नकोशा वास्तवापासून दूर नेणाऱ्या स्वप्नांचा पाठलाग

नव्वदचं दशक हे अमेरिकन चित्रपटसृष्टीतील इतिहासाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचं आणि क्रांतिकारी दशक आहे. मिरामॅक्स फिल्म्स, बॉब आणि हार्वे वाइन्स्टिन, क्वेंटिन टॅरंटिनो या नावांनी हे दशक केवळ गाजवलंच नाही तर स्टुडिओजमुळे निर्माण झालेली (किंबहुना केली गेलेली) मोनोपॉली तोडून इंडिपेंडेंट ऊर्फ ‘इंडी’ फिल्म चळवळीला नवीन आयाम प्राप्त करून दिले. १९८० च्या दशकापासून मिनिमल पातळीवर सुरु असलेल्या इंडिपेंडंट सिनेमा चळवळीला जवळपास दशकभराच्या अथक परिश्रमानंतर मोठ्या पातळीवर प्रसिद्धी मिळाली होती. १९९१ मध्ये ‘उटाह/यूएस फिल्म फेस्टिव्हल’ पुढे जाऊन नावाजला जाईल असा ‘सनडान्स फिल्म फेस्टिव्हल’ बनला होता. १९९४ मधील ‘पल्प फिक्शन’च्या ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये ‘पाम डि’ऑर’ मिळवण्याने इंडी चळवळीत नवचैतन्य निर्माण झालं होतं. योगायोगाने ’९४ याच वर्षी ‘बिग सिक्स’ मेजर फिल्म स्टुडिओजपैकी एक असलेल्या ‘फॉक्स एंटरटेनमेंट ग्रुप’च्या ‘फॉक्स सर्चलाईट पिक्चर्स’ या सर्वस्वी इंडी फिल्म्सच्या डिस्ट्रिब्युशनकरिता वाहिलेल्या प्रॉडक्शन कंपनीची स्थापना झाली होती.

सांगायचा मुद्दा असा की इंडी फिल्म चळवळीने पॉल थॉमस अँडरसन, रॉबर्ट रॉड्रिग्जसारख्या दिग्दर्शकांना गरजेचा प्लॅटफॉर्म मिळवून दिला होता. अर्थात हे तर झालं तत्कालीन सिनेमाबाबत. त्याकाळातील अमेरिकन सामाजिक आणि राजकीय परिस्थिती मात्र काहीशी वेगळी होती. लागोपाठ सुरु असलेल्या दोन महायुद्धांतून आणि त्यांच्या परिणामांतून जरा कुठे बाहेर पडायला सुरुवात झाली तोच शीत युद्ध सुरु झालं. जे पुढे किमान साडेचार दशकं सुरु राहिलं. त्यामुळे मधल्या काळात आपल्या धूर्त राजकारणामुळे महासत्तांमध्ये विराजमान होऊन बसलेल्या अमेरिकेला (किंबहुना अमेरिकन जनतेला) मोकळा श्वास घ्यायची फुरसतच नव्हती. त्यानंतर लगेचच जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, आणि एकूणच जगासोबत अमेरिकेलाही या बदलांना सामोरं जात आपल्या अंतर्गत परिस्थितीशी सामना करावा लागला.

