संपादकीय

‘कथन’ मानवाला कायमच आकर्षित करत आलेलं आहे. अगदी मानव अस्तित्त्वात आल्यापासून ते लेखनकला, भाषादि गोष्टी अवगत झाल्यापासूनच असं आकर्षण दिसून आल्याचं म्हणता येईल. त्यामुळे जेव्हा गेल्या शतकात चित्रपटनिर्मिती अस्तित्त्वात आली, तेव्हाही लगेचच काही काळाने या कलेचाही ‘कथना’शी संबंध आला. मात्र, अॅरिस्टॉटल म्हणतो त्याप्रमाणे फिक्शन म्हणजे तरी काय, तर वास्तवाचं एक्स्टेंशन. त्यामुळे साहित्यासोबतच सिनेमातही वास्तविकतेचं प्रतिबिंब दिसून येतं. त्यानुषंगाने समाज आणि चित्रपट हे परस्परांना पूरक प्रकारे कार्य करून एकमेकांवर प्रभाव टाकताना दिसून येतात.

‘सिने मॅग्नेट’च्या या दिवाळी अंकातील लिखाण मुख्यतः सिनेमाला वाहिलेले असले तरी त्याला मर्यादा नाहीत. ज्यामुळे यात अगदी पूर्ण लांबीचे चित्रपट ते लघुपटांपर्यंत, आणि अगदी समीक्षेवरील भाष्यापर्यंत सर्वच गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. मग ते विवेचनपर, तुलनात्मक, समीक्षात्मक लेख असोत कि कथा असोत; सर्वच लिखाण या दृकश्राव्य माध्यमाशी या ना त्या पद्धतीने संबंध जोपासणारे आहे.

सुरुवातीला ‘चित्रपट आणि तरुणाई’ असा विषय असलेला अंक नंतर मात्र या मर्यादांच्या पार जाऊन पोचला. ज्यामुळे केवळ तरुणाईच नव्हे, तर एकूणच सामाजिक परिस्थितीचा आढावा घेणारे तसेच सिनेमा आणि समाज या दोहोंतील नातेसंबंधांचा काळजीपूर्वक विचार आणि विवेचन करणारे लेख आणि अगदी कथाही स्क्रीनवर उतरल्या (अलीकडे कागदावर म्हणण्याची सोय राहिली नाही). हल्ली डिजिटल माध्यमाची गरज ओळखून वर्तमानपत्रंही ऑनलाईन आवृत्त्यांकडे वळताना दिसतात. ज्यामागे सदर अंक भौगोलिक सीमारेषांच्या पल्याड जाऊन पोचेल हे पाहणं हाही एक उद्देश होताच. त्यामुळे दिवाळी अंक काढायचं ठरल्यावर तो डिजिटली प्रकाशित करणं या निर्णयावर एकमत होणं ओघानेच आलं.

खरं सांगायचं झाल्यास, सदर अंकाच्या निर्मितीची प्रक्रिया काहीशी इंडी चित्रपटांसारखी आहे. क्वेंटिन टॅरंटिनोकडून चित्रपटनिर्मितीबाबत कायम उद्धृत केलं जाणारं एक वाक्य आहे. ते म्हणजे : “If you want to make a movie, make it. Don’t wait for a grant, don’t wait for the perfect circumstances, just make it.” या अंकाची निर्मितीही याच मार्गाचा अवलंब करत झाली असं म्हणायला वाव आहे. खासकरून डिजिटली काहीतरी प्रकाशित करणं, याबाबत मिळालेल्या स्वातंत्र्याचा यात मोठा वाटा होता. परिणामी गेल्या अनेक वर्षांपासून लिहिणाऱ्या मंडळींपासून ते अलीकडील काळात चित्रपट समीक्षणात खरोखर काहीतरी वेगळं मांडू पाहणारे लिहिते हात जेव्हा एकत्र आले, तेव्हा त्यातून परिणामकारक अशा लिखाणाचा संच तयार होऊन ‘सिने मॅग्नेट’ आकारास आला.

सिनेमा ही १९ व्या शतकाने जाता जाता जगाला दिलेली सगळ्यात मोठी भेट. २० व्या शतकाने त्याला फुलवलं. आणि आता एकविसाव्या शतकात तिला मल्टिमीडियाच्या स्वरुपात वेगवेगळ्या फांद्या फुटत आहेत. त्यातल्याच एकाचा वापर करत आम्ही हा ऑनलाईन दिवाळी अंक तुमच्यासमोर ठेवत आहोत. तुम्हाला तो आवडेल आणि उद्घृत सिनेमे तुम्ही पाहिले असं जरी घडलं तरी या दिवाळी अंकाचा उद्देश सफल झाला असं मी मानेन. सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

— अक्षय शेलार