नाईन्टीन नाईन्टी नाईन : ए लव्हस्टोरी (कथा)

तर १९९९ च्या जानेवारी महिन्यात प्रिन्सीपल शेठ यांच्याबाबत एकाएकी आदर आणि प्रेमाची सुनामी आली, त्याला कारणीभूत त्यांनी केलेली अद्भूत घोषणा होती. ही गोष्ट त्या घोषणेविषयी किंवा प्रिन्सिपल शेठ यांच्याविषयी नाही, तर त्यानंतर झालेल्या माझ्या मनातल्या केमिकल लोच्याविषयी आणि त्यामुळे वर्षभर घडत गेलेल्या धाडस मालिकांविषयी आहे.

१९९९ या सालात मी त्याकाळीही करियरच्या दृष्टीने मागास समजल्या गेलेल्या आर्ट्स शाखेत अकरावीत शिकत होतो. त्या वर्षी माझी गिटार वाजवण्यावर बऱ्यापैकी हुकूमत आली होती. माझ्या समवयस्क मुलांपेक्षा अधिक काळ मी एमटीव्ही पाहत होतो. डिस्कव्हरी चॅनल संपूर्णपणे हिंदी झाल्यानंतर तेही आवडीने सर्फ करीत होतो. एफटीव्हीवर चोवीस तास लाँजरी दाखवावे अशी माझ्या वयातील इतर तरुणांइतकीच माझीही तीव्र इच्छा होती. स्टार मुव्हीज, एमजीएम, एचबीओ आणि हॉलमार्कवर सिनेमामागून सिनेमा पाहण्याने घराघरांतील मुलांचे डोळे नाही, तर टीव्ही वर्षात अनेकदा बिघडत होते, पण या सिनेमा अट्टाहासात आणि चॅनल धुंडाळणीत इथल्या हिंदी सिनेमांचे प्लॉट, अभिनय आणि अभिनेते एकजात फोकनाड वाटू लागले होते. कॅसेटक्रेझ कमी होऊन महागड्या सीडीज आणि एमपीथ्रीचा अंमल वाढत असला, तरी लकी अलीच्या सुनो, सिफर अल्बम्सची कॅसेटच मी वॉकमनवर वापरत होतो. युफोरिया, सिल्करूट, सुनिता राव, कलोनियल कझीन, मिलिंद इंगळे यांच्याही माझ्याकडे कॅसेट्सच होत्या. सिनेमांमध्येही पॉपस्टार्स दिसत होते आणि हिंदी गाण्यांमध्ये पंजाबी शब्दांचा प्रभाव वाढला होता. ‘रात को नींद ना आवे’सारख्या गाण्यांची नाक्यावर खिल्ली उडविण्याचे ते दिवस होते. चॅनल्सवरचे कार्यक्रम, सिनेमे, गाणी, पॉप अल्बम्स, म्युझिक व्हिडीओ, जाहिरातींच्या जिंगल्स, दहा जीबी क्षमता असलेल्या पीसीमध्ये कुणा इतरांच्या हाती लागू नये म्हणून ‘गणपतीची आरती’ किंवा ‘वंदे मातरम’ नावाच्या फोल्डरमध्ये लपवलेले सहा जीबी बीपी आणि त्याची दुनियादारी या सगळ्या अवांतर पसाऱ्यात अभ्यासाला फुरसत मिळणे अ‍वघड व्हायला लागले होते. जगभरच्या सिनेमात १९९९ सालात संक्रमण झाल्याचे पुढे कधीतरी कळाले असले, तरी माझ्याप्रमाणेच कित्येकांच्या आयुष्यात या वर्षाने अनेकार्थांनी संक्रमण घडविले असेल.

त्याचीही ही गोष्ट ठरू शकेल.

 

१. तथाकथित परफेक्शनिस्ट आणि प्रेमारंभबिंदू

साधी राहणी आणि उच्चविचारसरणीच्या अतिसोसात प्रिन्सीपल असूनही पेहरावामुळे सदानकदा चपराशासारख्या दिसणाऱ्या शेठ आडनावाच्या मुख्याध्यापकाचा दरारा आणि दबदबा माझे कॉलेजचे अकरावीतील पहिले वर्ष संपत आले, तरी कुणावर पाहायला मिळाला नव्हता. समाजात त्यांचा खूप बोलबाला असल्याचे ऐकिवात होते, पण तसेही समाज-बिमाज आमच्या खिजगणतीत असण्याचे ते वय नव्हते. आमचे आदर्श आणि जाणीवा टीव्ही, सिनेमांमधल्या नायक-नायिकांमधून ठरत होते.

पेपरात शेठसरांचे नाव आणि वैचारिक लेखन येत होते. पण ज्युनियर कॉलेजमधे आमच्यापैकी सिरीयसली पेपर वाचणारे कुणीच नव्हते. त्यामुळे ते पेपरांत काय लिहीत असतील, ते आमच्या आकलनाच्या पलीकडले होते. याशिवाय इयत्ता पाचवी ते बारावीतल्या सर्व मुलांसाठी चारही माळ्यांवर वापरण्यास असणाऱ्या प्रत्येक मुतारीमध्ये ‘प्रिन्सीपॉल शेठ लंडपे बैठ’ या वाक्याची कॅलिग्राफी जागोजागी लिहून काढली असल्याने आमचे त्यांच्याबाबतचे मत बरेचसे चेष्टेचे बनले होते.

सुरुवातीला म्हणे या वाक्यांना वाचून मुख्याध्यापकांनी तीनचार वेळा मुताऱ्यांच्या भिंतींचे रंग बदलले, पण प्रत्येक रंगबदलानंतर ती वाक्ये आणि त्याहून ओंगळ भाषेत लिहिण्याची स्पर्धाच लागू लागली. मुलांच्या अशुद्ध मराठी लेखनातील कल्पकतेला कॉलेजच्या बाथरूममध्ये दरवर्षी नवविकृतीचे धुमारे फुटत होते. दहावी आणि बारावीतील मोकाट सुटलेल्या पोरांनी मुख्याध्यापकांना छळण्यात सर्वात वरची इयत्ता गाठली होती.

एके ठिकाणी आवाढव्य केसांसारखे काळसर झाड काढून त्याच्या सावलीमध्ये मुख्याध्यापकांना पॅरेशूट तेलाची बाटली घेऊन बसविले होते. त्या चित्राला नाव दिले होते ‘प्रिन्सीपॉल शेठ यांचा शाटवृक्ष’ एका माळ्यावरील स्वच्छतागृहाला तर मुलांनी प्रतिखजुरोहो करायचा विडाच उचलला होता. येथे मूर्तींच्या जागी मैथुनाची देखणी चित्रे काढण्यात आली होती. त्यातल्या स्त्री स्केचेसना बॉलिवुडमधल्या तत्कालीन नायिकांचा चेहरा होता, तर पुरूष स्केचेसना अर्थातच प्रिन्सिपल शेठ यांचा.

कोणत्याही विद्यार्थ्याला न ओरडणाऱ्या, शिक्षकाला न छळणाऱ्या आणि खऱ्याखुऱ्या चपराशावरही जरब नसणाऱ्या या गांधीवादी मुख्याध्यापकाकडून कुणाला उपद्रव होत नव्हता, हेच त्यांना त्रास देण्यात साऱ्यांचा उत्साह वाढता राहण्याचे महत्त्वाचे कारण होते.

ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरातील शतकाची परंपरा असलेली ती सर्वात मोठी शिक्षणसंस्था होती. संस्थेच्या नावावरही महात्मा गांधींचा प्रभाव होता. पण दुर्दैवाने आमच्या काळात यात शिकणाऱ्या एकाही मुलाला त्याची कळकळ नव्हती. स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाल्याचे त्यांना ए. आर. रेहमानने अल्बम काढला नसता तर अजिबातच कळाले नसते. कित्ती शास्त्रज्ञ, डॉक्टर, कलाकार, चित्रकार या संस्थेने घडविले याची गणतीच होणार नसली, तरी दरवर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या पाचवी ते बारावीच्या विद्यार्थांच्या आठवडाभर चालणाऱ्या स्नेहसंमेलनात त्यांचे तासभर तरी लांबलचक पाढे वाचले जात. तेवढे दिवस पोरे प्रिन्सीपल शेठ यांना छळण्याच्या नवनव्या क्लृप्त्या काढत.

या कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असे. पाहुण्यांकडून सरस्वती वंदना. मग दहावी-अकरावीतील मालसदृश पोरींकडून इशस्तवन. तेव्हा महान साहित्यिक, महान शास्त्रज्ञ, टीव्हीवर पुरस्कार घेताना दिसणारे महान कलाकार केवळ प्रिन्सीपल शेट यांच्या आग्रहास्तव संस्थेच्या अफाट मैदानात भाषण देण्यास येत. जाहीरपणे पोरा-पोरींच्या समूहावर वैचारिक बलात्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर मग ‘कसे जगावे, कसे असावे, कसा अभ्यास करावा’ याचे प्रिन्सीपल शेठ यांचे सूत्र बराच काळ चाले. ते संपल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम. म्हणजे आम्ही ज्यांच्यावर लाईन आणि मुठ मारायचो, त्या पोरींना साडीतल्या पेहरावात डान्स किंवा नाटकात काम करताना पाहावे लागण्याचा अत्याचार चाले.

नव्व्याण्णव सालात प्रिन्सीपल शेठ यांच्यावर पाचवीतला मुलगाही अथक विनोद करायला चुकत नसताना साऱ्यांची तोंडे प्रिन्सीपल शेठ यांनी एका घोषणेने बंद केली.

यंदा आपल्या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणा म्हणून ‘तथाकथित परफेक्शनिस्ट’ या अभिनेत्याला आमंत्रण देण्यात आले असून त्यांनी ते स्वीकारले असल्याची ती घोषणा म्हणजे संस्थेच्या शंभर वर्षांच्या परंपरा जपण्याच्या इतिहासाला लोणाररूपी भगदाड होते. कोणत्या तरी नातेवाईकांच्या ओळखीतून त्यांची म्हणे या अभिनेत्याशी भेट झाली होती. प्रिन्सिपल शेठ यांच्याशी चलाखपणे बोलणाऱ्या या अभिनेत्याला त्यांनी ‘आमच्या संस्थेच्या कार्यक्रमात येणार का?’ असे विचारले. अन् शेठ यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘त्या उमद्या माणसाने नुसताच शब्दाचा मान राखला नाही, तर तास-दोन तास तुमच्याशी गप्पा मारण्याची तयारी दर्शवली. अशा कोणत्याच कार्यक्रमाला तो जात नाही. पण आपल्या संस्थेच्या कामाची कल्पना असल्याने त्याने येण्यास होकार दर्शवला.’

आजवर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्याच्या आठवणी काढणारे, चीन युद्धात सहभागी झालेले, दुष्काळाच्या कहाण्या सांगणारे, कुष्टरोगाविरोधात लढा देणारे, खळबळजनक नाटके लिहून गाजलेले, महाराष्ट्राचे लाडके, उपलाडके, थोडे-अधिक लाडके, थोेडे कमी लाडके असे बरेच दिग्गज व्यक्तिमत्त्व संस्थेच्या विद्यार्थांनी मुख्य पाहुण्यांच्या रुपाने पाहिले होते. सगळ्यांनी आपल्या क्षेत्रात जे काय उपटायचे ते उपटून बराच काळ लोटला होता. आता त्यांना कुणी विचारेनासे न झालेल्या काळात ते संस्थेचे प्रमुख पाहुणे बनले होते.

इथे हा अभिनेता दहा-बारा वर्षे ‘इश्क, प्रेमा’ची गाणी पडद्यावर गात होता. जाहिरातींमधून आधी लोकांना पेप्सी प्यायला लावत होता आणि काही वर्षे लोटल्यावर कोका-कोलाच कसे छान आहे, हे पटवून देत होता. लोकांसमोर आपली प्रतिमाच सर्वोत्तम, देवरूपी राहील अशाच मुलाखती देत होता आणि आपल्या चित्रपटांची जीव तोडून मार्केटिंग करत होता. अजून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली नसली, तरी भारतीयांसाठी मात्र तो प्रचंड लाडका होता. त्याची ‘अर्थ’, ‘इश्क’, ‘गुलाम’मधली गाणी तेव्हा गाजत होती आणि ‘सरफरोश’ची ट्रेलर्स सुरू झाली होती. त्यामुळे खरोखरच लोकांच्या मनावर अधिराज्य की काय ते वगैरे गाजविणाऱ्या कलाकाराला बोलविण्याची किमया प्रिन्सीपल शेठने आपणहून केल्याचे ऐकल्याबद्दल सगळे चाट पडले.