आता ही परिस्थिती काही थर्ड वर्ल्ड कंट्रीजसारखी नसली तरी अगदी ‘सगळं काही छान छान’ स्वरूपाचीही नव्हतीच. अमेरिकेच्या एक राष्ट्र म्हणून जागतिक राजकारणात आपलं स्थान उंचावण्याच्या आणि टिकवून ठेवण्याच्याच महत्त्वाकांक्षेचं छोटेखानी स्वरूप अमेरिकन समाजात दिसून येत होतं. लोकांच्या स्वतःची सामाजिक पातळी उंचावण्याच्या अपेक्षा वाढत होत्या. सोबतच अमेरिकन तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली होती. ज्यामुळे अथॉरिटीजना इमिग्रंट्स, ब्लॅक नेबरहूड, वगैरे बाबी सामाजिक स्थैर्यास धोकादायक वाटत होत्या (किंबहुना ट्रम्पच्या राजकीय स्ट्रॅटेजीला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता अजूनही वाटतात). एकूणच अमेरिकन सामाजिक परिस्थिती हलाखीची होती. ज्याची प्रातिनिधिक आणि परिणामकारक रूपं टोनी काये दिग्दर्शित ‘अमेरिकन हिस्टरी एक्स’मध्ये (१९९८) दिसून येतात, तर अगदी ‘फाईट क्लब’कडेही (१९९९) तत्कालीन अस्वस्थपूर्ण सामाजिक परिस्थितीचं आणि भोवतालच्या बदलांना सामोरं जाणाऱ्या पिढीचं चित्रण म्हणून पाहता येतं.

याच चळवळीचा आणि तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा एकत्रित परिणाम म्हणून १९९८ मध्ये अमेरिकन चित्रपटसृष्टीला डॅरेन अॅरॉनफ्स्की हा दिग्दर्शक मिळाला. ज्याच्या ‘पाय’ या दिग्दर्शकीय पदार्पणातील चित्रपटाने ‘सनडान्स फिल्म फेस्टिव्हल’मधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि इतरही काही महत्त्वाचे इंडी चित्रपटांसाठीचे पुरस्कार आणि एकूणच यश मिळवलं.

‘पाय’मध्ये इतरांना विचित्र, असाध्य वाटणाऱ्या ध्येयाच्या मागे धावणारा, सोशल अँक्सायटी डिसॉर्डर, पॅरानॉईया असणारा नायक आणि या सर्व गोष्टींमुळे त्याला होणारे भास, या सर्व गोष्टींनी केवळ एक चित्रपट नायक उभा न करता ‘डेव्हिड लिंचीयन’ स्वरूपात प्रभाव पाडणारी एक दिग्दर्शकीय शैली निर्माण केली. ज्यातून पुढील दोन दशकांत डॅरेनची विस्तृत आणि त्याच्या स्वतःच्या विशिष्ट अशा शैलीचे ठसे निर्माण करणारी फिल्मोग्राफी पाहण्यास मिळाली. ‘रेक्वीअम फॉर अ ड्रीम’ हा त्याचा दुसरा चित्रपटही याच यादीतील एक परिणामकारक चित्रपट.

डॅरेनच्या ‘पाय’पासून ते अगदी ‘ब्लॅक स्वान’ आणि ‘मदर!’पर्यंत जवळपास सर्वच चित्रपटांत मध्यवर्ती पात्रं ‘महत्त्वाकांक्षा’ आणि ‘आसक्ती’ या दोन्ही गोष्टींमधील समतोल न राखता आल्याने, किंबहुना महत्त्वाकांक्षेचं आसक्तीत रूपांतर झाल्यानं तार्किक अंगांनी विचार करणाऱ्या कुठल्याही सामान्य व्यक्तीला टोकाच्या वाटणाऱ्या कृती करताना दिसतात. मग नुसत्या कागदावरही भयावह वाटणाऱ्या या धक्कादायक बाबींना डॅरेन एकाचवेळी प्रभावी, सिनेमॅटिकली सुंदर आणि तिरस्करणीय अशा दृकश्राव्य स्वरूपात पडद्यावर आणतो. आपण त्याच्या पात्रांशी जोडले जातो, आणि पाठोपाठ त्यांना उद्ध्वस्त होताना (किंबहुना स्वतःला उद्ध्वस्त करून घेताना) पाहतो.

