कन्फेशन्स ऑफ अ प्रेडेटर (कथा)

इंटर्न म्हणून लागल्यावर माझी ही पहिलीच असाइनमेंट होती. घाईघाईत निघालो ते ट्रॅव्हलिंगसाठी पैसे घेणंच विसरून गेलो. झक मारली. कॅब डेस्टिनेशनच्या जवळजवळ जात होती आणि मला आठवलं माझ्या झवाड्या सिनियरचं म्हणणं… आधीच ट्रॅव्हलिंगसाठी पैसे मागून घ्यायचे, जेवढे मिळतील त्यात भागवायचं… नंतर काही मिळणार नाही. आता इंटरव्ह्यू घेऊन झाल्यावर कसा परत जाणार होतो कुणास ठाऊक. शहराच्या अशा टोकावर या इसमाचा बंगला होता, जिथे फक्त दोन प्रकारचे लोक राहत… फुटपाथवर झोपणारे आणि आलिशान बंगल्यात गाडीने ये जा करत राहणारे… बाकी रहदारी नाहीच… रिक्षा-टॅक्सी मिळणंही महाकठीण… आता भेटली असती तरी माझे खिसे रिकामेच म्हणा…

डेस्टिनेशनवर पोहोचलो. सुनसान… स्मशान बरं या पेक्षा. चार पाच बंगले होते, बाकीचे सारेच बंद दिसत होते. फक्त एक खंडहर टाईप होता, त्याच्या बाहेर दिवा दिसत होता. हीच असावी ती जागा. आत जाण्यासाठी जीव धजावत नव्हता. या माणसाबद्दल जे काही ऐकून होतो म्हणून नाही, पण त्या वातावरणातच भयाणपणा होता. याचे दिवस वाईट आलेत आता हे खरं असलं तरी, इतके वाईट… पण नाही कदाचित आतून सारं चकाचक असावं. बाहेरून जज करायला नको… जाऊ आत. कॅबवाल्याला पैसे देताना खिशात दुपारची एक सिगारेट सापडली होती… ती मारून घेऊ मग दाराची बेल वाजवू…

तेवढ्यात दरवाजा खोलून तोच इसम बाहेर आला. एक जाडजूड सिगार त्याच्या तोंडात होती. तिला पाहून माझ्या छोटुकल्या बिडीने माझ्या नकळत माझ्या तोंडातून बाहेर उडी मारत आत्महत्या करून टाकली. किंवा त्या इसमाचा रुबाब पाहून मी आ वासला असावा… मात्र हा रुबाब वेगळा होता. एकेकाळी हा माणूस अधिक रुबाबदार असावा, असं वाटवणारा..

यंग मॅन… मी तुझीच वाट पाहत होतो! कम ऑन इन… सांगितलेल्या वेळेवर बरोब्बर आलास! वना स्मोक?

आयची! सिगार! नाय झेपायची च्यायला… नको सर मला सवय नाही..

अरे राजा पहिली स्मोक केलीस मग होईल की सवय.

त्याने चटकन खिश्यातून दुसरी सिगार काढली. याच्या जवळ चटकन लायटर नसावे, मला आता क्युरियॉसिटी होती की हा आमच्या सारख्या भुक्कड पब्लिकसारखं ज्योत से ज्योत लगाते फिरतो का हे पाहण्याची! आयची! तेच केलान त्यानेही! हा ही आपल्यासारखाच आहे म्हणजे! हे सेलिब्रेटी लोक फार वेगळे नसतात म्हणज… मजेत होईल इंटरव्ह्यू!

दार उघडून आम्ही आत जाऊ लागलो. आतून बंगला/घर/खंडहर लाकडी बांधकामाचं होतं. आश्चर्यच! आत शिरताच समोर लांबलचक पॅसेज होता. चांगला बऱ्यापैकी लांब. त्याच्या दुसऱ्या टोकाला जुन्या स्टाईलचा पिवळा बल्ब चालू होता. हे सगळं मुद्दामहून डिजाईन केलेलं ही असू शकेल बाबा… थीम असेल बंगल्याची. पॅसेजमधून चालत जाताना दोन्ही बाजूला खोल्या लागत होत्या. एकूण ५-६ असतील. प्रत्येक खोलीचं दार किंचित उघडं होतं. गंमत म्हणजे प्रत्येक खोलीत वेगळ्याच रंगाचा प्रकाश दिसत होता. भिंतींवर मात्र एकच फिक्कट पिस्ता रंग, जो घरात इतरत्रही होता. आता खात्रीच पटली, हे प्रॉपर डिजाईन्ड आहे सारं!

