चित्रपट, समीक्षक आणि प्रेक्षक

मला नुकतंच कोणीतरी म्हणालं की, ‘काहीकाही सिनेमांना तू फारच लिनिअन्टली पाहतोस ब्वा!’, आणि मी दचकलो. खरं तर माझा समज होता की मी सगळ्याच सिनेमांना लिनीअन्टली पाहतो. आणि का पाहू नये? सिनेमा बनवणाऱ्यांची आणि माझी व्यक्तिगत दुश्मनी असण्याचं काहीच कारण नाही. चित्रपट बनवणारे तो बनवताना जर पुरेशा मेहनतीने बनवत असतील, तर समीक्षकाच्या भूमिकेतून तो पाहणाऱ्यांनीही पुरेसा समजूतदारपणा दाखवायला हवा, हे तर उघडच आहे. आता हे सगळं करुनही त्याला चित्रपट आवडला नाही, तर तसं सांगणं त्याचं कामच आहे,आणि त्याने ते पुरेशा स्पष्टवक्तेपणे करावं हे तर झालंच.

‘द पर्पज ऑफ अ मुव्ही क्रिटीक इज टु एन्करेज गुड फिल्म्स ॲन्ड टु डिस्करेज बॅड वन्स’, असं प्रसिद्ध चित्रपटसमीक्षक राॅजर इबर्ट यांनी म्हणूनच ठेवलंय, आणि त्या उक्तीला जागून त्यांनी आपल्याला न आवडणाऱ्या चित्रपटांची चिकार नालस्तीही केलेली आहे. समीक्षकाच्या भूमिकेबाबतचा त्यांचा युक्तीवाद मला मान्यच आहे, पण तरीही आपली नापसंती सांगतानाही शक्यतर सभ्यतेच्या मर्यादा सोडू नयेत या मताचाच मी आहे. विशेषत: आज, जेव्हा प्रेक्षक आणि समीक्षक यांत भेदच उरलेला नाही, आणि प्रत्येक जण आपलं योग्यायोग्य मत सोशल नेटवर्कवरुन ओरडून सांगतोय, अशा काळात जबाबदार समीक्षकांनी तरी काहीएक तारतम्य दाखवणं आवश्यक आहेच. एकेकाळी माझी भूमिका होती, की प्रत्येक समीक्षक हा मुळात प्रेक्षक असतो. पण हल्ली प्रत्येक प्रेक्षक हा मुळात समीक्षक असतो, असं समजण्याचा ट्रेंड आल्याने सध्या तिलाही धक्काच बसलेला आहे.

इतरांचं सोडा, मी स्वत:ला तरी अजून प्राथमिकदृष्ट्या प्रेक्षकच मानतो. कोणीही चित्रपटाचा प्रथम आस्वाद घेताना प्रेक्षक म्हणूनच घेत असतो, हे त्यामागचं पहिलं कारण, आणि मी चित्रपटरसास्वाद किंवा फिल्म थिअरीसंबंधातल्या कोणत्याही फाॅर्मल ट्रेनिंगशिवाय, वा लिहिण्याच्याही अनुभवाशिवाय थेट वृत्तपत्रीय समीक्षा करायला लागलो हे दुसरं. मुळात मला सिनेमा पाहण्याची, त्याबद्दलचं वाचायची आवड होती. त्या आवडीतूनच मी चित्रपटांबद्दल लिहायला लागलो, कोणी ती जबाबदारी सोपवली होती म्हणून नाही. यामुळे कदाचित फरक पडत असावा. स्वत:ला इन्टरेस्ट असला की आपण इन्फाॅर्मली त्या विषयाचा अभ्यास करतो, जगात इतरत्र काय चाललय, कोणत्या प्रकारचं काम होतंय याची माहिती घ्यायला लागतो, अधिक जागरुकपणे विषयाकडे पहायला लागतो. काम दिलेलं असलं, की ते शक्य तितक्या प्रामाणिकपणे पूर्ण करणं, ही मर्यादा पडू शकते. एक गोष्ट चांगली होती, की वीसेक वर्षांपूर्वी मी लिहायला लागलो तेव्हा सोशल नेटवर्क नव्हतं. आता याचा तोटा हा होता, की लिखाणावर प्रतिक्रिया अजिबातच कळत नसत. वर्तमानपत्र आणि साप्ताहिकातल्या चित्रपटविषयक लिखाणाला कोण उत्तर देणार? सामाजिक, राजकीय विषयांवर आलेल्या लेखांवर मतं मांडण्यासाठी जणू प्रतिक्रिया राखूनच ठेवलेल्या. क्वचित यायच्या, त्या लोकप्रिय मताला विरोध दर्शवल्यावर. (म्हणजे जे पी दत्तांचा बाॅर्डर फार बरा नाही म्हटलं की तमाम वाचक-प्रेक्षकांची देशभक्ती जागी होऊन त्यातून मताला विरोध केला जाई. या मतात कितपत तथ्य आहे याचा विचार होत नसे. आजही ही मानसिकता आहेच.) पण त्यापलीकडे काहीच कळत नसे. असं असतानाही सोशल नेटवर्क नसल्याचा फायदा हा होता, की मुळातच घाईने प्रतिक्रिया नोंदवण्याचा मोह नव्हता. किती वेळात, किती शब्दात लिहायचंय हे ठरलेलं होतं, त्यामुळे तसं प्लॅनकरुन लिहिणं शक्य होतं. इंटरनेटही नुकतंच सुरु होत होतं. त्यामुळे त्याचा संदर्भ मिळवण्यासाठी उपयोग होता, पण ब्राॅडबॅन्ड नसल्याने जुजबी, आणि निश्चित त्याच कामासाठी नेट वापरलं जाई. फुकटचा टाईमपास होत नसे. या सगळ्यामुळे लिहिण्याला शिस्त आली.