‘रेक्वीअम फॉर अ ड्रीम’ आणि त्यातील पात्रंही त्याहून वेगळी नाहीत. सॅरा गोल्डफर्ब (एलन बर्स्टीन) ही तशी निवांत आयुष्य जगणारी गृहिणी आहे. तिच्या आयुष्यात तशी एकच चिंता असावी, ती म्हणजे तिच्या मुलाची, हॅरीची (जॅरेड लेटो). कारण ती त्याच्यापुढे आणि त्याच्या अंमली पदार्थांच्या व्यसनापुढे हतबल असणारी सिंगल मदर आहे. ती हॅरीला तिच्या घरात येऊन एक एक वस्तू गहाण ठेवत, त्यातून येणारे पैसे ड्रग्जवर खर्च करताना पाहते आहे. चित्रपट सुरु होतो नि हॅरी घरातील टीव्ही घेऊन जायला आलेला असतो. त्याची ही सवय माहित असलेल्या सॅराने टीव्ही रेडिएटरला साखळीने बांधून ठेवलेला असल्याने तिच्याकडून त्याची चावी घेणं हॅरीकरिता अपरिहार्य असतं. ते टाळणं सॅराला जमणार नसतं, आणि ते केल्यावर जे होतं ते पाहणं तिच्या वात्सल्याला धक्का पोचवणारं असतं. तर दोघांचं संभाषण (!) घडत असताना ‘स्प्लिट स्क्रीन’च्या माध्यमातून दोघांमधील पडदा विभागलेला असतो, जे त्यांचं दुभंगलेलं नातं पाहता खटकत नाही.

A man is known by the company he keeps’ अशी एक म्हण इंग्रजीत आहे. हॅरीचे आयुष्य पाहता याच वाक्याचा प्रत्यय येतो, कारण त्याची प्रेयसी, मॅरियन (जेनिफर कॉनली) आणि त्याचा जीवलग मित्र, टायरॉन (मार्लन वेयन्स) अशी त्याच्या आयुष्यातील दोन्ही जवळची आणि महत्त्वाची माणसं ड्रग्जच्या विळख्यात अडकलेली आहेत. ज्यामुळे आईशी तसेच सलोख्याचे संबंध नसलेल्या हॅरीला वेळीच सावरतील अशी माणसं त्याच्या आयुष्यात नाहीतच. अर्थात सदर चारही पात्रांच्या आयुष्यात पुढे वाढून ठेवलेल्या घटना पाहता या समस्या तर अगदीच मूलभूत स्वरूपाच्या आहेत. कारण एकीकडे हे तिघेही दिवसेंदिवस व्यसनाच्या गर्तेत सापडत चालले आहेत. ज्यामुळे दिवसेंदिवस हेरॉईनसारख्या ड्रग्जची त्यांना भासणारी गरज आणि सेवनाचं प्रमाण या दोन्ही गोष्टी वाढत चालल्या आहेत, परिणामी त्यांना पैशाची उणीव भासत आहे. ज्यावर उपाय म्हणून हॅरी आणि टायरॉन हेरॉईन विकू लागतात. ज्यातून त्या तिघांचा उदरनिर्वाह आणि अतिरेकी व्यसन भागू लागतं. शिवाय यातून मिळणाऱ्या अतिरिक्त उत्पन्नातून डिझायनर असलेल्या मॅरियनकरिता दुकान उघडायचं, तर टायरॉनने गुन्हेगारी प्रवृत्ती आणि आर्थिक अक्षमतेच्या झळा बसणाऱ्या भागातून बाहेर पडून आपल्या आईला आपला अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं, याची स्वप्नं पाहिली जातात.

तर इकडे सॅराच्या मनात वेगळीच महत्त्वाकांक्षा निर्माण झालेली असते. एका चुकीच्या फोन कॉलमुळे ती एरवी टीव्हीवर पाहत असलेल्या ‘गेम शो’मध्ये स्पर्धक म्हणून तिची वर्णी लागणार असल्याचा तिचा समज झालेला असतो. अर्थातच यामुळे ती आपल्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण ठरू शकणाऱ्या घटनेसाठीची पूर्वतयारी करू लागते. ज्यात आपल्या आवडत्या ड्रेसमध्ये शोभून दिसण्यासाठी वजन कमी करण्याचे तिचे प्रयत्न सुरु होतात. ज्यात डायट प्लॅनसोबतच अँफेटामिनचा अंश असलेल्या गोळ्यांचाही समावेश होतो, परिणामी तीही या ड्रगच्या विळख्यात सापडते, आणि पडद्यावर एकापाठोपाठ एक करत चारही मध्यवर्ती पात्रांचा कुठल्या ना कुठल्या स्वप्नाच्या दिशेनं प्रवास सुरु होतो.