पॅसेज संपला, हॉलमध्ये पोहोचलो. हॉलमध्ये तसंच वातावरण होतं, पण एक जादुई शांतता होती. कोऱ्या भिंती, जुन्याकाळी असायची तशी उंच सिलिंग. आणि या सगळ्यात सरांचा स्वतःचा सिगार स्मोक करत असतानाचा एक फोटो. अजिबात मिसमॅच न होणारा. त्या फोटोत ते मनमुराद हसत होते. जॅक निकलसन तोंडात सिगार ठेवून हसायचा तसा! आता ते तेज चेहऱ्यावर नव्हतं…

तुझं नाव काय म्हणाला होतास?

इंटर्न सर. टेंपररी इंटर्न.

गुड. आणि तुझ्या, म्हणजे तू जिथे काम करतोयस त्या पोर्टलचं नाव?

सिनेमामस्तीलवडालसूणमसाला डॉट कॉम सर.

हं. छान! मग इंटरव्ह्यू कसा घ्यायचा ठरवलं आहेस? इन्फॉर्मली बोलूया, मस्त ड्रिंक्स घेत!

नाही. म्हणजे हो. म्हणजे तुम्ही ड्रिंक्स घ्या सर नो प्रॉब्लेम. मला नको.

असं म्हणतोस! मी ही नाही घेत मग ड्रिंक्स. विचार तुझे प्रश्न बिनधास्त.

सर प्रथम मला तुम्हाला आमच्या पोर्टलबद्दल सांगायचं आहे. आमचा पोर्टल अनेक बाबतीत ‘वेगळा’ आहे. इथे तुमच्याकडे आम्ही गुन्हेगार, किंवा अक्युस्ड या नजरेने पाहत नाही. आमच्या मते तुम्हीही माणूस आहात… (तेवढ्यात सरांना जोराचा खोकला आला. खोकत खोकत त्यांचा हात तोंडाशी गेला… हाताला रक्त लागलेलं… काळं रक्त… सरांनी चटकन हाताला लागलेलं रक्त कोटाला पुसून टाकलं… मी पाहू नये म्हणून…)

तर हा… तर आमच्या मते तुम्ही माणूस आहात. आणि तुमची एक बाजू आहे. ती चूक की बरोबर हे आम्ही ठरवणार नाही. ते लोक ठरवतील, व्यवस्था ठरवेल… तर त्या तुमच्या ह्युमन बाजूमध्ये आम्हाला इंटरेस्ट आहे सर… (तेवढ्यात सरांचे डोळे लालबुंद झाले… खोकला परत चालू झाला… आणि एका क्षणासाठी मला एक अद्भुत प्रकार दिसला… अगदी एका क्षणाच्या १० टक्क्यांत जेवढा क्षण येत असेल त्या क्षणात मला दिसलं… सरांच्या तोंडातून एक लांबलचक जीभ बाहेर आली होती. ऑक्टोपसचे हात/पाय की काय असतात तशी! मला हा भासच वाटला… भासच होता कदाचित… त्या वातावरणात असा भास होणं सहज शक्य होतं. मी दोन श्वास घेतले… आणि परत सुरु झालो…)

तुम्ही शून्यातून तुमच्या जगाची निर्मिती केली. सिनेमा निर्मितीच्या क्षेत्रात तुमच्या इतका अवलिया दुसरा या देशात कुणीच नसावा. करियरच्या २५-३० वर्षानंतर तुमच्यावर अनेक आरोप होऊ लागले. ते आरोप तुम्ही मोठ्या मनाने मान्य केलेत. हा कदाचित तुमचा शेवटचा इंटरव्ह्यू असेल. सर, एक सांगा… कसं वाटतंय?