मला माझ्या आजोबांच्या, माधव मनोहरांच्या काळात लिहिणाऱ्यांचं, तेही अचूक संदर्भासहीत आणि तयारीने लिहिणाऱ्यांचं कौतुक आहे. कारण जवळ असलेले संदर्भग्रंथ, आणि वाचनालय, यापलीकडे माहिती मिळवण्याचा सोर्स त्यांच्याकडे नव्हता. खरं तर जवळचे ग्रंथ आणि डोक्यातली माहिती हेच. कारण सतत आणि डेडलाईनवर लिहिणाऱ्यांना वाचनालयात जाऊन संदर्भ हुडकायला कितीसा वेळ असणार? त्या तुलनेने परिस्थिती आज कठीण म्हणायची का सोपी? तर दोन्ही. आजच्या समीक्षकाला अनावश्यक तपशीलाने डोकं भरुन टाकण्याची गरज नाही. एकदाका लिहिण्याचा दृष्टीकोन आणि लेखाची मांडणी डोक्यात पक्की असेल, तर प्रदर्शनाच्या तारखा, विशिष्ट दिग्दर्शकाच्या सिनेमांची यादी, पुस्तकांची नावं, कोटेशन्स, अशा गोष्टी सहज इंटरनेटवर मिळू शकतात. परिस्थिती कठीण आहे, ती मात्र वेगळ्याच कारणासाठी. सारं काही उपलब्ध असताना बहुधा इतरांची मतंदेखील इंटरनेटवर , सोशल नेटवर्कवर उपलब्ध असतातच. मग त्यांनी प्रभावित न होता स्वत:ची वेगळी मांडणी करणं हे आजच्या नव्या समीक्षकाला आव्हानच आहे. पण त्याहूनही मोठं आव्हान आहे ते आजच्या प्रेक्षकापुढे. व्यक्त होण्याचं प्रचंड मोठं माध्यम समोर असताना, त्यावर सहज सहमती दर्शवणाऱ्या अनेकांचा पाठिंबा गृहीत असताना, आणि आधी मत नोंदवण्याची अदृश्य स्पर्धा सुरु असतानाही आपला सारासार विचार शाबूत ठेवणं, आणि त्याआधारेच मत मांडणं ही काही कमी अवघड गोष्ट नव्हे.