या घोषणेनंतर आख्ख्या शाळेतल्या पोरा-पोरींना या येणाऱ्या पाहुण्यासमोर संस्थेची लाज घालवू नका, हे आवाहन करायची गरज  लागली नाही. तेही ‘तथाकथित परफेक्शनिस्ट’च्या अभिनय प्रेमात आणि तो येऊन आपल्याशी बोलणार या कल्पनेत रंगून गेले. चारही मजल्यांच्या प्रसाधन गृहातील ‘प्रिन्सीपॉल शेट’ या नावाने खिल्लीयुक्त मजकूर एका दिवसात गायब झाला. चित्रकलेच्या शिक्षकांसह त्यांच्या गुणवंत पोरांनी तेथे प्रसन्न चित्रांची रंगरंगोटी केली. ‘परफेक्शनिस्ट’ला स्टाफरूमचे वॉशरूम आरक्षित करण्यात येणार असले, तरी कधी चुकून तो किंवा त्याच्या ड्रायव्हरला आपात्कालिन परिस्थितीत वापरावे लागले तर संस्थेची लाज जाऊ नये म्हणून हा खटाटोप सुरू झाला.

मी आणि आमच्या वर्गातील मुले या प्रकाराकडे गंमतीने पाहत होतो. माझ्या शेजारी बसणाऱ्या रितेश मारणेच्या मते ‘परफेक्शनिस्ट’ अभिनेता येण्याची शक्यता जराही नव्हती. हे त्याचा डुप्लिकेट आणण्याची शक्यता जास्त असल्याचे तो सारखे सगळ्यांना सांगत होता. पण एकूणच त्याच्या बोलण्यातून तोही परफेक्शनिस्टचा किती भक्त आहे, हे दिसत होते.

मला शाहरूख खान आवडत असला, म्हणून मी ‘तथाकथित परफेक्शनिस्ट’चा तिरस्कार करीत होतो अशातला भाग नाही. वयाच्या एका टप्प्यापर्यंत मीही त्याचे सुपरहिट आणि त्यानंतरचे डझनभर फ्लॉप सिनेमे आवडीने पाहिले. त्यांतली गाणीही कॅसेटमध्ये जपून ठेवली. पण पुढे टॉम हँक्सचे सिनेमे पाहिल्यानंतर त्याची नक्कल करणाऱ्या या अभिनेत्याविषयी कुतूहल कमी व्हायला लागले आणि त्याच्या अभिनयाने चुत्या होणाऱ्या अवघ्या भारतातल्या सिनेप्रेमींची गंमत वाटायला लागली. लोक त्याच्या डायलॉग्ज, टायमिंग आणि मेहनतीच्या चर्चा करीत त्याला परफेक्शनिस्ट हे बिरूद लावून मोकळे झाले. मला मात्र तो कधीच परफेक्शनिस्ट वाटला नाही. ज्याचा प्रत्येक हिट आणि तिकीटबारीवर विक्रीचे विक्रम करणारा सिनेमा कोणत्या ना कोणत्या चित्रपटावरून चलाखपणे उचललेला असेल, त्या अभिनेत्याला परफेक्शनिस्ट म्हणणे मला अतीच वाटायचे. त्यामुळे ‘तथाकथित परफेक्शनिस्ट’ किंवा त्याचा डुप्लिकेट असा कुणी संस्थेच्या कार्यक्रमात आला, तरी मला त्यात स्वारस्य नव्हते.

पण या निमित्ताने आठवड्याभरामध्येच संस्थेचे रुपडे बदलले आणि बॉलीवूडचा ताजा स्टार येणार म्हणून पाचवीपासून सगळ्याच वर्गातील शिक्षकांसह विद्यार्थीही चेकाळले. प्रिन्सिपल शेठसोडून चपराशासह प्रत्येक शिक्षकवर्गाचा पेहराव बदलला. ‘तथाकथित परफेक्शनिस्ट’च्या भक्त पोरांना त्याच्याशी बोलायचे होते. प्रत्येक पोरीला जणू तो आपल्या पुढच्या चित्रपटातील हिरोईन म्हणून निवडायला येणार असल्यासारखे त्यांचा मेकअप पाहून वाटायला लागले होते.

‘आती क्या खंडाला’ या गाण्यावर अनेकांना परफॉर्मन्स करायचे होते. आमच्या वर्गातल्या पराग मुंबरकरला त्याचे ‘रंगीला’ आणि ‘गुलाम’मधील सारे डायलॉग पाठ होते. त्याने उजव्या हाताच्या चार बोटांमध्ये या दिवसांत कुठून शोधून शोधून जाडजूड अंगठ्या लावल्या होत्या. ‘परफेक्शनिस्ट’शी त्या हाताने एकदाच शेकहँड करून द्यावे, अशी विनंती त्याने प्रिन्सीपल शेठ यांच्या केबिनमध्ये जाऊन सभ्य भाषेत केली होती. अन् ती कबुल झाल्यामुळे प्रिन्सीपल शेठ यांचे आयुष्यात पहिल्यांदा त्याने स्तुतीस्तोत्र सुरू केले होते.

डुप्लीकेट परफेक्शनिस्ट आल्यानंंतर या सगळ्यांचा भ्रमनिरास होईल, अशी अटकळ बांधली असताना झाले मात्र भलतेच. ठरलेल्या दिवशी नियोजित वेळेच्या थोडे आधीच तथाकथित परफेक्शनिस्टची गाडी इतर चार गाड्यांच्या ताफ्यासह शाळेत दाखल झाली आणि त्याभोवती विद्यार्थांआधी शिक्षकांनी मूर्खासारखा गराडा केला. सुरक्षा लवाजम्याने दोन मिनिटांत त्या शिक्षकांना ‘हाड’ करीत तथाकथित परफेक्शनिस्टला बॅकस्टेजवरून प्रिन्सीपलच्या केबिनमध्ये नेले. तेथे फुलदाणी, थूकदाणी इतकेच नाही तर मूत आणि गू-दाणी घेऊन बारावीच्या वर्गातील मुलांनी आधीच कोंडाळे केले होते. पण सुरक्षारक्षकांनी त्या सगळ्या हौशी मुलांनाही आटोक्यात ठेवले.

अख्ख्या मैदानात मुला-मुलींचा चित्कार सुरू होता. काहींचे पालकही या अभिनेत्याला प्रत्यक्षात पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत बसले होते. आपण ‘परफेक्शनिस्ट’ला याची देही, याची डोळा इतक्या जवळून प्रत्यक्ष पाहिले, हे सांगायसाठी प्रत्येकाकडे आयुष्यभरासाठी एक गोष्ट तयार होणार होती. राखाडी टी-शर्ट, काळी जीन्स आणि डोक्यावर राखाडी टोपी घातलेला परफेक्शनिस्ट फक्त प्रिन्सीपल शेठच्या केबिनमध्ये त्यांच्यासोबत गप्पा मारत होता, ही गोष्ट प्रत्येकाला प्रिन्सीपॉलबाबत हेवा वाटून देणारी होती.

स्टेजवर तथाकथित परफेक्शनिस्टचे आगमन झाल्यानंतर सारे मैदान थरारून गेले. शिट्या, टाळ्या आणि दाद यांनी हैराण झालेल्या मैदानातील श्रोत्यांना त्याने एका वाक्यातच शांत केले. त्याने दीप प्रज्वलन केल्यानंतर पाठीमागे उभ्या असलेल्या कंड्या मुली इशस्तवन सुरू करायला विसरल्या. कसेबसे ते उरकून घेतल्यानंतर या पाहुण्याची प्रिन्सीपल शेठ काय ओळख करून देतो, याकडे साऱ्यांचे कुतूहल लागले.

त्या दिवशी प्रिन्सीपल शेठच्या कसे जगावे, कसे वागावे या भाषणाला कुणीच कंटाळले नाही. आधीच्या वर्षांत आलेल्या पाहुण्यांसारखेच पोरांना तथाकथित परफेक्शनिस्टने लेक्चर दिले. फक्त ते हिंदीमधून होते. कुणालाही ते लेक्चर आपल्यावर अत्याचार करणारे असल्याचे भासले नाही. ‘लगन’, ‘मेहनत’, ‘सपना पूरा करना’, ‘जो करो वो दिलसे करो’ या शब्द आणि मंत्राला कानात साठवत सगळ्या पोरा-पोरींनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले. भाषण संपले. त्याने आमच्यासोबत गप्पा मारल्या. पण आम्हाला मात्र त्याच्यासोबत गप्पा मारता आल्या नाही. एका कोळीगीतावरचे नृत्य त्याने प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेतून पाहिले. ती गाणी रंगात आल्यानंतर कुणालाही समजणार नाही, इतक्या चलाखपणे मैदानातून बाहेर पडण्याचा कार्यक्रम त्याने आखला.

हे सारे असेच होणार, याचा आम्ही अंदाज केला होताच. पण आमच्यासारख्याच कित्येक वर्गांतल्या पोरे-पोरीही कटलेला पतंग पकडण्याच्या जोशात वेगवेगळ्या कोपऱ्यांवरून टेहळणी करीत होते. पराग मुंबरकरसह मी, रितेश आणि आणखी आठ-दहा जण तो बाहेर पडण्याची वाट पाहत त्याची गाडी दिसेल अशा ठिकाणी उभे होतो. त्यांच्यापैकी मला परफेक्शनिस्टची सहीही नको होती किंवा त्याच्याशी बोलण्याचीही इच्छा नव्हती. आतमध्ये सुरू असणाऱ्या कोळीगीतांवरचे नृत्य मला टाळायचे होते. पहिलीत असल्यापासून गॅदरिंगमध्ये मी हीच गाणी आणि त्यावरचे नृत्य पाहत होतो. तरी त्यात बदल झालेला नव्हता. म्हणून मी परफेक्शनिस्टशी बोलायच्या उत्साहात असलेल्या आणि त्याला कडकडून भेटायची उत्सुकता असलेल्या पोरांसोबत निव्वळ साथसंगतीकरिता होतो.   

गाडीच्या दिशेने तो जातोय हे दिसताक्षणी शंभर-दीडशे मुली वटवाघळांच्या थव्यासारख्या जोराने त्याच्या ताफ्याकडे धावत येताना दिसल्या. त्या सर्वांच्या चेहऱ्यावर हासू, आसू आणि एकमेकांना नामोहरम करण्याचे बळ होते. काही सेकंदापूर्वीच आपण अनाथ झालो असून परफेक्शनिस्टशी बोलल्यानंतरच आपल्या आयुष्याचे सार्थक होईल असा भाव तेथे होता. अचानक प्रगटलेल्या त्या दीडशेहून अधिक मुलींना आवरणे त्याच्या सुरक्षा ताफ्यालाही अवघड गेले. त्या गर्दीचा लाभ घेत पराग मुंबरकर गर्दीत शिरून चारेक जणींना दाबून परत आला. आता आम्ही परफेक्शनिस्ट विसरलो. वाढत चाललेल्या पोरींच्या घोळक्यात स्वत:ला घुसवून बाहेर येण्याचे अन् त्यात हवे ते कर्म साधून घेण्याचे कार्य करू लागलो. म्हणजे आम्हाला काहीच करावे लागत नव्हते. आम्ही ताकातल्या रवीसारखे पोरींना घुसळून बाहेर येत होतो. परफेक्शनिस्टची गाडी सुरू झाली आणि मुलींची गर्दी वाढली. त्याच्या गाडीवर पोहोचणे आम्हाला तरी अवघड वाटू लागले. त्याच्या गाडीसमोर येऊन तिघीजणी लोळून खाली पडल्या. शेजारच्या तुकडीतल्या जान्हवीने ‘आय लव्ह यू’ लिहिलेला टीशर्ट काढून त्याच्या गाडीवर भिरकावला. आम्ही खूप प्रयत्न करून जान्हवीला टी-शर्टहीन अवस्थेत पाहण्याचा प्रयत्न केला.पण त्या बेभान गर्दीच्या लोटात आम्ही गाडी पाठोपाठ तळावपाळी परिसरातील पाणपोईपाशी पोहोचलो.

उंडगेगिरी करणाऱ्या पोरांऐवजी पोरीच संस्थेची लाज घालवत असल्याचे स्पष्ट झाले होते. आमच्या वर्गात खाली मुंडी पाताळ धुंडी असलेल्या कैक पोरी परफेक्शनिस्टला आपल्या घरीच घेऊन जाण्याच्या मनसुबा रचत होत्या.

अखेर परफेक्शनिस्टची पंचाईत झाली. वर्गात असलेल्या अभिपर्णा बापटने त्याच्या गाडीवर चढून आणि त्यावर चक्क झोपून आपल्या फॅनपणातील अव्वलतेचे दर्शन घडविले. परफेक्शनिस्टशी दोन शब्द बोलल्याशिवाय ती गाडीवरून उतरणार नाही, हे तिने जाहीर केले आणि भररस्त्यात तिला पोरींनी चिअर्स केले. या प्रकाराने दोन-तीन मिनिटांतच तळावपाळी ते स्टेशन परिसरात अभूतपूर्व वाहनकोंडी झाली आणि परफेक्शनिस्टने बाहेर येऊन सर्व मुलींना दूर जाण्याची विनंती केली. अभिपर्णा बापटला आपली कॅप काढून त्यावर सही करून दिली. त्यानंतर तिने त्याला मिठीच मारली.

