिनेमे आवर्जून थिएटरला बघितलेत असं आठवत नाही. मोजकेच बघितलेत. त्याच वर्षी आलेला ‘सत्या’ तेवढा आठवतो. अगदी त्या वर्षीचा बॉक्स ऑफिस सेन्सेशन ‘कुछ कुछ होता है’ अजूनही बघितलेला नाही. इतका हिंदीचा तिटकारा होता. आपण हॉलिवुडचे सिनेमे बघतो याचा कोण अभिमान वाटायचा तेव्हा. ‘हॉलिवुड बघणं’ म्हणजे उच्च अभिरुचीचं लक्षण होतं. त्यावेळचे मित्र आजही हॉलिवुडशिवाय सिनेमे बघत नाहीत. भेटल्यावर त्या दिवसांची आठवण काढतात. अगदी इंटर्व्हलमध्ये नाही पण बाहेर आल्यावर कुठल्या ठिकाणी चहा किंवा थम्स अप घेतलं होतं हेही ठामपणे सांगतात. त्यांच्यासाठी आजही हॉलिवुड सिनेमा म्हणजे ब्लॉकबस्टरवाला सिनेमाच राहिलाय. आज फक्त त्याजागी थ्रीडीमधील ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ आहे इतकंच.

हॉलिवुड सिनेमांचं जग हे नेहमीच खरंखुरं वाटतं आलंय ते त्यांची कथा उभी करण्यात घेतलेल्या मेहनतीमुळे. तसेच प्रेक्षकांच्या मनात निव्वळ प्रतिमा घोळावण्यापेक्षा त्या पाठीमागील विचारही मनात रुजवावा या कारणामुळे. त्यामुळे त्या काळातले किंवा नंतरचे सर्वच सिनेमे कायमचे मनात रुतून बसलेत. मॅथ्यू मकानहेचा २००५ चा ‘सहारा’ माझ्यासाठी आजही तितकाच प्रभावी आहे जितका पहिल्यांदा पाहिला तेव्हा वाटला होता. हा अमेरिकेत फ्लॉप झाला होता असं नंतर वाचलेलं. सुदैवाने हाही यशोदालाच बघितला होता. ‘किल बिल’चा पहिला भागही असाच एक प्रचंड प्रभाव टाकणारा सिनेमा. तोही आजपर्यंत आपण जे बघत होतो ते संपूर्णपणे बदलवून टाकणारा अनुभव होता. तरीही माझ्यासाठी हॉलिवुडचा न पुसला जाणारा प्रभाव टाकण्यात ‘डीप इम्पॅक्ट’चाच मोठा वाटा आहे. योगायोगाने यावर्षी त्याला रिलीज होऊन वीस वर्षं होतायेत. त्यावर आता चर्चा सुरू झालीय की दिग्दर्शक मिमी लेडरने एक चांगला साय-फाय दिलाय म्हणून. आपल्या अबोध मनावर प्रभाव टाकणार्‍या सिनेमाचा पुनर्विचार होतोय, ही त्याच्या व्यावसायिक गणिताच्या पलीकडे जाऊन मानवाच्या अस्तित्त्वाची काळजी वाहण्याच्या विचाराला मिळालेली पावतीच आहे असं म्हणावं लागेल.

— विवेक कुलकर्णी

लेखक कादंबरीकार आणि चित्रपट समीक्षक आहेत. लेखकाशी संपर्क साधण्याचे माध्यम, email : genius_v@hotmail.com.

सदर लेखाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी किंवा फेसबुक चर्चेत भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.