आपल्या प्रेक्षकांमधला सर्वात मोठा गट आहे, तो सिनेमा ही करमणूक समजणारा. त्यात त्याची काही चूक नाही. सिनेमाला रंजन मानणं ही परंपराच आहे, आणि घरोघरी पालक आपल्या मुलांना तीच शिकवण देत असतात. साहित्य, चित्र/शिल्प कला, काही प्रमाणात नाट्य, याबद्दल पालकांच्या मनातही आदर असतो. सिनेमाकडे मात्र ते एक लोकप्रिय करमणुकीचं साधन म्हणूनच पाहतात. त्याला कला म्हणून पाहता येईल, त्यात विचाराला काही स्थान असेल, याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं. इतर कलांचा हजारो वर्षांचा इतिहास, तर चित्रपटांचा जेमतेम सव्वाशे वर्षांचा, त्यामुळे बाॅडी ऑफ वर्क, किंवा वैचारिक प्रवाह यांमध्ये चित्रपट फार खोलात गेला नसेलही, मात्र या छोट्या कालावधीत त्याने जी झेप घेतली आहे ती पाहण्याची दृष्टी प्रेक्षकाला येणं आवश्यक आहे, आणि ती येण्याची सुरुवात त्याच्या घरापासूनच होणं आवश्यक आहे. चित्रपटाचं कलामूल्य हे पालकांनी आधी लक्षात घ्यायला हवं आणि ते मुलांपर्यंत पोचवायला हवं. ते झालं नाही, तर येणारा दर चित्रपटाला प्रेक्षक निव्वळ करमणूक म्हणून पाहिलं आणि त्याच्या डोक्यातल्या करमणुकीच्या व्याख्येशी चित्रपट सुसंगत नसेल तर त्याला रिजेक्ट करील.

‘करमणुकीची व्याख्या’ हा शब्दप्रयोग इथे महत्वाचा आहे. करमणूक म्हणजे काय? तर दोन घटका डोकं बाजूला ठेवता येणं? खो खो हसणं? मारामाऱ्यांपासून भावनाट्याबद्दल साऱ्यांनी खच्चून भरलेलं एक पॅकेज? यातलं काहीही करमणूक असू शकतं, पण त्यापलीकडे जाऊन कलाकृतीने आपल्याला गुंतवणं, यालाच मनोरंजन का म्हणता येऊ नये? मग हे गुंतवणं वैचारिक असेल, भावनिक असेल किंवा तेवढ्यापुरतं हसवणारंही असू शकेल. आपल्याकडे साहित्याचा मोठा वाचकवर्ग आहे जो गंभीर, वैचारिक लिखाणापासून दूर पळत नाही. मग तोच वाचक चित्रपटाचा प्रेक्षक झाल्यावर त्याच्या रंजनाची व्याख्या इतकी संकुचित का व्हावी?

यापलीकडे असलेला एक दुसरा वर्ग आहे, ज्याला उघड करमणूक वर्ज्य आहे. ज्याला वैचारिक खाद्य, कलात्मक मांडणी, आशयगर्भ निवेदन याचीच अपेक्षा असते. ही अपेक्षा जर चित्रपटाने पुरी केली नाही, तर हा प्रेक्षक बिनदिक्कत त्यावर सवंग करमणुकीचं लेबल लावून मोकळा होतो. मला या दोन्हीही बाजू तितक्याशा कळत नाहीत. आशयगर्भतेखेरीज नुसतं मनोरंजन हे टाकाऊ का असावं, आणि त्याउलट दुसऱ्या कोणासाठी वरवरच्या मनोरंजनाशिवाय आशयगर्भता ही फोल का ठरावी? या दोन्ही प्रकारचे चित्रपट आपण सारख्याच उत्साहाने पाहू का शकत नाही?

मागे ‘कोर्ट’ चित्रपटाच्यावेळी दोन वर्गांमधे सोशल नेटवर्कवर तुंबळ युद्ध पेटलं होतं. ‘कोर्ट’ला नुकतंच राष्ट्रीय पुरस्कारात सुवर्णपदक मिळालं होतं, आणि तो प्रदर्शित झाला होता. एका गटाला या चित्रपटाचं अमाप कौतुक होतं तर दुसऱ्याला तो कंटाळवाणा वाटत होता. ‘कोर्ट’प्रेमी दुसऱ्या गटाला समजवायला गेले तर हा गट उसळला आणि ‘चित्रपट न आवडण्याचा आम्हाला अधिकार नाही का?’ असा प्रश्न करायला लागला. आता असा अधिकार अर्थातच आहे. दिग्दर्शकाने एकदा का चित्रपट पुरा करून प्रदर्शित केला की त्यावर मत मांडण्याची सर्वांनाच मुभा आहे. मात्र हे मत मांडताना आपण जो चित्रपट आपल्यापुढे ठेवला जातोय त्यावरच मत मांडतोय ना, हे पाहणं आवश्यक आहे.