थोड्यावेळाने परफेक्शनिस्टचा लवाजमा दूर गेल्याने वाहतूक जरी पूर्ववत झाली. मात्र हर्षवायू झाल्यासारखी अभिपर्णा बापट परफेक्शनिस्टची टोपी घेऊन त्याच रस्त्याच्या कोपऱ्यात आपल्या मैत्रिणींसोबत नाचत राहिली. कॅडबरी डेरीमिल्क चॉकलेटच्या एका जाहिरातीमधली तरुणी आपल्या प्रियकराच्या कर्तुत्त्वाने भारावून जात नाचते तसे तिचे ते नृत्य पाहून मी सर्वार्थाने भारावून गेलो.

जुन्या अगदीच ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट सिनेमापासून ते नव्वदीतल्या कोणत्याही चित्रपटात नायकाने नायिकेला पाहिल्यानंतर गाणे सुरू होणारी जी परिस्थिती तयार होते, तशी परिस्थिती तळावपाळी आणि स्टेशनरोडला सांधणाऱ्या चौकामध्ये माझ्याबाबतीत झाली.

अकरावीच्या अख्ख्या वर्षांत कुणाचे कुणावर प्रेम जडायची शक्यता नव्हती. कारण त्या काळात आमच्या वर्गात तीनच प्रकारच्या मुली होत्या. ज्या मुलांशी मोकळे वागणाऱ्या मुली होत्या, तर त्या आधीच नववी-दहावीपासून एंगेज्ड होत्या. ज्या फटकून वागत होत्या, त्या आधी एंगेज्ड होऊन त्यातून योग्य तो धडा घेत पुन्हा चूक करायची नाही याबाबत ठाम असलेल्या होत्या. तर तिसरी कॅटेगरी क्रॅक करता न येणाऱ्या पासवर्डसारखी, मुलांपासून कायम अलिप्त राहणारी होती. अत्यंत मेहनत घेतली, तर बॉलिवुडच्या सिनेमातील वळणांप्रमाणे त्यांच्यात बदल होण्याची शक्यता होती. पण तेवढी मेहनत घेण्याची फुरसद आणि ताकद कुणातच नव्हती.

अभिपर्णा बापटची तपशीलात माहिती काढून घेतल्यानंतर ती मुलींच्या तिसऱ्या कॅटेगरीतच मोडणारी होती. पण आवडीच्या अभिनेत्याच्या सहीसाठी आख्खा चौक अडवून ठेवण्याची क्षमता असलेली मुलगी कुणावर प्रेमही तितक्याच तन्मयतेने करू शकेल या विचाराने माझ्या मनात तिच्याविषयीचे आकर्षण अचानक वाढायला लागले.  डोक्यात कुमार शानूची ‘दिल परदेसी हो गया’ छापाची गाणी वाजू लागली आणि पंजाबी गाण्यांतील ज्या शब्दांची खिल्ली उडविली होती, तीच गुणगुणावीशी वाटायला लागली.

अन् हे सारे झाले त्याला त्या तथाकथित परफेक्शनिस्टचे कॉलेजमध्ये येणे कारणीभूत ठरले. प्रिन्सीपल शेठच्या पेहरावात या इव्हेण्टनंतरच्या वर्षभरात काडीचाही बदल झाला नाही. तरी आम्ही पुढले वर्ष त्या कॉलेजमध्ये असेपर्यंत तरी त्याचा मान आणि प्रतिष्ठा तथाकथित परफेक्शनिस्टला आणल्यामुळे अबाधित राहिलेली होती. परफेक्शनिस्टला गराडा घालताना हिस्टेरियाचा सामूहिक अटॅक आलेल्या त्या पोरींचे चेहरे माझ्या आजही स्मृतीत आहेत.

त्या सगळ्यांपैकी बहुतांश आता आपल्या सातवी-आठवी इयत्तेतल्या मुलांना परफेक्शनिस्टला पाहिल्याचा प्रसंग कसा रंगवून सांगत असतील, याबाबत मला खूप कुतूहल आहे. परफेक्शनिस्टने तेव्हा अभिपर्णा बापटच्या डोक्यावर टोपी घातली, तशी नंतर दरएक चित्रपटांमधून अवघ्या भारतीय आणि परदेशी प्रेक्षकांनाही अदृश्य स्वरूपातील टोपी घातली. त्यामुळे आजही तथाकथित परफेक्शनिस्ट हॅपी एंडिंग सिनेमांतला हिरो किंवा हिंदुस्थानचा खराखुरा ठग आहे. अकाली ढेरपोट्या बनलेल्या आमच्याकडे मात्र असफल किंवा अर्धसफल प्रेमस्मृतींच्या कथा आहेत.

 

२. सिनेमा, संगीत आणि प्रेम आरंभ…

तर १९९९ च्या वर्षारंभातल्या थंडीच्या दाट धुक्यात स्नेहसंमलेन आटोपल्यानंतर कॉलेज पुन्हा नित्यनेमाने सुरू व्हायला लागले आणि अभिपर्णा बापटवरच्या प्रेमासह माझा तिथला वावर सुरू झाला. म्हणजे सारखे तिला पाहायचे आणि तिच्याशी बोलण्याच्या संधी शोधायच्या, या गोष्टी सुरू झाल्या. रितेश, पराग, गिरीश आणि सुशांत या मित्रांनी या साऱ्यामध्ये मला बरीच सल्लारूपी मदत केली. एकप्रकारे त्यांच्या प्रोत्साहनातून माझी प्रेमभूक वाढत गेली.

आर्ट्समध्ये एकूणच अ‍ॅडमिशन घेणाऱ्यांची संख्या कमी. त्यात एकूणएक मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यमवर्गीय घरातले. निम्म्या मुलींना इतर कशातच रस नसल्याने त्यांनी आर्ट्स घेतले होते. बाकी डीएड, पॅथॉलॉजी वगैरे करण्याचा चंग बांधून शिकत होत्या. मुलांपैकी अर्ध्याहून अधिक पार्टटाइम जॉब करीत शिकत होते. काहींनी आर्थिक परिस्थितीच्या मर्यादेतून आर्ट्स घेतले होते तर काहींनी बौद्धिक कमतरतेतून हा मार्ग निवडला होता. मीही मध्यमवर्गीय घरातला असलो, तरी पार्टटाइम जॉब करावा लागत नव्हता इतकी चंगळ होती आणि गिटार शिकण्याइतपत आर्थिक मुभा होती. गिटारमध्ये मला करियर करायचे म्हणजे काय, हे मला तेव्हा माहिती नव्हते. पण एकूणच गणिताचा तिटकारा असल्याने आणि कथा-कादंबऱ्या वाचायची थोडीशी आवड असल्याने मी आर्ट्सला आलो होतो. ज्युनियर कॉलेजनंतर पुढे तीन वर्षांत ग्रॅज्युएशन करून आपण काय करणार हे ठरले नव्हते. पण म्युझिकमध्येच काहीतरी करणार यावर घरच्यांना अधिक विश्वास असल्याने त्यांनी चांगले मार्क असलेल्या मला कॉमर्स, सायन्स किंवा त्यावेळी लोकप्रिय असलेल्या इंजिनिअरींगला जाण्यास भाग पाडले नाही. वडलांसह दोन मोठे भाऊ नोकरीला होते. तळावपाळीजवळच वडिलोपार्जित मोठे घर असल्याने त्यात गॅलरीला लागून छोटी का होईना स्वतंत्र खोली होती आणि त्यामुळे त्या काळात वर्गातील कोणत्याही मुलाला त्यांच्या घरात लाभली नसेल इतकी एकांताची मौज होती.

आमच्या धोबीआळीत माझ्या वयाचे कुणीच आर्ट्सला नव्हते. कुणी सिव्हिलला होता तर कुणी कॉम्प्युटर, मॅकॅनिकल किंवा केमिकलला. प्रत्येकाच्या घरी पीसी होता. नाक्यावरच मुलांचा, एमपीथ्री आणि सिनेमांच्या सीडीज एक्सेंजचा कार्यक्रम नित्यनेमाने चालायचा. क्रिकेट, व्हिडीओगेम हे विषय चर्चेत होते पण त्यातली गंमत हळूहळू कमी होत होती. हिंदी सिनेमांत प्रेमाचा विषय चावून चोथा झाला होता, तरी नव्यानव्याने प्रेमचिपाड कथा असलेले सिनेमे येत होते. नवी पिढी त्यातून घ्यायचे ते बोध घेत होती. त्यातल्या डायलॉग्ज आणि गाण्यांची खिल्ली उडवत होती.

१९९८ सालात ‘प्यार तो होनाही था’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘जब प्यार किसीसे होता है’ आणि या तीन प्रेमप्रसारक सिनेमांवर कडी करणाऱ्या ‘कुछ कुछ होता है’ हे सुपर ड्युपर हिट सिनेमे पाहून आणि त्यातील गाणी टीव्हीवर शेकडोवेळा पाहूनही माझ्या मनात प्रेमांकुर फुलला नव्हता. कदाचित तो जानेवारी ९९मध्येच फुटायचा होता म्हणून. सिनेमांत परदेशी देखणी दृश्ये असलेली गाणी आणि त्यांचे शब्द मला कचकड्याचे वाटत होते आणि त्या गाण्यांमधील किंवा सिनेमांमधील चित्रित झालेल्या सुंदर प्रदेशापेक्षा मला डिस्कव्हरी चॅनलवरचा ‘लोन्ली प्लानेट’ कार्यक्रम अधिक सुंदर दृश्ये दाखवत होता.

त्यावेळी ‘लोन्ली प्लानेट’ माझ्या सर्वाधिक आवडीचा टीव्ही कार्यक्रम बनला होता. कॉलेजातून आल्यावर दुपारी बारा ते एक मी आधाशासारखा इयन राईट आणि जस्टिन शिपेरो घेऊन जात असलेल्या एकेका देशावरचा एपिसोड पाहत असे. डिस्कव्हरीचे तेव्हाचे घोषवाक्य होते ‘आज आपने क्या खोजा’. मी ते सगळ्याच बाबतीत लावायचो. म्हणजे आज गिटारवर कोणते नवे कॉर्ड शोधले, कोणत्या नवीन गाण्याचे कॉर्ड बसविले.

‘लोन्ली प्लानेट’ संपल्यावर तीन तास गिटार. संध्याकाळी एक तासाचा क्लास. तेथून आल्यावर दोन तास एमटीव्ही, संध्याकाळी नाक्यावर एक दोन तास टाइमपास आणि रात्री पुन्हा गिटार किंवा झोपेस्तोवर वॉकमनवर गाणी ऐकणे असा माझा दिनक्रम असे. अभिपर्णावर बसलेल्या प्रेमानंतर यात खंड कमी पडला नसला तरी वेळापत्रक बऱ्यापैकी बिघडले.

कॉलेजमध्ये एकत्र आल्यानंतर सहा महिन्यांची ओळख असलेल्या आम्हा मित्रांची फेब्रुवारी महिन्यामध्ये गहिरी दोस्ती झाली. माझे जसे अभिपर्णावर प्रेम बसले होते, तसेच रितेश, गिरीश आणि पराग यांचेही वर्गातल्या तिसऱ्या गटातल्या एकेका मुलीवर प्रेम बसले होते.

मुलींना पटविण्याचे परागकडे शेकडो प्लान होते. त्यातले टॉप थ्री काढायाचे झाले तर, बनावट लुच्चे-लफंगे आपल्या लाईनवर सोडायचे. ते तिला छेडत असताना आपण थेट त्यांच्यापासून तिला सोडवायचे. किंवा तिच्या मौल्यवान वस्तू पळवायच्या आणि ती शोधत असताना अचानक तिला सापडवून द्यायच्या. किंवा परीक्षेत इंग्लिश किंवा हिस्ट्रीच्या कठीण पेपरात काही संकट असेल, तर तिला मदत करून मन जिंकून घ्यायचे. यातला पहिला प्लान तद्दन फिल्मी होता. दुसरा प्लान साकार व्हायला मुलींच्याकडे घड्याळापलीकडे मूल्यवान गोष्ट नव्हती. तिसरा प्लान ठरवायचा झाला, तर त्या दोन्ही विषयांत परागची स्थिती यथातथा होती.

रितेश वर्तक नगरमध्ये, पराग खारेगावमध्ये आणि गिरीश ओवळ्यामध्ये राहायचे. या प्रत्येकाचे नियोजित आयटम कॉलेजगेट किंवा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या बसस्टॉपवरून बस पकडत. त्यांनाही बसनेच घरी जावे लागे. मी कॉलेज सुटल्यावर घरी दहा मिनिटांत चालत जात असे. पण स्नेहसंमेलनानंतर आता त्यांच्यासोबत बसस्टॉपवर गंभीर विनोदी चर्चेत वेळ उत्तम जायला लागला.

ही लोक्स कधी दोन-दोन बस सोडत असत. दुपारी दोन वाजेपर्यंत आम्ही तेथे कसल्याही विषयावर गप्पा मारायला लागलो. सिनेमातील, पॉप अल्बममधील गाणी, जस्ट मोहब्बत, रिश्ते या सिरिअल्समधल्या गोष्टी किंवा स्टार मुव्हीजवरच्या अ‍ॅक्शन फिल्म्समधले स्टंट्स असे काहीही त्यात असे.