डॅरेननं उभ्या केलेल्या पात्रांचं आणि एकूणच ‘रेक्वीअम फॉर अ ड्रीम’ चित्रपटाचं विच्छेदन करायचं झाल्यास, ती काही मूलभूत संकल्पना स्पष्ट करतात. एव्हाना यातील चारही पात्रांचं आयुष्यातील ध्येय स्पष्ट झालेलं आहे. ते ध्येय त्यांना साध्यही करायचं आहेच, पण सोबतच त्यांना त्यांच्या व्यसनाशी आणि त्याद्वारे निर्माण होणाऱ्या समस्यांशी (अपयशी) लढा द्यायचा आहे. ज्यात महत्त्वाकांक्षा, आसक्ती यांच्यासोबतच वास्तव आणि कल्पना यांच्यातील धुसर होत जाणाऱ्या रेषा हा प्रवास अधिक क्लिष्ट करत आहेत. लेट मी एलॅबरेट.

हॅरी, मॅरियन आणि टायरॉन या तिघांनाही स्वतःला सिद्ध करेल अशा ध्येयाची पूर्ती करायची आहे. जी त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. मात्र यात त्यांची रिअॅलिटी, त्यांचं वास्तविक जीवन हे अडथळा ठरत आहे. तिघांनाही वैयक्तिक आयुष्यातील प्रश्न छळत आहेत. सोबत त्यांचं आधीच अस्तित्त्वात असलेलं व्यसनही आहेच. आता हे ड्रग्जचं सेवन जितकी स्वतःच्या निवडीनुसार केली गेलेली कृती आहे, तितकीच भोवतालामुळे केली गेलेली कृती आहे. उदाहरणार्थ, हॅरी आणि सॅरामधील संबंध जिव्हाळ्याचे नाहीत. ती त्या दोघांनाही छळणारी रिअॅलिटी आहे, जी त्यांना तीपासून पळण्यास प्रवृत्त करत आहे. मग हॅरीला ही पळवाट ड्रग्जच्या माध्यमातून सापडते, तर सॅराला टीव्हीवर झळकायच्या स्वप्नातून. मात्र या स्वप्नांचा पाठलाग करत असताना ते आसक्तीमध्ये अडकलेले आहेत. मग ती आसक्ती ड्रग्जची असो, वा त्या स्वप्नाची. हे स्वप्न म्हणजे त्यांची एकप्रकारची संभाव्य भविष्यात पूर्णत्वास जाऊ शकणारी कल्पना. आता त्यांचं व्यसन याच कल्पनेला चालना देण्याचं काम तर करत आहेच, पण सोबतच त्यांना वास्तवापासून पळण्यास मदत करत आहे. ज्यामुळे पुन्हा त्या व्यसनाची आसक्तीही वाढत आहेच. एकूणच या चारही गोष्टी एकमेकांना पूरक ठरत, या चारही पात्रांना शारीरिक, मानसिक पातळीवर आणखी पुढच्या थराला जाण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यांच्यापासून सुटका करवून घेणं सहजासहजी शक्य नाही, स्वप्नं आणि कल्पनांपासून तर नाहीच नाही.