माझ्यावर एक्जॅक्ट ४५ स्त्रियांनी आणि ४३ पुरुषांनी सेक्श्युअल व इतर प्रकारच्या हरॅसमेंटचा आरोप केला आहे. (खोकला… रक्त…) मी ते सर्वच आरोप मान्य केले आहेत. मला उलट हेही रिव्हील करायचं आहे… एक्स्क्लुझिवली तुमच्यासाठी… की खरा आकडा हा नाहीच मुळी! मी याच्या दुप्पटीपेक्षाही जास्त लोकांना हरॅस केलं आहे, काहींच्या तर नकळत त्यांना हरॅस केलं आहे! हे सगळं बाहेर काढून मला समाधान वाटतंय. सत्य कधीच दडपून ठेवू शकत नाही कुणीच हेच यातून सिद्ध होतं… (खोकला… रक्त… ऑक्टोपस जीभ… एका क्षणातला १/१० भाग)

आय फील सो कथार्टीक अबाउट ऑल दिस! आता काल परवाचीच तर गोष्ट वाटते… मी या शहरात हिरो बनायला आलो होतो! नुसता विचार केला तरी हसू येतं… (खोकला… रक्त… ऑक्टो जीभ… १/१०…) इथल्या सिनेमाच्या जगात नुसता खुळचट गोडगुलाबी स्वप्नाळूपणा होता… यांना मी कुठे हिरो म्हणून चाललो असतो! तिथून मग मी माझ्या जगाची निर्मिती केली… तुला सांगतो इंटर्न… मी सुद्धा इंटर्न म्हणून सुरुवात केली… जे पाहिलं, शिकलो ते तर गिरवलंच, पण त्यात स्वतःचा वेगळा पर्स्पेक्टीव्ह टाकला. हरॅस करताना मी वर्गीकरण केले नाही! मोठा स्टार असो किंवा नवोदित… मला सारेच सारखे… (खोकला… रक्त… ऑक्टो जीभ… १/१०…)

सर सॉरी, मध्येच कापतोय तुमचं म्हणणं, पण प्लीज तो नेमका आकडा सांगाल का? आणि हो, एखाद्या हरॅसमेंटचा किस्सा तपशीलवार सांगा ना! आमचे वाचक विशेष उत्सुकतेने वाचतील!

२१५. सेफ साईड २२० घ्या! किस्स्याचं म्हणाल तर… एक फार गमतीदार किस्सा आहे. या किस्स्यात मी हिरो आणि हिरोईन दोघांना एकत्रित हरॅस केलं होतं! घडलं असं की हिरोला ही फिल्म करायची नव्हती

आणि हिरोईनला या फिल्ममध्ये रोल हवा होता. येतंय का लक्षात तुमच्या? गंमत कशी आहे ती! हिरो गे होता हे मला ठाऊक होतं, कारण त्याला पहिली संधी मीच तर दिली होती. मी त्याला म्हटलं की एकतर तू ही फिल्म करतोयस ही बातमी बाहेर जाईल… किंवा तू गे आहेस ही बातमी बाहेर जाईल! बोनसमध्ये मी त्याला सेक्श्युअली ही एक्स्प्लॉईट केलं. आणि हिरोईन… (खोकला… रक्त… ऑक्टो जीभ… १/१०…)

सर सॉरी, मध्येच कापतोय, पण एक तांत्रिक शंका आहे! तुम्ही एखाद्या व्यक्तीला ब्लॅकमेल करता किंवा कसलंही आमिष दाखवून एक्स्प्लॉईट करता तेव्हा ते हरॅसमेंटमध्ये काउंट होतं का? आणि तुम्ही असं ज्या ज्या लोकांना एक्स्प्लॉईट केलं आहे, त्याचा वेगळा रेकॉर्ड मेंटेन केला आहे का? आय मीन आकडा!