फेब्रुवारीत रितेशने केमिस्टच्या दुकानात असलेला त्याचा पार्ट टाइम जॉब सोडला आणि तो दिवसभर मोकळाच झाला. मग मी गिटारची दुपारची बॅच घेतली. हे तिघेही शहराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून आपली सायकल काढून संध्याकाळी शहराच्या मध्यभागी असलेल्या माझ्या घरी येत. माझी हिरो रेंजर घेऊन आम्ही तळावपाळीवर रात्रीपर्यंत बसू लागलो.

आमचे पहिले धाडस होते आपापल्या नियोजित आयटम्सच्या घरी फोन करायचे. टेलिफोन एक्सेंजने शहरातील टेलिफोन नंबर्सची तीन चार ग्रंथांसारखी मोठी डिरेक्टरी आमच्यासारख्या प्रेमपिपासूंसाठीच निर्माण केली होती की काय ते माहिती नाही, पण ती उत्तमरित्या हाताळण्यात काहीच दिवसांत रितेशने सिद्धीच प्राप्त केली होती. त्यांच्या नाक्यावरच्या मुलांना कोणत्याही मुलीचा नंबर तिचे आडनाव आणि परिसर सांगितले की शोधून देई. अभिपर्णा शहरातल्या कोणत्या भागात राहते, हे पराग आणि रितेशने आठवड्यात शोधून काढले. अन् त्याच दिवशी रितेशने फोन नंबरही शोधून काढला.

व्हॅलेण्टाइन दिवसाच्या आठ दिवस आधी मी अभिपर्णाच्या घरी कॉइनबॉक्सवाल्या फोनवरून रोज दहावेळा तरी फोन केला. कॉलर आयडी असला तर रिस्क नको, हा रितेशने दिलेला सल्ला होता. त्यातल्या पाच सहा वेळा तिने उचलून ‘बोलायचे नसेल, तर फोन का करायचा?’ असे रागात विचारले होते.

व्हॅलेण्टाइनच्या दिवशी आम्ही सगळ्यांनी आपापले प्रपोज उरकून घ्यायचे ठरले.

गायत्री मोरे नावाच्या नाजूक मुलीला रांगड्या परागने पहिला प्रपोज केला. वरवर नाजूक दिसणाऱ्या या मुलीने आपले लग्न ठरले असल्याचे सांगून त्याला बाद केले. वर दु:खी झालेल्या त्याचे सांत्वनही केले. रितेशला रुपालीने नकार दिला नाही, पण ‘विचार करून सांगेन’ असे सांगत आशेला वाव ठेवला. गिरीशला समीराने थेट नकार दिला आणि कळवा-खारेगावच्या बसस्टॉपजवळ माझ्या प्रपोजला अभिपर्णाने बराच वेळ माझी फिरकी घेत भिरकावून दिले.

‘प्रेम करतो म्हणजे काय करतोस?’

‘तू प्रेम करतोस, तर कर, मी काय करावे असे तुझे म्हणणे आहे?’

‘पहिल्या प्रश्नाचे उत्तर आधी हवे. त्याचे उत्तर नाही दिले, तर प्रपोजलाही उत्तर मिळणार नाही.’

इतक्या ठामपणे तिने मला हे सांगितल्यावर माझी तंतरली. त्या क्षणी शेकडो हिंदी सिनेमांत प्रेम व्यक्त करायची टीपिकल वाक्येच माझ्या मनात घोळवली. अन् त्या वाक्यांमधला धोपटपणा उमगल्यानंतर माझ्या ओठांवर काहीच आले नाही. ‘मला तू आवडतेस किंवा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही किंवा मला रात्री झोपताना तू आठवतेस आणि झोप लवकर लागत नाही’ या वाक्यांचा तिने खुर्दा कसा केला असता, याची भीती वाटायला लागली.

‘विचार करून सांगतो.’  माझ्या तोंडातून हेच निघाले.

‘हे माझे वाक्य असायला हवे. तू कसला विचार करून सांगणार?’ अभिपर्णा माझी पुन्हा कल्हई करायला लागली.

‘हेच, की प्रेम करतो म्हणजे काय करतो.’ मी घाबरत बोललो.

‘ओके, वाट बघते.’ म्हटल्यानंतर ती खिदळायला लागली.

‘अरे हे तर तुझे वाक्य असायला हवे होते. मीच बोलून गेले.’

मला काही काळ काय बोलायचे ते न सुचल्याने मी तसाच उभा राहिलो. तिची बस आल्यानंतर ती धावत त्या बसमध्ये शिरली. जवळच उभ्या असलेल्या माझ्या मित्रांना तिच्या खिदळण्याने माझे काम झाले, असा भ्रम झाला. पण मी सांगितलेल्या आमच्या संवादाला ऐकून तेही बुचकळ्यात पडले.  

‘काय रे राहुल, म्हणजे ती हो की नाय यातले कायपण बोलली नाय?’ पराग मुंबरकरने विचारले. त्याच्या स्वत:च्या दु:खाचे पूर्ण सांत्वन झाले होते.

‘तिला सांगायाचे ना तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.’ रितेशने मराठीच्या पुस्तकातील सध्या शिकवायला सुरू असलेल्या कवितेतले वाक्य म्हटले.

‘त्या कवितेच्या आईची गांड, तिने स्वर्ग म्हणजे काय विचारले असते तर काय बोललो असतो?’ मी वैतागून म्हणालो.

‘ऐला हो रे, एकीकडे आपल्या मराठीच्या बाई धडा शिकवताना लेखक, कवी कसे अनुभवांतून ते लिहितात हे सांगतात. अन् ही कविता लिहायला कवीला स्वर्ग म्हणजे काय ते अनुभवांतून माहिती असायला हवे होते. मग तो अनुभवल्यानंतर त्याने कविता लिहिली कधी?’

आमची गाडी नंतर उदास झालेल्या गिरीशची समजूत घालण्यात गेली.

‘आयला लव्ह डेलाच लागले सगळ्यांच्या चेहऱ्याचे लवडे’ या पराग मुंबरकरच्या विनोदावर नंतर सगळे भरपूर फुटून हसलो आणि संध्याकाळी तळावपाळीला भेटायचे ठरून घरी परतलो.

घरी गेल्यानंतर लोन्ली प्लानेटवर इयन राईटचा न्यू यॉर्कवरचा एपिसोड सुरू होता. मी तो चारवेळा पाहिला होता. तरी डाऊनटाऊन, हार्लेम, ब्राँक्स, सिटी आयलंडवरून पुन्हा दक्षिणेला ब्रुकलिन ते कोनी आयलंडपर्यंतचा त्याचा मॅपसह चालणारा प्रवास मला पाठ होता. याच एपिसोडमध्ये त्याची न्यू यॉर्कमधील पुणेकरी थाट असलेल्या टॅक्सीवाल्याशी गंमतीशीर हुज्जत चालते. मी हा भाग पाहताना अभिपर्णाचा आणि आयुष्यात केलेल्या पहिल्या-वहिल्या प्रपोजबाबत आलेल्या विचित्र अनुभवाचा विचार करीत राहिलो.

गिटारची प्रॅक्टिस करताना ‘जब कोई बात बिघड जाये’ गाण्यासाठी वहीत लिहिलेल्या जी, बी मायनर, इ मायनर, सी, ए मायनर, डी आणि जी हे बेसिक्स कॉर्ड वाजवताना मला अभिपर्णाची आठवण येत होती. अन् त्याचवेळी असल्या हिंदी गाण्यांतील शब्द कसे खऱ्या आयुष्यात उपयोगाचे नाहीत, याची खात्री पटायला लागली होती.

टीव्हीवरची म्युझिक सर्फिंग करताना ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमाचे शीर्षक गीतासह ट्रेलर सुरू झाले, तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला ‘म्हणजे या नायिकेचे खरे तर काय झाले?’

‘प्यार, कसम, रबने बनाया तुझे मेरे लिये, सजना तेरे बिना, दिल का करार खो गया, ओ बेबी, डोण्ट ब्रेक माय हार्ट’ अशी अनुपयोजित गाणी म्युझिक चॅनलच्या सर्फिंगमध्ये ऐकल्यानंतर आपण अभिपर्णावर प्रेम करतो म्हणजे काय करतो, या प्रश्नाचे उत्तर आणखीच कठीण बनत गेले.

गिटार क्लासवरून आल्यानंतर मी कागदावर ‘प्रेम करतो म्हणजे काय करतो?’ या शीर्षकाने पत्र लिहिण्यास घेतले. पत्र तिला दिले नसते, पण काय करतो, याचा शोध लागणारी सिनेमॅटिक भाषेपेक्षा वेगळी कारणे सापडली तर तिला सांगता आली असती. मला सिनेमॅटिक भाषेपलीकडे काहीच लिहिता आले नाही. मग मी टीडीकेची सिक्स्टी मिनिटची रिकामी कॅसेट घेतली आणि आमच्या डबल कॅसेट प्लेअरमध्ये आवडीची पॉप अल्बम्समधली गाणी त्यात रेकॉर्ड केली.

साईड ए-

तुमसे प्यार : युफोरिया, धूम

डुबा डुबा रेहता हँ आँखो मे तेरी : सिल्क रूट, बुंदे

ओ सनम : लकी अली, सुनो

तेरी यादे आती है : लकी अली, सिफर

तुम हो वही : लकी अली, सिफर

 

साईड बी-

छुई मुईसी तुम लगती हो : मिलिंद इंगळे, ये है प्रेम

तुमही से है : लकी अली, सुनो

मै तुम्हे बस चाहा करू : मिलिंद इंगळे, ये है प्रेम

अंजाने राहों में तू क्या धुंडता फिरे : लकी अली, मेरी जान हिंदोस्तान

मौसम भी यार है : लकी अली, सिफर

 

ही सगळी गाणी १९९६ पासून वेड्यासारखी ऐकली होती. त्यातले एक देशावरचे अन् एक देवावरचे असले, तरी त्यात प्रेम होतेच. ही गाणी एकत्र करून झाल्यानंतर अभिपर्णावर प्रेम करतोय म्हणजे काय, ते मला थोडेसे स्पष्ट व्हायला लागले. ही गाणी गिटारवर अभिपर्णाला ऐकवणे म्हणजे, त्या क्षणी मला अभिपर्णाबद्दल काय वाटते तेही होते. ‘तुमसे प्यार’ मी शेकडोवेळा गिटारवर वाजवून पाहिले होते. अजूनही माझ्या मते हिंदीतले ते पहिले सर्वोत्तम रॉक गाणे आहे. डुबा डुबामधील रेकॉर्डर नावाच्या फार मधूर असलेल्या बासरीचा स्वर मला सर्वात भावायचा. लकी अलीच्या सुनो अल्बमनंतरच्या काळातच कधीतरी मी गिटार शिकायला सुरुवात केली होती. ‘ओ सनम’ या गाण्याचा माझ्या गिटार शिकण्याचा विचार ठाम करण्यात मोठा वाटा होता. पण या गाण्याच्या व्हिडीओत तो वाजवताना दिसतो, ते गिटार नसून ल्यूट नावाचे भलतेच तंतूवाद्य असल्याचे नंतर कधीतरी समजले होते. सुनोतले शीर्षकगीत, ‘तुमही से ही’ किंवा सिफरमधील ‘तुम हो वही’ ही गॅलरीतून दिसणारे चांदणे पाहत ऐकण्याची माझी सर्वात फेवरिट गाणी होती. मिलिंद इंगळेचे ‘छुईमुईसी तुम लगती हो’ गारवामध्ये ‘झाडाखाली बसलेले’म्हणून ऐकताना कसेसेच वाटायचे. ‘ये है प्रेम’ नावाच्या अल्बममधील ‘मै तुम्हे, हा बस तुम्हे चाहा करू’ या अप्रतिम प्रेमगीताने आणि त्यातल्या वाद्यासंगतीने काही दिवस मी भारावून गेलो होतो. दुर्दैव हे की ते गाणे छुईमुईवरच्या प्रकाशझोतात आजही अनेकांना माहिती नाही.

त्या दिवशी संध्याकाळी रितेश, गिरीश, पराग आणि मला तळावपाळीवर बसायला जागाच मिळाली नाही. इतके ते यशस्वी प्रेमी लोकांनी भरलेले होते. गडकरीची बाजू, शिवाजी पुतळ्याची बाजू, सेंटजॉन आणि कोपिनेश्वारजवळचे कठडे प्रेमवेड्यांनी भरून गेले होते. त्यांची भलतीच गाणी रंगात आली होती. मग आमचे आम्हीच व्हॅलेण्टाइन बनून शहर फिरायचे ठरविले. आम्ही कुंजविहारचा वडापाव खाल्ला, मामलेदारची तिखट मिसळ खाल्ली, कुटीर उद्योगमध्ये पियूश प्यायलो आणि गणेश टॉकीजमध्ये कितव्याशा आठवड्यात सुरू असलेला ‘आ अब लौट चले’ नावाचा सिनेमा पाहिला. सिनेमा संपून लाईट सुरू झाली तेव्हा आमच्यातला सगळ्यात स्ट्राँग वाटणारा पराग मुंबरकर त्यातल्या कथेने भारावून रडताना दिसला.