गेल्या शतकात आपल्या प्रेक्षकांपुढे जे हिंदी, मराठी (आणि काही प्रमाणात इंग्रजीही) चित्रपट आले, ते पाहताना आपल्या प्रेक्षकाचं आपोआप कंडीशनिंग झालं. आता कंडीशनिंग झालं म्हणजे काय, तर अमुक प्रकारच्या चित्रपटाकडून काय अपेक्षा ठेवायच्या याबद्दल काही ठाम विचार आपल्या प्रेक्षकाच्या डोक्यात घट्ट बसले. कोणत्या ना कोणत्या फाॅर्म्युलाच्या आधारे बनणारे बहुसंख्य चित्रपट पाहिल्यानंतर, समोर येणाऱ्या प्रत्येक चित्रपटाला आपण या परिचित अपेक्षांच्या चौकटीत बसवू पहायला लागलो. जर तो चित्रपट त्यात बसला नाही, तर तो चित्रपट वेगळ्या दृष्टीकोनातून केला असेल हा विचार न करता तो चित्रपट फसला, अशी मनाची समजूत करुन घेणं आपल्याला सोपं जाई. शेवटी हे लक्षात घ्यायला हवं की कोणताही चित्रपट पाहताना आपल्या डोक्यातही तो कसा असावा याबद्दल काही कल्पना तयार होत असतात. चित्रपट त्यांना सुसंगत असा उलगडला, तर तो आपल्याला सहज आवडतो, आणि वेगळ्या पद्धतीने उलगडला, तर आपल्याला खटकल्याशिवाय राहत नाही. प्रेक्षक म्हणून आपली ही सर्वात मोठी जबाबदारी असते, की समोर दिसलेल्या चित्रपटावर आपले विचार लादायचे नाहीत. चित्रपटात जर आपल्या परिचित वळणापलीकडलं काही असेल, तर त्याबद्दल त्याला दोष न देता, ते तसं असल्यामागच्या कारणाचा विचार हा कदाचित आपल्याला योग्य रसग्रहणाकडे घेऊन जाईल.

आता याचा अर्थ असा घ्यावा का, की प्रत्येक चित्रपट चांगलाच असतो, आणि बरं वाईट हे निव्वळ प्रेक्षकाच्या नजरेत असतं? तर नाही. चित्रपटाचा दर्जा कमी अधिक असणं सहजच शक्य आहे. मात्र तो जोखताना आपण चित्रपटावर आपल्या अपेक्षा न लादता, चित्रपट जे समोर ठेवतोय त्याचाच आधार घेतो आहोत ना, हे पाहणं अगदी महत्वाचं आहे.

सध्या प्रेक्षकांनी कलाकृतीपुढे उभा केलेला दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे अनधिकृत सेन्साॅरशिप. आता ही सेन्साॅरशिप विविध प्रकारची असू शकते. लोकांच्या मनातल्या प्रेरणास्थानाला चित्रपटात धक्का पोचतोय की काय, असं वाटल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनालाच विरोध करायचा हे झालं त्याचं एक टोक, तर दुसरं टोक आहे ते चित्रपटात काय आवश्यक आणि काय अनावश्यक याची गणितं आपल्या मनाला वाटतील तशी मांडून दिग्दर्शकाच्या दृष्टीला मोडीत काढणं, आणि चित्रपटाविरोधात मोहीम उभारणं. संजय लीला भंसालीच्या ‘पद्मावत’ला झालेला विरोध, मधुर भंडारकरच्या ‘इंदू सरकार’विरोधात कोर्टात जाणं, ‘मनमर्जिया’मधले शाॅट्स काढण्यासाठी निर्मात्यांना भाग पाडणं, ही मोठी उदाहरणं आहेतच. पण जाती, धर्म, विशिष्ट व्यक्ती, यांच्या उल्लेखावरुनही हमरीतुमरीवर येणारे प्रेक्षक आपल्याकडेही आहेतच. यातला विरोधाभास असा की अनेकदा दिग्दर्शकाची भूमिका ही त्या धर्माविरोधात वा व्यक्तीविरोधात नसतेच. (उदाहरणार्थ, ‘पद्मावत’ हा राणी पद्मिनीचं गौरवास्पद चित्रच उभं करत होता, जरी त्याला विरोध तिच्याच भक्तगणांकडून झाला) पण तरीदेखील विशिष्ट संस्था, संघटना आपली ताकद दाखवण्यासाठी विरोधाचं नाट्य रचतात. ज्यांची ताकद चित्रपटावर बंदी आणण्याची नसते, ते नुसतेच सोशल नेटवर्कच्या आधारे बडबड करत, चित्रपटाविरोधात, दिग्दर्शकाविरोधात वातावरण गढूळ करीत राहतात.