गुड क्वेश्चन इंटर्न! सी दिस इज अ वेरी कॉम्प्लेक्स सब्जेक्ट. तुम्ही जेवढे यात खोल जाल, तेवढी वेगवेगळी उत्तरे तुम्हाला सापडतील. पण इन माय केस, मला हे ब्लॅकमेल वगैरे करून एक्स्प्लॉईट करण्यात मजा येत नाही. कधीतरी फॉर अ चेंज मी ते केलं आहे. सो त्याचा आकडा नेमका नाही सांगता येणार. कदाचित माय सेक्रेटरी कॅन हेल्प यू विथ दिस, कॉन्टॅक्ट हर. पण यू सी तसं ब्लॅकमेल करत असतानाही प्रेडेटरकडे… (खोकला… रक्त… ऑक्टो जीभ… १/१०…) आय मीन हरॅस करणाऱ्या व्यक्तीमध्ये जर खरी प्रेडेटर इन्स्टिंक्ट… (जोराची उलटी…) आय मीन पॅशन असेल तर कन्सेंट मिळूनही ही/शी कॅन सक्सेसफुली हरॅस अ प्रे (एक अक्खा क्षण ऑक्टो जीभ बाहेर)… ऑर अ विक्टीम!

ग्रेट इनसाइट्स सर! पण प्लीज मगासची केस स्टडी पूर्ण मांडाल का? ती हिरोईन वाली!

अरे हो सॉरी! आणि त्यातली गंमत ही सांगायची आहे ना! हा तर तो हिरो गे होता राईट! तर मग मी त्याला फोर्सफुली हिरोईनशी प्रणय करायला लावला… अर्थात माझ्यासमोर! मी प्रत्यक्षात काहीच न करता एकाच वेळी दोघांना हरॅस केलं की! गंमत मात्र पुढे आहे! ते दोघेही इतके जवळचे मित्र झाले त्या घटनेनंतर की विचारू नका! यू सी हाव इट बेनेफिटेड देम! ते भावनिकदृष्ट्या इतके जोडले गेले एकमेकांशी कारण त्यांचा हरॅसर एकच होता! कधीकधी वाटतं माझ्यावर ना एक धर्म निघावा… आणि मीच त्या धर्माचा देव… (लाल रक्ताची उलटी…) किंवा सेटन!

इन फॅक्ट हीच सेम थिअरी त्या समोर आलेल्या ब्रेव्ह ४५ स्त्रियांना आणि ४३ पुरुषांना लागू पडू शकते! ते एकमेकांशी इतके चांगले कनेक्ट होतील! त्यांनी स्वतःची अशी एक कम्युनिटी सुरु केली पाहिजे! तुम्ही मीडियावाले आहात… तुम्ही सुचवा त्यांना!

सर मी फक्त इंटर्न आहे. आम्हाला पावर नाही…

मला याचं खरंच वाईट वाटतं. कोणीतरी हे बदलायला हवं. म्हणजे सगळ्याच बाबतीत. पावरफुल आणि पावरलेस, दोघं एकाच स्टार्टिंग पॉईंटवर असले पाहिजेत प्रत्येक बाबतीत. फक्त सत्ताधारी लोकांनीच दुसऱ्या लोकांना हरॅस करायचं का? थिंक अबाउट इट… तुझ्यात पोटेन्शिअल आहे…

सर हे बोलले आणि जणू पॉजच झाले… मी हाका मारू लागलो जोर जोरात सर सर सर सर… पण माझा आवाज मला स्वतःलाच ऐकू येत नव्हता. ज्या हॉलमध्ये बसलो होतो. तो हॉल गरागरा फिरू लागतोय असं वाटलं… मी जागेवरून उठलो. पॅसेजमध्ये आलो. दोन्ही बाजूच्या खोल्यांची दारं जोरजोरात उघड-बंद होऊ लागली. मात्र या सगळ्याने मला भीती वाटणं अपेक्षित होतं, तसलं काही वाटत नव्हतं. मी पहिल्या दारात घुसलो. मला दिसलं माझं बालपण… दिसलं वर्गातल्या सर्वात ताकदवर मुलाकडून माझं मार खाणं. माझं रडत रडत घरी जाणं. तिथून बाहेर आलो. दुसरं दार उघडलं तिथे दिसलं माझं घर. इथे सगळं नॉर्मल होतं. प्रत्येक खोलीत ट्रॅजेडी दिसली पाहिजे असं नसावं कदाचित. तिसरी खोली उघडली तिथे दिसला माझा वर्तमान काळ. दिसली झवाडी सिनियर. तिच्या सिनियरचे पर्सनल काम करणारी आणि मला अख्ख्या जगाचं काम करायला लावणारी… मला कळलं होतं काय करायचं!