‘भेंचोद, मी पण अमेरिकेत जाणार, तेव्हा या हिरोसारखा वागणार नाय.’ या त्याच्या वाक्यावर आम्ही जोरदार हसलो होेतो.

त्याचे वडील मोठ्या जहाजांवर खलाशाचे काम करीत होते. सहा महिन्यांहून अधिक काळ ते बोट नेईल त्या देशांत आणि उरलेले महिने घरात येत. त्यालाही त्यांच्यासारखे खलाशी व्हायचे होते. गिरीशचे वडील एका कपड्याच्या कारखान्यात होते. त्याला त्यांच्या जागी नोकरी मिळणार होती. रितेशचे वडील तो लहान असतानाच वारले होते. त्याची आई कामाला होती. अन् त्याला हॉटेल मॅनेजमेण्ट करायचे होते.

मला मात्र त्या दिवशीतरी भविष्यात काय करायचे हे सुचत नव्हते. मला गिटार वाजवायची होती, इयन राईटसारखा जगभरातील देशांत प्रवास करायचा होता. अभिपर्णाला ‘प्रेम करतो म्हणजे काय करतो’ हे मला कळाल्यानंतर समजावून सांगायचे होते. घरी पोहोचल्यानंतर मी पीसी लावला नाही. टीव्ही लावला नाही. गॅलरीतून दिसणारे चांदणे किंवा चंद्र यांच्यात अभिपर्णाऐवजी चांदणे आणि चंद्रच दिसत होते. तरीही अभिपर्णावरचे माझे प्रेम कमी होत नव्हते. मी त्या रात्री झोपेपर्यंत वॉकमनवर दुपारी तयार रेकॉर्ड केलेल्या गाण्यांची कॅसेट ऐकत राहिलो.

 

३. आज आपने क्या खोजा आणि प्रेमधाडस आरंभ

अभिपर्णाशी पहिल्या त्रोटक संवादानंतर मला बॉलिवुड सिनेमे तुम्हाला प्रेम व्यक्त करण्याच्या सरधोपट पद्धतीपलीकडे आणि पराग मुंबरकरसारखे भावुक बनविण्यापलीकडे काहीच देऊ शकत नाही, याची खात्री झाली. एमटीव्हीवरची ट्रेलर्स आणि इतर म्युझिक चॅनल्सवर नव्या हिंदी चित्रपटांचे प्रोमोज पाहण्याऐवजी आता मी टीव्हीवर जास्तीत जास्त डिस्कव्हरी चॅनल पाहू लागलो. लोन्ली प्लानेट, ट्रेलब्रेझर्स आणि भटकंतीचे सारे कार्यक्रम, आफ्रिकन सफारी विविध विषयांना वाहिलेल्या डॉक्युमेण्ट्रीज हिंदीमध्ये समजून घेताना गंमत वाटायची आणि आपल्याकडच्या हिट सिनेमांपेक्षा ते जास्त मनोरंजक आणि आकर्षक आहेत याची खात्री व्हायची. ‘आज आपने क्या खोजा’ हे अभिपर्णाच्या आणि माझ्या तिच्यावरच्या प्रेमाच्या बाबतीत पडताळून पाहत होतो.

पहिले धाडस मी तिला कॅसेट देण्यापासून केले.

बसस्टॉपवर ती उभी असतानाच तिच्या समोर भीत भीत मी उभा राहिलो होतो.

‘काय आहे हे?’ अभिपर्णा.

‘ऑडिओ कॅसेट म्हणतात याला’ मी उत्तर दिले.

‘ते माहिती आहे, पण मला कशाला, आणि याचे मी काय करू?’

सतत प्रश्नच विचारण्याची अभिपर्णाची सवय माझ्या लक्षात आली होती. त्यामुळे यावेळी मी तिच्याशी बोलण्याची थोडी तयारी करून गेलो होतो.

‘यात गाणी आहेत. आणि मी प्रेम करतो म्हणजे काय करतो, याचा विचार केल्यानंतर या गाण्यांमधल्या शब्दांप्रमाणे मला वाटते. ती ऐकल्यानंतर तरी मला काय म्हणायचे आहे, ते तुला समजेल’

‘पण मी याचे काय करू?’

‘ही कॅसेट घेऊन ऐक.’ मी तिच्या घरात कोणती म्युझिक सिस्टिम आहे ते विचारणार होतो. पण त्याआधीच तिने तिच्याकडे कॅसेट प्लेअर नसल्याचे सांगितले.

तिच्याकडे कॅसेट प्लेअर नाही, हा माझ्यासाठी चारशे व्होल्टचा झटका होता. म्हणजे तिच्याकडे फोन होता आणि कॅसेट प्लेअर नव्हता हे मान्यच करता येण्यासारखे नव्हते. कदाचित कॅसेट न घेण्यासाठी, मला टाळण्यासाठी किंवा माझी खेचण्यासाठी तिने कॅसॅट प्लेअर नसल्याचे मला सांगितले असावे.

पण बस आल्यानंतर तिनेच माझ्या हातून कॅसेट ओढून घेतली. ‘मैत्रिणीकडून वॉकमन आणावा लागेल.’ सांगत ती बसमध्ये पोहोचली. मी बस नजरेआड होईस्तोवर पाहत राहिलो, त्याची पलीकडे रितेश, गिरीश आणि पराग खिल्ली उडवत होते.

‘काय कॅसेटमध्ये रेकॉर्ड केले का रे, मी तुझ्याशिवाय जगू शकत वगैरे नाही ते?’ परागने विचारले.

‘हॅड, माझ्या आवडीची गाणी आहेत त्यात.’

‘कॅसेट घेतली ना? म्हणजे पटली आता.’

‘अरे पण तिच्याकडे कॅसेट प्लेअरच नाहीए गाणी ऐकायला.’

‘हाहाहा, मग काय कुत्र्याच्या गांडीत घालून ऐकणार ती गाणी?’ पराग मुंबरकरने त्याच्या ठेवणीतली भाषा काढली आणि सगळे हसायला लागले.

‘तुझा वॉकमन पण द्यायचास ना मग. ऐकत गेली असती घरापर्यंत.’ गिरीशने सांगितलेला हा उपाय बेश्ट होता. पण त्याच्यासाठी चोवीस तास जाणार होते. तोवर अभिपर्णा ती कॅसेट कशी ऐकणार हा प्रश्नच होता.

माझ्या डोक्यात वेगळेच घाटायला लागले.

रितेशने तिचा फोन नंबर काढला होता. त्यासोबतचा पत्ता लिहून संध्याकाळी त्याला घरी येण्यास सांगितले. तिच्या घराजवळ जाऊन तिला माझा वॉकमन देण्याची आयडिया मला सुचली होती.

कळव्यातल्या मनीषा नगरमध्ये सायकलने पोहोचायला आणि पत्त्याजवळ जायला आम्हाला फार वेळ लागला नाही. बापट गुरुजींचे घर तिथल्या सगळ्याच लोकांना माहिती असल्यासारखे दिसत होते. प्रत्येकाने अगदी नीट सांगितले. काहींनी आमच्यासोबत येऊन घर दाखविण्याचाही उत्साह दाखविला. अभिपर्णाचे वडील लोकप्रिय शिक्षक असल्याचे आम्हाला तेव्हा कळले.

‘अरे अभिपर्णाच्या वडलांना इथे सगळेच एवढे ओळखतात. मार खाऊन परत जायला लागायला नको. तिला फोन करून लांब बोलव कुठे तरी.’ रितेशने सांगितले.

‘मी अजून मिस्ड कॉलपर्यंतच आलोय. अद्याप फोनवरून बोलणे सुरू झाले नाही.’

‘आम्हाला आणले कशाला मग इकडे राहुल?’

‘वॉकमन कसा देणार आता? घरी जाऊन? आणि सांगणार काय? तुमच्या मुलीला प्रेमाची गाणी ऐकायला वॉकमन घेऊन आलोय?’ या तिघांची माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना एक आणखी प्रश्नार्थक आवाज अभिपर्णाच्या रुपाने माझ्या कानात आला.

‘ए राहुल, इथे काय करतो?’ आम्ही चर्चा करीत होतो, त्याच इमारतीजवळ तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून मला आवाज आला. अभिपर्णा कुठे राहते हे आता लक्षात आले. तिच्यासोबत बहुदा बापट गुरूजी होते. अन् त्यांना पाहून दोनच मिनिटांमध्ये गिरीश, पराग आणि रितेश सायकलसह बाजूच्या गल्लीत गायब झाले होते.

‘आलो होतो तिकडे मित्राकडे.’ मी बोलून गेलो.

‘ये वर ये, बाबा माझ्या वर्गात आहे हा.’ तिने नुसते बोलावलेले नाही, तर वडिलांना माझ्याविषयी सांगितलेलेही थेट खालपर्यंत ऐकू आले.

मी आजूबाजूला मित्रांचा शोध घेतला. सायकल जवळच लावली आणि हॅण्डलला अडकविलेल्या पिशवीसह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दाखल झालो. सोबत कुणीच नसल्याने माझ्या छातीची धडधड तिला प्रपोज करण्यावेळी होती त्याहून वाढली.

तिच्या घरात शिरताच मला एका वेगळ्याच जगात गेल्याची जाणीव झाली. तिच्या घराच्या हॉलमध्ये जुन्या जमान्यातला छोटा ब्लॅक-अ‍ॅण्ड व्हाईट टीव्ही होता. त्याच्या बाजूला टेलिफोन होता. चारही भिंतींना मोठमोठे फोटो होते. पुस्तकांच्या भल्या मोठ्या चळती होत्या. काचेच्या कपाटात, कपाटावर सगळीकडे पुस्तकेच पुस्तके होती. मी कधीच ऐकले-वाचले नाही, अशा नावांच्या लेखकांचे जाडजूड ग्रंथ होते. विवेक, धर्मभास्कर आणि एकता साप्ताहिक-मासिकांच्या अंकांचे गठ्ठे होते. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा रथावर संवाद सुरू असल्याचे चित्र, अन् त्यापुढे ‘यदा यदा ही धर्मस्य…’ लिहिलेल्या ओळी. एका बाजूला भारतमातेची भलीमोठी तसबीर, दुसऱ्या बाजूला एका म्हाताऱ्या दाढीवाल्या अन् त्याच्याबाजूला एका उभ्या टोपी आणि मिशीवाल्या सद्गृहस्थाची तसबीर. माझ्या कच्च्या इतिहासाला शिव्या देत मी या दोन्ही नेते किंवा महापुरूषांची नावे आठवण्याचा प्रयत्न करीत होतो. पण मला त्यांची नावेच कळेनात. भिंतीच्या एका कोपऱ्यात ‘गर्व से कहो हम हिंदू है’ घोषणेसह बाळासाहेब ठाकरे यांचा भगव्या रंगाचा छोटासा स्टिकर. त्याच्या बाजूला आणखी एक तसबीर. ज्यात अभिपर्णाचे वडील पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी या पोशाखात त्यांच्यासारख्याच पोशाखातील अनेकांना शिकवत असताना दिसत होते. पाण्याचा तांब्या घेऊन अभिपर्णा बाहेरच्या खोलीत आली आणि गॅलरीतून आत येऊन बापट गुरुजींनी माझा ताबाच घेतला.

गोरे आणि पानेरी गोटीसारखे हिरवे डोळे असलेल्या बापट गुरूजींनी माझ्यापुढे नाकातून येणाऱ्या खणखणीत आवाजासह अभिपर्णाहून अधिक प्रश्नांची माळच लावून दिली.

‘काय नाव आणि आडनाव?’

‘राहुुल राणे.’

‘मराठा? कुठे राहता? चरईजवळची धोबीआळी?’

‘कुणाला भेटायला आलात इथे? कोण मित्र राहतो? नाव काय त्याचे?’

‘काय वाचता? शाखेत गेलात का कधी? तुमच्याजवळ चरईतच आहे.’

मला ते आमच्या जवळ असलेल्या शिवसेनेच्या शाखेबद्दल विचारतायत का असे वाटले. आमच्या घरानजीकच आनंद दिघे या लोकप्रिय नेत्याचे कार्यालय होते. उत्साहातच मी सांगायला लागलो.

‘हो, शाखेत जातो ना. क्रिकेटचे बॅट आणि स्टम्प देतात तिथे मोफत. ते घेण्यासाठी जातो कधीतरी क्रिकेट टीमबरोबर.’ यावर अभिपर्णा जोरजोरात किंकाळीयुक्त हसायला लागली आणि बापट गुरूजींसह माझा चेहरा कसनुसा झाला. बापट गुरूजींना मला आणि माझ्या शाखविषयीच्या एकूण अज्ञानाबद्दल जाणून माझ्याविषयी आश्चर्य वाटले असावे.

‘बाबा, याला संघ माहिती नाही. संघविचारांचा आणि एकूणच विचार या गोष्टीचा याच्याशी संबंध नाही. उगाच पिळू नको बिचाऱ्याला, तुझा कार्यकर्ता होणार नाही तो.’