या पात्रांचं वर्णन ‘सर्जनशील तरीही दुभंगलेली’ अशा शब्दांत करणं योग्य राहील. ज्यामुळे ती कायमच आत्मघातकी कृत्यं करताना दिसून येतात. जे डॅरेनच्या एका फिनॉमेनॉनला पूरक ठरतं. ते म्हणजे ‘एम्पथी इज अ ग्रेट गिफ्ट ऑफ सिनेमा’. ज्यामुळे या घटना तो म्हणतो त्याप्रमाणे ‘प्रेक्षकांच्या सहानुभूतीची परीक्षा’ असतात. त्याच्या पात्रांची आत्मघातकी, विध्वंसक मानसिकता आणि प्रवृत्ती त्यांना अधिक मानवी आणि सहानुभूतीपूर्ण छटा प्राप्त करून देते. त्यांना उद्ध्वस्त होताना पाहणं नकोसं ठरतं, आणि सदर दिग्दर्शकाला अपेक्षित असलेला परिणाम साधला जातो.

डॅरेनला केवळ तांत्रिकदृष्ट्या सजग म्हणणं हे एक अंडरस्टेटमेंट असेल. कारण तो सिनेमाशी निगडीत नव्या-जुन्या, ज्ञात-अज्ञात तंत्रांचा वापर करून कागदावरील संकल्पनांना ज्या प्रकारचं मूर्त स्वरूप देतो, ते निव्वळ थक्क करणारं असतं. वर उल्लेखलेला स्प्लिट स्क्रीनचा वापर दर काही वेळाने अधिकच परिणामकारक होत जातो. उदाहरणार्थ, सुरुवातीला सॅरा आणि हॅरी यांच्यामध्ये दरवाज्याच्या निमित्ताने दृश्य भिंत तर असतेच. पण पुढे जाऊन हॅरी आणि मॅरियन एकत्र असताना, अगदी सेक्स करत असतानाही ती दोघं स्प्लिट स्क्रीनमधून दाखवली जातात. परिणामी ती दोघं एकमेकांवर कितीही प्रेम करत असली तरी पुन्हा ती एकत्र असताना संभाव्य भविष्यातील कल्पनांमध्ये रममाण होत, वर्तमान आणि एकूणच वास्तवापासून पळ काढताना दिसतात, किमान तसे प्रयत्न करताना दिसतात. एकमेकांमधील हे वाढत जाणारं अंतर त्यांना खटकत नसलं, किंवा त्यांच्या लक्षातही येत नसलं तरी एव्हाना त्यांच्या आयुष्याचा साक्षीदार बनलेल्या कुठल्याही संवेदनशील प्रेक्षकाला ते आवर्जून खटकतं. परिणामी आपण पुन्हा डॅरेनच्या ‘एम्पथी’वरील भाष्याजवळ येऊन पोचतो. पुढे या चौघांचीही आयुष्यं वेगवेगळ्या दिशेनं वाटचाल करत असताना या सर्वांना एकाच वेळी पडद्यावर दाखवून त्यांचा मानसिक, शारीरिक पातळीवरील विध्वंस परिणामकारकपणे रेखाटला जातो.

डॅरेनला रूपकांमध्ये बराच रस असल्याचं दिसून येतं. ‘नोआ’ आणि ‘मदर!’मध्ये तो त्यांना अधिकच पुढच्या पातळीवर नेतो. ‘रेक्वीअम फॉर अ ड्रीम’मध्येही रुपकं आढळतात. या रूपकांना त्याची खासियत असलेले एक्स्ट्रीम क्लोज-अप्स आणि अगदीच लहानसहान गोष्टींचे आवाज टिपणारा साऊंड डिझाईन या दोन्हींची साथ लाभून चित्रपटातील प्रसिद्ध असे ड्रग्जच्या सेवनाचे सीन्स दिसतात. याखेरीज हॅलुजिनेशन्स हा पात्रांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भागही वारंवार दिसत राहतो. अभिनेत्यांचे एक्स्ट्रीम क्लोज-अप्स आपल्याला सदर पात्रांच्या आयुष्यात खेचून नेतात. त्यांच्या यातना केवळ पडद्यावर दाखवत नाहीत, तर आपल्यालाही त्या यातना भोगायला लावल्या जातात. सदर चित्रपटाकडे डॅरेनच्या इतर कुठल्याही चित्रपटाप्रमाणे कॅरेक्टर स्टडी म्हणून पाहता येतं. सर्जनशील तरीही दुभंगलेल्या पात्रांचा स्टडी.