तेवढ्यात सरांना माझा आवाज ऐकू आला. मी परत हॉलमध्ये बसलेलो तिथेच होतो. ओके देन!

सर आता रॅपिड फायर!

वा! विचार बिनधास्त!

१. तुमची आवडती फिल्म कोणती?

कुठलाही पारंपारिक हिंदी मसालापट ज्यात हिरोईन, हिरोईनची मैत्रीण, हिरोची बहिण आणि जमल्यास हिरोच्या आईवरही बलात्काराचे सीन्स चित्रित केले असतील!

२. तुमची आवडती हिरोईन कोण?

मी हरॅस केलेल्यांपैकी?

सॉरी ते स्पेसिफाय केलेलं नाही.

ओके… मग मी नावं घेणार नाही.

३. तुमचा आवडता हिरो कोण?

शूटवर कायम उशिरा येणारा आणि बळजबरीने ऐन वक्ताला स्क्रिप्टमध्ये बेड सीन्स अॅड करून घेणारा…

४. तुम्ही एका बेटावर एकट्याने राहायला गेलात आणि तुम्हाला फक्त तीन गोष्टी सोबत न्यायची परवानगी असेल, तर त्या कोणत्या तीन गोष्टी असतील?

वाह सुंदर प्रश्न! मी बेटावर जाताना इथला बावळटपणा, उथळपणा आणि एकूण वैचारिक दारिद्र्य सोबत नेईन, टू फील कम्प्लीटली अॅट होम!

५. तुम्ही इतिहासातल्या एखाद्या व्यक्तीला घरी डिनरला बोलवू शकलात तर कोणाला बोलवाल?

मी बोलवू शकतो तर मी नाही सुद्धा बोलवू शकतो ना?

सॉरी ते स्पेसिफाय केलेलं नाही.

ओके… मग मी का उगाच त्यांना त्रास देऊ. मगाशी तुम्ही आलात, तुम्हाला ठाऊक असेल खूप कठीण आहे इथपर्यंत पोहोचणं! मी नाही बोलावणार कुणालाच..

६. ‘व्हाईट शर्ट–जीन्स’ की ‘टी-शर्ट–जीन्स’?

नो शर्ट नो जीन्स..

७. तुमच्यापासून प्रेरणा घेऊ इच्छित तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल?

इतकाच संदेश देईन… की कुणाचाच संदेश घेऊ नका…

मस्त झाला इंटरव्ह्यू. सर मोठ्या मनाचे होते. परत जाण्यासाठी पैसे ही न मागता दिले त्यांनी. अगदी अखेरचा श्वास मोजत असतानाही इतक्या उत्साहात बोलत होते. मी बाहेर गेटपर्यंत आलो. सरांनी भेट दिलेली सिगार पेटवू लागलो. आणि समोर पाहतो तर स्कूटीवर माझी झवाडी सिनियर! साली माझ्यासाठी इथपर्यंत आली! ऑफिस इतकं लांब असूनही… सुनसान वातावरण… स्मशान बरं या पेक्षा… अचानक माझ्या डोळ्यांची आग आग होऊ लागली… जणू निखारे पेटत होते डोळ्यांमध्ये… अवतीभवतीचं सारं धूसर होत होतं. मला समोर फक्त ती सिनियर दिसत होती… माझी प्रे दिसत होती…

तेवढ्यात मला जोराचा खोकला आला. खोकत खोकत माझा हात तोंडाशी गेला… हाताला रक्त लागलेलं… काळं रक्त… मी चटकन हाताला लागलेलं रक्त टी-शर्टला पुसून टाकलं… सिनियरने पाहू नये म्हणून…

— अभय साळवी

लेखक मराठीस्टार्स.कॉममध्ये चित्रपट समीक्षक म्हणून कार्यरत आहेत. लेखकाशी संपर्क साधण्याचे माध्यम: Facebook

सदर लेखाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी किंवा फेसबुक चर्चेत भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.