ती तिच्या बाबांना अरे-तुरे करते, याचा मला शोध लागला. तिच्या बोलण्यातील आत्मविश्वासातून घरात तिचेच राज्य चालत असल्यासारखे वाटले.  

तिची आई माझ्यासाठी थालिपीठ आणि चहा घेऊन आली.

‘सगळ्यांना सगळेच माहिती असायचीही काही गरज नाही.’ तिच्या आईचा आवाज अगदी तिच्यासारखाच धारदार होता. अभिपर्णाहून सुंदर असे त्यांचे गरूडासारखे नाक होते. अभिपर्णा प्रचंड सुंदर का आहे, हे तिच्या निर्मात्यांना एकत्र पाहिल्यावर मला लक्षात आले. तिची प्रश्न विचारण्याची सवय वडिलांच्या स्वभावातून उतरली असणार. कारण तिच्या आईने मला एकही प्रश्न विचारला नाही. वडिलांनी मात्र गावापासून आमच्या विभागातल्या नगरसेवकापर्यंत साऱ्याची चौकशी आवर्जून केली.

थालिपीठ आणि चहा संपेस्तोवर मला बापट गुरूजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे विचार, हेडगेवार, गोळवलकर गुरूजी यांचे कार्य यांच्याविषयी संक्षेपात पण उत्तम माहिती दिली. त्यानंतर माझे छंद, फावल्या वेळात करतो काय, याची सारी विचारणा केली. मी त्यांना गिटार कशी वाजवतो याची अभिमानाने माहिती दिली. त्यावर ‘तबला किंवा सनई, बासरी या देशी वाद्यांना वाजवावेसे वाटत नाही का?’ असा प्रश्न त्यांनी मला केला.

माझ्याकडे त्याबाबत कोणतेही उत्तर नाही, हे पाहिल्यावर त्यांनी विषय आणि प्रश्न बदलले.   

मी वॉकमन तेथे मुद्दामहून विसरलो. निघताना बापट गुरूजींनी मला ‘डॉ. के. बी. हेडगेवार : जीवन दर्शन’ हे पुस्तक, संघविचार नावाची एक पुस्तिका आणि ‘पुढे व्हा’ हे यदुनाथ थत्ते यांचे पुस्तक (‘हे संघ विचाराचं नसलं तरी तुझ्यासारख्या तरुणांसाठी उपयुक्त आहे’, असं सांगत) वाचायला दिले. ‘तुमची वाचून झाली की घेऊन या परत. मग बोलूत.’ असे म्हटले. मी धन्यवादऐवजी थँक्स म्हटले आणि माझ्या विचित्र अवस्थेला हसत एन्जॉय करणाऱ्या अभिपर्णाला निघत असल्याचे सांगितले.

जिन्यात असतानाचा माझ्या नावाने अभिपर्णाने किंचाळीच फोडली. धावत येऊन मला माझी राहिलेली पिशवी आणून दिली.

‘मुद्दाम ठेवली होती पिशवी. वॉकमन आहे त्यात.’ मी पहिल्या मजल्याच्या पायऱ्यांवरून तिला सांगत होतो.

‘आणणार होते वॉकमन मैत्रिणीचा हे सांगितले होते ना? फक्त यासाठी इथे आला होतास?’

‘हो. उद्या दिला असता वॉकमन, तर गाणी ऐकण्यास चोवीस तास लेट झाला असता ना?’

‘छान, निघा आता. उद्या कॉलेजमध्ये बोलू.’ जरबयुक्त वाक्य ‘कॉलेजमध्ये बोलू’ सांगताना हसून निघाले होते.

एका मोठ्या गुहेतून सहीसलामत बाहेर पडल्यासारखे मला वाटले. आपण कुठल्याही गोष्टीची नाहक भीती बाळगतो, याची जाणीव मला त्या इमारतीतून बाहेर पडताना झाली. मी सायकलच्या हॅण्डलला पिशवी लावली, त्यात हेडगेवार आणि संघविचाराची पुस्तके भरली आणि तिसऱ्या माळ्यावर गॅलरीत उभे असलेल्या बापट गुरूजींना हात केला. त्यांनीही हात हलवला.

सायकल सुरू केली तेव्हा वॉकमन न लावताही माझ्या कानात ‘क्या मौसम है’ हे लकी अलीच्या सुनोतले गाणे सुरू झाले. कळव्याच्या जुन्या पुलावर माझी वाट पाहत थांबलेले रितेश, गिरीश आणि पराग यांनी मला हाक मारली नसती, तर त्या गाण्याच्या नादात मी थेट घरीच पोहोचलो असतो.

‘अरे तुम्ही पळालात का पण?’

‘तिचा बाप मोठा पॉलिटिशन आहे. माझा एक जिममधला मित्र भेटला. त्याला विचारले. खूप डेंजर आहेत ते म्हणे.’ पराग मुंबरकरने मला माहिती दिली.

‘अरे पॉलिटिशन नाही. संघाचे शाखाप्रमुख आहेत. खूप चांगले आणि अभ्यासू आहेत ते.’ मी

‘काय झाले रे राहुल तिथे?’

‘थालिपीठ खाल्ले, चहा प्यायलो. त्यांच्याशी खूप बोललो.’ मी छाती आणि घडलेल्या घटना त्यांना फुगवून सांगू लागलो.

‘मग तिच्या वडिलांना सांगितले का? तुमच्या मुलीचा हात मागायला आलोय मी असे?’ रितेशने विचारले.

‘आयला रितेश अजून तू मराठी फिल्म पाहतो का? मुलीचा हात कशाला, आख्खी मुलगीच द्या, असे म्हणेल ना तो,’ परागची विनोदपट्टी सुरू झाली.

पुढला काही काळ त्या पुलाच्या एका कोपऱ्यात बसून आम्ही तोपर्यंत पाहिलेल्या मराठी सिनेमांतल्या डायलॉग्ज, गाणी, हाणामारी आणि बलात्काराच्या विनोदी वाटणाऱ्या दृश्यांची चर्चा करत राहिलो. संध्याकाळ झाली तेव्हा खाडी परिसराचे दृश्य संधीप्रकाशात फारच सुंदर दिसू लागले. पुलाच्या या भागातून शहराचा लांबलचक व्ह्यू स्पष्ट होत होता. शहराच्या या भागातून सूर्यास्त सर्वोत्तम दिसत असल्याचा शोध आम्हाला त्या दिवशी लागला. अभिपर्णाच्या घरातून बाहेर पडल्यामुळे मला सगळे जग सुंदर दिसत होते, की खरोखरीच येथून सारे छान दिसत होते, हे इतरांसोबत पडताळून पाहिले, तेव्हा दररोज संध्याकाळी तळावपाळीऐवजी येथेच येण्याचे आमचे ठरले.

‘हो इथेच येऊ आता. राहुलच्या हातात गिटार आणि तुमच्या हातात कटोरा ठेवतो. तो भरला की कलेक्शन करायला मी येतो.’ परागने पुन्हा विनोद करण्याची संधी सोडली नाही. नंतरचे अनेक दिवस आम्ही तिथे येत राहिलो. पाणकोंबड्या, बगळे, पोपट, फ्लेमिंगोज आणि कितीतरी प्रकारच्या पक्ष्यांचे थवेच्या थवे जवळून जाताना पाहायला मिळायचे आणि त्या भागातून सूर्यास्त सर्वाधिक आकर्षक वाटायचा.

‘आज आपने क्या खोजा’ हे स्वत:ला विचारत मी घरी पोहोचलो. कुणा परिचित नातेवाईकांकडेही न जाणारा मी थेट वर्गातल्या मुलीच्या घरी जाऊन तिच्या नातेवाईकांशी त्यांच्याशी बोललो होतो. तिच्या घरामध्ये असलेल्या ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट टीव्हीचे आणि त्यावर सुरू असलेल्या दूरदर्शनच्या पहिल्या वाहिनीचे मला कुतूहल वाटले होते. ‘जस्ट मुहोब्बत’ किंवा ‘रिश्ते’ नावाची टीव्ही मालिका, एमटीव्ही या गेल्या काही वर्षांत घराघरात लागणाऱ्या वाहिन्यांच्या जगाशी अभिपर्णा अनभिज्ञ होती. अन् तरीही संघविचारांच्या शिस्तखोर घरात ‘तथाकथित परफेक्शनिस्ट’ या अभिनेत्याची हार्डकोर फॅन होती, हे मला गंमतीशीर वाटत होते.

सर्वात पहिले संघविचाराचे पुस्तक संपविले. मग डॉ. हेडगेवार समग्र जीवन दर्शन चाळले. त्यानंतर ‘पुढे व्हा’मधले रंजक उतारे वाचले. ‘इमर्सन’ने आयुष्याविषयी काय म्हटले आणि ‘हेगेलचे जीवनाविषयीचे सार’ उत्तम उदाहरणांसह वाचून स्फूरणच चढले माझ्या मनात. अभिपर्णाच्या घरी पुन्हा जाण्याचे निमित्त मिळाल्याने ती पुस्तके रात्रीत वाचून उद्या सकाळीच त्यावर बापट गुरूजींशी बोलायची माझी तयारी होती. पण ‘पुढे व्हा’ अर्ध्यात वाचतानाच मला झोप लागली.

दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या मधल्या सुट्टीत मी ‘पुढे व्हा’तल्या तत्त्वज्ञानाचा वापर करून तिच्याशी बोलायला गेलो. ‘उद्या बोलू.’ हे तिने सांगितले होते, याची मी तिला आठवण करून दिली.

‘गाणी ऐकलीत मी. छानच आहेत सगळी. पण ते दुसऱ्यांचे शब्द आणि दुसऱ्यांच्या भावना आहेत. त्या अशा आयत्या घ्यायच्या नसतात. तुझे स्वत:चे काय आहे त्यात?’ अभिपर्णाचा हा नवा प्रश्न मला अपेक्षितच होता.

‘माझे स्वत:चे काहीच नाही त्यात. कॅसेटपण पॉकिटमनीतून विकत घेतलेली आहे. पण मला अशाच प्रकारचे सांगायचे होते.’ मी तिला म्हणालो.

‘मग सांग ना. त्यासाठी दुसऱ्यांची गाणी कशाला?. स्वत:ची कर त्यापेक्षा.’ तिने जरबेच्या स्वरात सांगितले.

‘हो आता तेच करेन.’ मी

‘काय?’

‘गाणी स्वत:च स्वत:ची करेन.’ या वाक्यावर पुन्हा जोरजोरात हसत ती निघून जात होती.

‘माझ्या एकदम पहिल्यावाल्या प्रश्नाचे उत्तर काय पण?’ मी तिला मोठ्या आवाजात विचारले.

‘सगळी गाणी पुन्हा एकदा नीट ऐकून सांगावे लागेल.’ तिने उत्तर दिले.

ती नाहीपण सांगत नव्हती आणि तिच्या एकूण आविर्भावातून पूर्णपणे होकार असल्याचेही कळत नव्हते. वर्गात मी तिच्याकडे एकटक पाहतोय, हे लक्षात आल्यावर डोळे वटारून तिने तीनदा मला शिक्षक काय बोलतायत याकडे लक्ष द्यायला सांगितले होते. सोशल सायन्समधील ऑगस्त कॉम्तचे विचार, फिझिकल जॉग्रफीमधे देशातील रिव्हर फॅक्टर्स, इकॉनॉमिक्समधील मायक्रो अ‍ॅण्ड मॅक्रो संकल्पना, मराठीतले ललितबंध आणि इंग्लिशमधील रॅपिड लेसन असा सगळा भाग तुलनेने सोपा होता. आदल्या दिवशी अभ्यास करूनही चांगले मार्क मिळवता यायचे. त्यामुळे मी अभ्यासाबाबत निश्चिंत होतो. पण तिच्याकडून प्रेमाला काय प्रतिसाद आहे, हे कळत नव्हते.

‘ती मेष राशीची आणि तू कन्या राशीचा असणार, त्यामुळे हे असे सगळे होतेय.’ नुकतेच राशीचक्र पाहून आलेल्या रितेशने मला ही माहिती दिली. त्या कार्यक्रमाचा त्याच्यावर एकूणच इतका प्रभाव पडला होता, की प्रत्येकाला तो त्याची राशी विचारत बसला होता. त्याने प्रपोज केलेल्या रुपालीने अजून त्याला ताटकळत ठेवले होते. पण ती त्याच्यायोग्य राशीची नसल्यामुळे त्याला आता तिच्यात स्वारस्य राहिलेले नव्हते. तिने नाही बोलल्यानंतरच आता त्याला आनंद होणार होता. त्याच्याजवळ राशीचे महत्त्व टीव्हीवर सांगणाऱ्या त्या सुप्रसिद्ध व्यक्तीचे पुस्तकही होते आणि तो त्यातलीच माहिती मला सांगत होता.

‘बघ, मेष राशीच्या मुलीला रोमॅण्टिक होता येत नाही असे लिहिले आहे. तिचे कन्या राशीच्या मुलाशी लग्न झाले तर ती त्याला फरफटत नेते असे म्हटले आहे.’ रितेश तावातावाने बोलायला लागला.