आय नो की दोन्ही महायुद्धं फारच भयावह होती, त्यांनी एकूणच जगावर टाकलेला परिणाम पाहता कुणीही त्याचं समर्थन करणं शक्यच नाही. मात्र माझ्या मते या दोन्ही महायुद्धांनी आपल्याला, जगाला अधिक संवेदनशील बनवलं. ज्याचं प्रतिबिंब या दोन्ही महायुद्धानंतरच्या चित्रपटांमध्ये दिसून येतं. त्यापूर्वी प्रत्येकच गोष्टीला रोमँटिसाईज करण्याच्या अगदी उलट परिणाम घडून आपण वास्तवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागलो. पहिल्या महायुद्धाकडे आणि त्यातील ‘हॉरर्स ऑफ वॉर’कडे पाहणारे ‘पाथ्स ऑफ ग्लोरी’सारखे (१९५७) चित्रपट मिळाले. तर हाच दिग्दर्शित करणाऱ्या क्युब्रिकनं ‘डॉ. स्ट्रेंजलव्ह: ऑर हाऊ आय स्टॉप्ड वरिइंग अँड लव्ह द बॉम्ब’च्या निमित्ताने युद्धाकडे उपहासाने पाहिलं.

थोडक्यात काय तर, ‘आर्ट इमिटेट्स लाईफ’ हे जितकं खरं आहे, तितकंच याच्या उलटही खरं आहे. शिवाय, हे केवळ अनुकरणापुरतं मर्यादित नाही, तर अनेकदा कला वास्तवातील उणीवाही दर्शवते. वर उल्लेखलेले दोन्ही चित्रपट याचं उत्तम उदाहरण आहेत. ‘रेक्वीअम फॉर अ ड्रीम’मध्ये पोस्ट-ग्लोबलाइज्ड जगातील वाढती गुन्हेगारी, नात्यांमध्ये वाढत जाणारी दरी आणि परिणामी प्रत्येक व्यक्तीत दिसून येणारी अलिप्ततेची भावना, ग्लॅमर जगताचं आकर्षण अशा बऱ्याचशा गोष्टींचे संदर्भ आणि सबटेक्सट्ससोबतच ड्रग अॅडिक्शन आणि त्याच्या परिणामांचे भयावह स्वरूप ‘हॉरर्स ऑफ ड्रग यूज’च्या रूपात दिसून येतात.

याखेरीज डॅरेनच्या इतर चित्रपटांतही अतिरेकी महत्त्वाकांक्षा, मानवी स्वभावातील दोष आणि त्यांचे नकारात्मक परिणाम, वास्तवाच्या जवळ किंबहुना त्याच्याही पुढे जाणारा व्हायोलन्स अशा अनेक गोष्टी आढळतात. जे – Most violent acts are meant to bring about ethical and moral questions – या तत्त्वाला जागत हिंसेचं खरंखुरं स्वरूप समोर आणतात. हिंसा जोवर हार्ड हिटिंग नसेल तोवर ती किती जीवांना हानिकारक ठरते हे कळणं अशक्य ठरतं, आणि मला वाटतं हेच चित्रपटांचं महत्त्वाचं कार्य आहे, खासकरून मानवी स्वभावाच्या गडद छटा दाखवणाऱ्या चित्रपटांचं. पीस आऊट.

— अक्षय शेलार

लेखक अक्षरनामा ऑनलाईन पोर्टलकरिता चित्रपट समीक्षक म्हणून, तर दै. आपलं महानगरकरिता स्तंभलेखक म्हणून काम करतात.

लेखकाशी संपर्क साधण्याचे माध्यम: Facebook.

सदर लेखाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी किंवा फेसबुक चर्चेत भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.