स्वत:चेच बेगडी नैतिकतेचे निकष लावून बंदीची मागणी करण्याचं मोठं उदाहरण अलीकडे झालं ते चित्रपटाबद्दल नाही, तर ‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सवर येणाऱ्या मालिकेबद्दल. मालिकेत नग्नता आणि हिंसाचार होता का, तर निश्चित होता, पण मालिका मोठ्यांसाठी आहे असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला होता. नग्नतेबद्दल आपल्या चित्रपटांमधे आणि मालिकात कायमच टॅबू आहे, आणि त्यामुळेच तिच्या वापराला काहीतरी कनिष्ठ, सवंग चित्रणाशी जोडलं जातं. त्यामुळेच गंभीर सेटअप असलेल्या आणि महत्वाच्या दिग्दर्शकांनी केलेल्या मालिकेत तिचा वापर असणं हे पुढला पायंडा पडण्याच्या दृष्टीनं महत्वाचं होतं. विषयाचं गांभीर्य, टेक्श्चर, आंतरराष्ट्रीय प्रेक्षकवर्ग, कश्यप ब्रॅन्ड हे लक्षात घेता आणि यापुढे वेब चॅनल्सच्या कंटेंटमध्ये मॅच्युरिटी आणि कालसुसंगती टिकण्याची गरज पाहता ‘सेक्रेड गेम्स’नी धीट असणं हे आवश्यक होतं. पण प्रेक्षकांनी लगेचच ‘माझ्या मते तरी यात नग्नता आणि हिंसाचार आवश्यक नव्हता’ या पद्धतीच्या रिॲक्शन्स द्यायला सुरुवात केली. शेवटी दिग्दर्शकांचा, पटकथाकारांचा काही विचार असेल की नाही? नाहीतर प्रत्येक चित्रपट आणि मालिका ही प्रेक्षकांकडून दर विषयावर मतं मागवूनच घडवावी लागेल.

मला वाटतं आजच्या प्रेक्षकाला गरज आहे, ती मतप्रदर्शन करण्यापूर्वी विचार करण्याची. जे दिसतंय त्याला अधिक मोकळेपणानं सामोरं जाण्याची. विरोधाची घाई न करता पाहिलं ते मनात झिरपायला वेळ देण्याची. आपल्या डोक्यातलाच सिनेमा आपल्यासमोर दरवेळी उलगडेलसं नाही हे मान्य करत जो उलगडतोय तो पाहण्याची तयारी ठेवण्याची. चित्रपटाच्या निवाड्याला न बसता त्याचा आस्वाद घेण्याची. हे करण्याची जर तयारी नसेल तर केवळ चित्रपटाच्या तोच तोच असण्याबद्दलची टीका व्यर्थ आहे. चित्रपटाने पुढे जावं अशी आपली इच्छा असेल, तर आपणही त्याला पुढे जाण्याची यंधी द्यायला हवी.

हे सोपं नाही याची मला कल्पना आहे. आजच्या झटपट मतांच्या, लाईक्सच्या, वादग्रस्त चर्चांच्या, आणि ब्रँडिंगच्या काळात थांबून विचार करायला वेळ कोणाला आहे? पण आपल्या चित्रपटांनी काळाबरोबर रहावं, जागतिक चित्रपटांच्या पंगतीला बसावं, आशयात नवे प्रयोग करावे, आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजवावे, असं आपल्याला वाटत असेल, तर बदलत्या चित्रपटालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद हवा. अखेर टाळी एका हाताने वाजणार नाही. आपण बदलण्याची तयारी दाखवल्याशिवाय चित्रपटही बदलणार नाही.

— गणेश मतकरी

लेखक प्रसिद्ध कथालेखक असून सध्या ‘पुणे मिरर’ या वृत्तपत्रात चित्रपट समीक्षक म्हणून कार्यरत आहेत. लेखकाशी संपर्क साधण्याचे माध्यम: Facebook.

सदर लेखाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी किंवा फेसबुक चर्चेत भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.