‘मग तर यात लिहिलेले सगळे खोटेच आहे मानावे लागेल. ’ पराग मुंबरकरला यातही रितेशची खिल्ली उडवण्याचे सुचले. आधी तो शांतपणे ऐकत होता.

‘कसे काय?’

‘लग्नानंतर फरफटत नेते असे म्हटले आहे. राहुलला ती लग्नाआधीच फरफटत नेते आहे त्याचे काय?’ यावर परागने माझी टाळी घेतली आणि सगळे रितेशच्या मूर्ख राशी-भविष्य ज्ञानावर घसरलो.

अभिपर्णासोबत लग्नाच्या विचाराने माझी अवस्था बराच वेळ विचित्रच झाली. माझी रास कन्या होती म्हणून काय झाले? तिची रास मेष असली काय किंवा कोणती असली काय, मला त्यात काही स्वारस्य नव्हते. ती मेष असली तर तिच्यासोबत लग्न करून फरफटत जायची माझी तयारी होती. पण ते होण्यासाठी आधी काही गोष्टी सकारात्मक व्हायला हव्या होत्या की नको?

तिसऱ्या दिवशी पुन्हा मी अभिपर्णाच्या समोर बोलायला गेलो. यावेळी

‘आज काय नवे? अजून गाणी नीट ऐकलेली नाहीत.’

‘नाही, त्याबाबत नाही. पुस्तके वाचून झालीत सगळी. घरी येऊन देऊ?’

‘काही एक गरज नाही. माझ्याकडे दिलीस तरी चालतील. मी पोहोचवते.’

‘नाही, त्यांच्याशी बोलायचे होते त्यावर.’

‘हो? संघविचारांवर? मिस्ड कॉल करतोस ना, तेव्हा आता बाबाकडेच देते तुझा फोन आलाय म्हणून. कर चर्चा मग हवी तेवढी. खूप कॉइन्स लागतील हो पण त्यासाठी. तेवढी तयारी ठेव’

‘कॉलर आयडी नसून तुला कसे माहिती मी मीच कॉल करतो ते?’ शॉक बसल्यासारखा मी तिच्याकडे पाहत राहिलो.

‘आत्ताच कबूल झालास की नाही.’ सांगत ती चटकन निघून गेली.

मधले चार दिवस शांततेत गेले. या दरम्यान मी तिला एकही मिस्ड कॉल दिला नाही. पीसीही उघडला नाही की लोन्ली प्लानेटचे एपिसोड्सही पाहिले नाहीत. गिटारवर पूर्णपणे बिझी राहिलो. स्वत: तयार केलेले माझे पहिले गाणे घरातल्या रेकॉर्ड प्लेअरवर शेकडोवेळा टेप करून तिच्यासाठी बेस्ट व्हर्जन काढून ठेवले. गिटारच्या सी आणि एफ या बिगनर्सनाही जमणाऱ्या कॉर्ड्सवरचे ते गाणे पूर्णपणे सरधोपट शब्दांचे होते. पण चाल मलातरी माझ्यापुरती बरी वाटली होती. ते शब्द तसे आले त्याला मी जबाबदार नव्हतो. लहानपणापासूनच रेडियोवर, टीव्हीवर आजूबाजूच्या घरांत वाजल्या जाणाऱ्या बॉलिवुड गाण्यांतून त्याच त्या शब्दांवर मजरूह सुल्तानपुरी, हसरत जयपुरी, शैलैंद्र, साहीर लुधीयानवी, जावेद अख्तर, समीर यांनी गीत डोलारा उभा केला होता. त्यातून ख्बाब, प्यार, इश्क, सपने, तेरे बिन, खोया, धुंडू या शब्दांना वगळले असते, तर गाणीच तयार झाली नसती. ती गाणीच तयार झाली नसती, तर पोरांनी प्रेमच केले नसते आणि अशाप्रकारचे गाणेही माझ्याकडून लिहीले गेले नसते. माझ्या खोलीची, गॅलरीच्या खिडक्या आणि पंखा बंद करूनही माझ्या कॅसेट प्लेअरवर रेकॉर्ड झालेल्या माझ्या गाण्यात गिटारचाच जास्त आवाज होता. तरी ते माझे पहिले स्वत:चे गाणे असल्याने मी त्यावर खूष होतो.

 

‘मेरे ख्वाबोमें आके

मेरे सपने सजाके

तू छुपी हैं कहाँ

धुंडू मै यहाँ

 

मेरी दुनियाँमे आके

मुझे राह दिखाके

तू छुपी हैं कहाँ

धुंडू मै यहाँँ

 

के तेरे बिन रहा न जाये

एकपल भी सहा न जाये

मै क्या करू’ 

गाणं मेरे ख्वाबोमें आके

गाणे ऐकल्यानंतर अभिपर्णा हरखून जाईल आणि मला शाबासकीच देईल, अशी माझी जी काही फिल्माठ विचारसरणी होती, तिला तिने एका क्षणात आकाशातून जमीनीवर आणले.

‘हे तू लिहिलेय?’ पुन्हा प्रश्न. 

‘मीच गायलेय आणि वाजवले देखील. घरातल्या टेपरेकॉर्डरवरचे रेकॉर्डिंग आहे. शब्द इथून तिथून जोडलेले वाटतील, पण हे माझे तुझ्यावर लिहिलेले पहिले गाणे आहे. तूच म्हणाली होतीस ना स्वत:चे गाणे कर म्हणून.’

‘हो, पण इतक्या लवकर कर, असे कुठे म्हटले होते? परीक्षा कधी आहे माहिती ना?’

‘पंधरा दिवसांनी.’

‘फर्स्ट क्लास नाही ना आला, तर समोर उभेही नाही राहायचे माझ्या. आत्ता गाणी-बिणी बंद करा, त्या कळवा खाडीवरच्या पुलावरच कायम बसावे लागेल नाहीतर. सगळे आयुष्यच तुला फिल्मी वाटते का रे?’

‘फिल्म तीन तासांत संपते. खोटे असते ते सगळे. तेवढ्यापुरते एन्जॉय करायचे आणि सोडून द्यायचे. फार नाही डोक्यात ठेवायचे.’

‘या सगळ्यात जो वेळ घालवतोयस ना, तो अभ्यासात घालवलास तर भले होईल तुझे आणि तुझ्या मित्रांचेही. फर्स्ट क्लास आला तरच माझ्या समोर उभे राहायचे, तुझ्या पहिल्यावाल्या प्रश्नाचे उत्तर तेव्हाच मिळेल आता. आणि नाही ना मिळाला फर्स्ट क्लास, तर उत्तर विचारायचीही तसदी घेऊ नकोस.’

माझ्या घरच्यांनीही माझ्याशी इतक्या अ‍ॅटिट्यूडने भाषा केली नसेल. एवढे गाणे केल्यानंतरही तिने फर्स्ट क्लास आणायचे नवे चॅलेंज माझ्यासमोर उभे केले.

त्या दिवशी मी गिटारच्या क्लासवरून आल्याआल्या अभ्यासाला बसलो. वर्षभराचा अभ्यास मला एकाच दिवसात करायचा होता. रितेश, गिरीश आणि पराग यांना आता काही दिवस संध्याकाळी खाडी पूल किंवा कुठेच नको जायला, अभ्यास करूयात सिरीयसली असा सल्ला दिला.

‘राहुल, अकरावीच्या मेरिटमध्ये येणार का काय रे तू? कॉलेज सगळ्यांनाच पास करते. पुढच्या वर्षी अभ्यास करू. आत्ता कशाला?’ परागने विचारले.

‘तुम्ही जा, मी नाही येणार आजपासून. फर्स्ट क्लास काढण्याचे चॅलेंज घेतले आहे.’

वॉकमन, टीव्ही बंद केल्यानंतर दहा दिवसांच्या रट्ट्यातच माझ्या अभ्यासात राहिलेल्या कित्येक संकल्पना पक्क्या झाल्या.

सोशल सायन्स, इकॉनॉमिक्सच्या थेअरिज पडताळून पाहताना, जॉग्रफीमधील कॉन्सेप्ट्स समजून घेताना डिस्कव्हरीच्या ‘आज आपने क्या खोजा’ची आठवण येत होती. दर दिवस नवे काहीतरी समजत होते आणि माझ्या फुटकळ ज्ञानात वाढ होत होती.

हिंदी चित्रपटांमध्ये हिरोची चॅलेंज, त्याच्यात आमूलाग्र बदल किंवा वीसएक वर्षांचा कालावधी जसा चार पाच मिनिटांच्या गाण्यामध्ये सरकतो, तसे माझे अभ्यासाचे दिवस वेगात सरकले नाहीत. पण अभिपर्णाकडून उत्तर मिळेल या एकट्या गोष्टीसाठी मी ते सहन केले. नव्या हिंदी-इंग्रजी पॉप गाण्यांचे व्हिडीओ येत होते. सिनेमांचे आकर्षक प्रोमोज लागत होते. टीव्ही सिरीयल्समध्ये कुतूहलाच्या गोष्टी घडत होत्या. पण हे सगळे माझ्यासाठी नव्हतेच. ज्यांना फर्स्ट क्लास आणायचा नाही ते आणि इतर जगासाठी हे सारे होते. माझे तेव्हा तीन-चार डझन फुलस्केप पेपर्स आणून त्यावर पाठ केलेल्या उत्तरांना लिहिण्याचे काम उत्साहात सुरू होते. यदुनाथ थत्ते यांच्या जीर्ण झालेल्या ‘पुढे व्हा’ या पुस्तकातले उतारे अधून-मधून वाचले की माझा अभ्यास आणखी जोरात वाढत होता.

या कालावधीत मी एकदाही अभिपर्णाला मिस्ड कॉल दिला नाही किंवा वर्गात, बसस्टॉपवर फार काळ तिला पाहत थांबलो नाही. पंधरा दिवसांनी परीक्षा सुरू झाल्या. त्या प्रत्येक पेपराला मी आत्मविश्वाासाने सामोरा गेलो. फर्स्टक्लासच नाही, तर त्याहून पाच दहा टक्के जास्तच मार्क मिळण्याची शक्यता निर्माण झाली. ३० एप्रिलला निकालाच्या दिवशी तब्बल ७३ टक्के असलेली मार्कशीट घेऊन आता मी एखाद्या हिंदी सिनेमातल्या नायकासारखाच तिच्यासमोर उभा राहिलो.

माझ्या पहिल्यावाल्या प्रश्नाचे उत्तर आजतरी मला मिळेल याची मला खात्री होती.

 

४. पुन्हा तथाकथित परफेक्शनिस्ट आणि लव्हस्टोरीचा एंड…

त्या दिवशी मला जग जिंकल्यासारखे वाटायला लागले. माझ्यासमोरचे जगच अत्यंत त्रोटक होते. खरे तर तेव्हा त्याचा आकार आता कुठे विस्तारू लागला होता. तो ३० एप्रिल १९९९ चा दिवस होता. कोवळ्या उन्हातून तळावपाळीजवळ अभिपर्णा शेजारून चालताना तळे आणखी सुंदर दिसत होते. तेथे बोटिंग सुरू होती आणि रोहित पक्ष्यांचे थवे भीरभीरत होते. आमच्यात बोलण्यासाठी विषय कोणता सुरू करावा, हे दोघांना कळाले नाही. मग आम्ही एकमेकांच्या मार्कशीट्स पाहून त्यावर चर्चा केली. वर्गातल्या इतर मुलांना किती टक्के मिळाले, त्याच्याबद्दल बोललो. रितेश, पराग, गिरीश यांच्यापैकी कुणीही चाळीस टक्क्यांच्या वर गेले नव्हते. पण हे महत्त्वाचे वर्ष नसून, या टक्क्यांना अर्थ नाहीत म्हणत त्यांचा बोट चालवत तळ्यात आनंद व्यक्त होत होता.

आम्ही दोघे चालत राम मारुती रोड परिसर फिरलो. त्यानंतर गावदेवी मैदानाजवळच्या असलेल्या एका छोट्या बागेत बसलो.

थोड्याच वेळात तिने तिच्या पर्समधून एक आश्चर्य बाहेर काढले.

तथाकथित परफेक्शनिस्टचा ‘सरफरोश’ नामक सिनेमा त्याच दिवशी लागणार होता. त्याच्या आनंद थिएटरच्या फर्स्ट डे फर्स्ट शोची तिकीटे घेऊन अभिपर्णाच माझ्यासमोर दाखल झाली होती.

‘पिक्चरला येणार का?’ ए क्या बोलती तू या गाण्याच्या थाटात तथाकथित परफेक्शनिस्टसारखा डायलॉग तिने मारून पाहिला.

‘हे मी विचारायला हवे होते ना?’ माझ्या या वाक्यावर ती हसली आणि माझ्या पहिल्या वहिल्या प्रश्नाचे उत्तर काय असेल, हे विचारायची मला गरज उरली नाही.

नावडत्या हिरोचा पिक्चर मला थोडीच बघायचा होता? मी तर सारा वेळ अभिपर्णाकडे पाहणार होतो.

पिक्चर सुरू झाला आणि तथाकथित परफेक्शनिस्टने साकारलेल्या एसीपी राठोडच्या एकावर एक कामगिऱ्या सुरू असताना तीनवेळा अभिपर्णाने टपोरी मुलांसारख्या शिट्या वाजविल्या. तथाकथित परफेक्शनिस्ट तिच्या दृष्टीने परिपूर्ण हिरो होता आणि लहान मुलाच्या आनंदाने ती तो पिक्चर एन्जॉय करीत होती. मध्यंतरात पॉपकॉर्नसोबत समोसा खाताना मी तिला माझे निरीक्षण सांगितले की हिरोईनीला सारखे वाकून चालावे लागत आहे कारण हा हिरो तिच्याहून बुटका आहे. त्यावर तिचे म्हणणे होते की नाही, हिरोच उंच टाचांचे बूट घालून सोबत टाचा वर करून चालत आहे, त्यामुळे तिच्यापेक्षा उंच दिसतोय.

मध्यंतरापर्यंत अरनॉल्ड श्वाात्झनेगर, शंभर मिथुन चक्रवर्ती आणि दोनशे धर्मेंद्र पडद्यावर एकत्र येऊन करू शकत नाहीत, तेवढ्या कामगिऱ्या आणि भारतीय माणसांच्या सदाबहार देशप्रेमाच्या डायलॉग्जची आतिषबाजी करीत चित्रपट सुरू असतानाच अभिपर्णाने माझा हात घट्ट पकडला.

माझ्या कानाजवळ येऊन ती म्हणाली.

‘हे तू आधीच करायला हवे होतेस ना?’ असे विचारले.

त्यानंतर चित्रपट संपेपर्यंत तिला या प्रकारचे कुठलेही प्रश्न विचारू द्यायची संधीच मी दिली नाही.

सिनेमा संपल्यानंतर आम्ही पुष्पक हॉटेलमध्ये गेलो. तेथे पावभाजी खाल्ल्यावर तळावपाळीवर बोटिंग केली. तिच्या घरात कॅसेट प्लेअर, रंगीत टीव्ही आणि केबल नसल्यामुळे मला तिच्याशी बोलायला विषय कमी आहेत की काय असे वाटत होते. पण तिच्याजवळ गप्पांसाठी शेकडो विषयांचा साठा होता. रत्नागिरी, त्यानंतर पुण्यातले बालपण, ठाण्यातले घर, बापट गुरूजींचे संघप्रेम यांमधून तिची तिरकस विनोदी बडबड सुरूच राहिली. तिच्या मैत्रिणी, नातेवाईक, तथाकथित परफेक्शनिस्टचा सर्वात आवडता ‘जो जिता वोही सिकंदर’ हा चित्रपट यावर ती भरभरून बोलली. माझ्याविषयी, माझ्या नातेवाईकांविषयी, गावाविषयी, आवडीच्या पदार्थांविषयी, गाण्यांविषयी आणि फिल्म्सविषयीही तिने काढून घेतले. एका दिवसात आयुष्यातील सगळ्या घडामोडी सांगता येणार नसल्याची जाणीव झाल्याने आम्ही उरलेल्या गोष्टी पुढल्या दिवसांच्या भेटीत बोलायचे ठरविले.

तिला सायकलवरूनच मी कळवा पुलाजवळ नेले. शहरातून दिसणारा सर्वाेत्कृष्ट सनसेट तिला दाखविला.

घरी परतल्यावर कॉलेजला दीड महिन्यांची सुट्टी सुरू होणार असल्याची चिंता मला राहिली नाही. लकी अलीच्या, युफोरियाच्या सगळ्याच बॅण्डच्या गाण्यांचा अर्थ मला नव्याने लागायला लागला. रात्री पराग, रितेश, गिरीश यांना फोन करून दिवसभरात घडलेल्या साऱ्या गोष्टी सांगितल्या. सुट्टीत अभिपर्णाच्या होकाराची त्यांना माझ्या घरीच पार्टी दिली. घरी पावभाजी करायला सांगून. तेव्हा केकेचा ‘पल’ हा पहिला पॉप अल्बम आला होता आणि मी ‘यारों दोस्ती, बडी ही हसीन है’ हे त्यातले गाणे सगळ्यांनी माझ्या गिटार कॉर्ड्सवर गायले होते. अभिपर्णाने मला दिलेल्या होकाराचा त्यांना माझ्याइतकाच आनंद झाला होता, पण आमचे एकत्रितरीत्या सायकलवरून शहर उंडारणे आता कमी होणार, हेही त्यांना कळून चुकले होते.

मी त्या काळात अभिपर्णावर दोन डझन तरी गाणी लिहिली.  

संघावरची कित्येक पुस्तके त्या सुट्टीत आणि त्यानंतरच्या काळातही वाचून काढली. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’मधल्या शाहरूख खान-अमरीश पुरीच्या प्रसिद्ध कबुतरखाद्य दृश्यासारखा प्रकार करण्याचे मी अनेक प्रयत्न केले. पण बापट गुरूजींनी मला आदर्श शिष्य असल्यासारखा संघविचार समजावून सांगितला. गरुडी नाकाच्या अभिपर्णाच्या आईच्या हातचे पराठे, आळुवड्या, बटाटवडे, कांदेपोहे आणि पावभाजी अशा कितीतरी डिश मी चापल्या. त्यांच्या घरी गिटारवर ब्रायन अ‍ॅडम्सचे ‘ऑन ए डे लाईक टुडे’, ‘समर ऑफ सिक्स्टी नाईन’ वाजवून दाखविले.

तथाकथित परफेक्शनिस्टचा सरफरोश सुपरहिट होणार हे अभिपर्णाने केलेले भाष्य जसे खरे ठरले, तसेच आमच्या प्रेमाचे रुपांतर लग्नात न होण्याचेही तिचे भाकितही चुकले नाही. आमच्या प्रेमात कोणत्याही अडचणी आल्या नाहीत किंवा घरातून फिल्मीस्टाईल जातीय संघर्षही झाला नाही. उलट अडचणी आल्या असत्या तर आम्ही त्यावर मात केली असती. पण ते व्हायचे नव्हते. मी जितक्या मोकळेपणाने तिच्या घरी जायचो, त्याहून अधिक मोकळी ती माझ्या घरी येत असे.

त्या वर्षभरात आम्ही तथाकथित परफेक्शनिस्टचा ‘मन’ फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलाच पण त्यासोबत ‘प्यार कोई खेल नही’, ‘प्यार में कभी कभी’, ‘सिलसीला है प्यार का’, ‘दिल्लगी’, ‘ताल’, ‘तक्षक’, ‘वास्तव’, ‘होगी प्यार की जीत’, ‘होते होते प्यार हो गया’ यासोबत आणखीही काही चित्रपट वेड्यासारखे पाहिले. त्यातील कथावळणांनी भारावून गेलो. स्टोरीतल्या आम्हाला वाटणाऱ्या कच्च्या दुव्यांवर भांडलो, सिनेमातल्या गाण्यांवर चर्चा केल्या. ठाण्यातल्या सगळ्या बागा पालथ्या घातल्यानंतर लोकल गाड्यांच्या वाहिन्यांशी ओळख करून घेत मुंबईतील समुद्रकिनारेही अंगावर घेतले.

बारावीचे अर्धे वर्ष संपल्यावर तिने स्वत:सोबत मलाही अभ्यासाची शिस्त लावली.

बारावी संपल्यानंतर आमचे ज्युनियर कॉलेजपुरते असलेले जग खरे विस्तारले. तिने लॉ कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतली. मी आमच्या शहरातल्या सर्वात मोठ्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन करण्याचे ठरविले. त्या तीन वर्षांत आम्हाला एकमेकांना वेळ देता येणे अवघड व्हायला लागले.

पदवीनंतर माझ्या लग्नक्षम होण्याइतपत करिअर अनिश्चितता असेल म्हणून, कोणत्याही बाबींसोबत अभ्यास आणि भविष्याबाबत कठोर निर्णय घेण्यात अभिपर्णा अचूक असल्याने म्हणून पुढे आमच्यातली प्रेमाची गाणी कमी होत गेली. “आयुष्य म्हणजे फिल्म नसते, तीन तासांपुरते तिला पाहून विसरून जायचे”, या तिच्या विधानाचा अर्थ याच काळात मला पटायला लागला. लग्न आणि त्यानंतर व्यक्तीवरच्या वाढत्या जबाबदा-यांचे दर्शन घरात दोन मोठ्या भावांच्या विवाहाने मिळाले. शहराच्या सौंदर्याला बाधा आणणाऱ्या टोलेजंग इमारती उभारायला लागल्या. भोवतालची सारी तरुणाई  भरपूर पैसा देणारी नोकरी आणि मोठ्यातले मोठे घर मिळवण्याच्या नावाने करिअरच्या मागे धावताना दिसू लागली. माझ्या आर्ट्सची पदवी किंवा गिटारमधील कौशल्य त्यांच्या आसपास धावण्यासही कमी पडायला लागले. त्यातून आलेल्या भयगंडातून अभिपर्णा आणि माझ्यात तयार होऊ लागलेला दुरावा आम्हाला कमी करता आला नाही.

नंतरचा न ताणला गेलेला वाद आणि एकमेकांच्या मर्जीने लांब होण्याचा प्रॅक्टिकल निर्णय घेताना दोघांपैकी कुणीही दुखावलो गेलो नाही. म्युझिकमध्ये नाही, तरी भलत्याच गोष्टीमध्ये माझे करियर रांगू लागले.

तिनेही तिच्या क्षेत्रात मोठी मजल मारल्याचे दिसत होते.

एकमेकांपासून विलग झाल्यानंतर चित्रपटांत दाखवितात तशी झुरत राहणारी नायक आणि नायिकेची अवस्था आमच्या बाबतीत कधीच झाली नाही. आम्ही पुढे एकमेकांना काही सणांना, वाढदिवसाला औपचारिक फोन केले, पण हळूहळू तेही कमी होत गेले. रितेश, पराग, गिरीश यांची कॉलेज आणि मित्रवर्तुळ बदलले. तेच माझ्याबाबतीतही झाले.

आयुष्य इतके वेगाचे बनले की सतत काहीतरी करत आणि त्यात गुंतत आधीच्या गोष्टींना पुसून टाकण्याचा आणि अल्पकाळासाठी नव्या गोष्टी स्वीकारण्याचा छंदच दोन हजारोत्तर काळात आमच्या पिढीला लागला. कॅसेटचा वापर वेगाने बंद झाला, सीडी, सीडी प्लेअर्सही कालबाह्य झाले. एमपीथ्रीने गाण्याची किंमत कमी केली आणि कितीही लोकप्रिय असलेले गाणे सहा महिन्यांच्या आतच विस्मृतीत जाऊ लागले. हिंदी सिनेमांची जागा जागतिक चित्रपटांनी घेतली आणि सीडी-डीव्हीडीच्या बुम आल्यानंतर आमच्या स्वप्नांनाही सिनेमॅटिक अस्तर लागले.

तथाकथित परफेक्शनिस्टच्या ‘दिल चाहता हैं’ने भारतीय सिनेमातील पारंपरिक भावनाशीलतेची हत्या केली. आधीच्या चित्रपटांमधून जशा त्याने प्रेमपिपासू नायकांच्या भूमिका करून तरुणांसमोर प्रेमादर्श ठेवला, तोच कसा खोटा आहे, हे सांगणारा नवा प्रेमसिद्धांत सहज मांडला. आमच्या पिढीची गोष्ट म्हणून या चित्रपटाला आणि तथाकथित परफेक्शनिस्टला सगळ्या प्रेक्षकांनी आणखी मूर्ख बनत डोक्यावर घेतला. त्यानंतर ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’ किंवा ‘हम आपके है कौन’ सारखे प्रेम आणि लग्नकांडाचे सिनेमे बाद होत गेले. लो बजेट फिल्म्स हिट ठरू लागल्या. स्वित्झर्लंडऐवजी धारावीतील झोपडपट्टीतील दृश्यांमध्ये सौंदर्य उगवून आले. पुढे कैक वर्षांनी ‘मेरे सैयाजीसे आज मैने ब्रेकअप करलिया’ म्हणत प्रेमभंगाचा उत्सव साजरा करणाऱ्या नायिकेने खोट्या-खोट्या चित्रपटांतीलच नाही, तर खऱ्या-खऱ्या आयुष्यातून लव्हस्टोरीचा एंड होत असल्याची जाणीव करून दिली.

अभिपर्णा आता काय करीत असेल, कुठे आहे याचा सोशल मीडियावर मी जसा शोध घेतला नाही, तसा तिनेही माझा घेतला नसावा याबाबत माझी खात्री आहे. त्यामुळेच त्या टोटल फिल्माळलेल्या १९९९ सालातील माझ्या आठवणी अजून तरी अबाधित आहेत. कदाचित खूप सिनेमा पाहत नॉनफिल्मी जगण्याची सुरुवात करून देणारे वर्ष म्हणून.

– पंकज भोसले 

लेखक ‘लोकसत्ता’मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. लेखकाशी संपर्क साधण्याचे माध्यम: Facebook.

सदर लेखाविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी किंवा फेसबुक चर्चेत भाग घेण्यासाठी येथे क्लिक करा.